Next
बँकांच्या शेअर्सना झळाळी
BOI
Monday, August 19, 2019 | 04:02 PM
15 0 0
Share this article:


गेल्या आठवड्यात सुट्ट्यांमुळे शेअर बाजारात तीनच दिवस कामकाज झाले. त्यामुळे फार चढ-उतार झाले नाहीत; मात्र बहुतेक बँकांचे शेअर्स वधारले होते. सद्यस्थितीत गुंतवणुकीसाठी बँकांचे शेअर्सच उत्तम आहेत. ते शेअर कोणते, याविषयी अधिक जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
...........
गेल्या आठवड्यात बकरी ईद व स्वातंत्र्यदिन यांमुळे शेअर बाजाराला दोन दिवस सुट्टी होती. त्यामुळे बाजार तीन दिवसच होता. इतक्या अल्प कालावधीत बाजारात फार चढ-उतार अपेक्षित नव्हते. त्यातच जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश करणे व ३७० आणि ३५ अ ही कलमे हटवणे अशा बातम्यांमुळे राजकारणाचाच अर्थकारणावर वरचष्मा होता. परिणामी शुक्रवारी (१६ ऑगस्ट) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) अनुक्रमे ३७ हजार ३५० व ११ हजार ७४७वर बंद झाले. 

बँक निफ्टी वाढून २६ हजार २१७वर थांबला. बहुतेक बँकांचे शेअर्स वधारले होते. येस बँकेचा शेअर ८१ रुपयांपर्यंत वाढला. स्टेट बँकेचा शेअर २९१ रुपये, कॅनरा बँकेचा २३५ रुपये, इंडसिंड बँकेचा १४४० रुपये, आरबीएल बँकेचा ३९७ रुपये, बंधन बँकेचा ५०२ रुपये, फेडरल बँकेचा ८६ रुपये, बँक ऑफ बडोदाचा १०३ रुपये, एचडीएफसी बँकेचा २२२७ रुपये तर डीसीबी बँकेचा २०६ रुपये असे बँकांच्या शेअर्सचे भाव होते. 

 येस बँकेने क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांतर्फे गेल्या आठवड्यात १९३० कोटी रुपयांचे भांडवल उभारले. एकूण २.३१ कोटी रुपयांचे शेअर्स प्रति शेअर ८७.९० रुपये भावाने दिले गेले. सोसायटी जनराले, बीएनपी पारिबास आरबिट्रेज, एचडीएफसी ट्रस्टी कंपनी, की स्क्वेअर मास्टर फंड एक व दोन या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हे शेअर्स खरेदी केले. 

परदेशी गुंतवणूकदार अल्प मुदतीसाठीच गुंतवणूक करतात आणि आठ ते १० टक्के नफा मिळाला, तरी विक्री करून बाहेर पडतात. त्याचप्रमाणे येथील गुंतवणूकदारांनीही ८० रुपयांच्या आसपास येस बँकेच्या शेअर्सची खरेदी करून ९२ रुपयांच्या आसपास विकले, तरी दोन ते तीन महिन्यांत १५ टक्के नफा मिळून जाईल. राष्ट्रीयीकृत बँकांपैकी स्टेट बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बंधन बँक, आरबीएल बँक यांचे शेअर्स घेतल्यास चांगला फायदा होईल. 

गेल्या पंधरवड्यात अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात पाव टक्क्याची कपात केली. रिझर्व्ह बँकेने आपल्याकडे ०.३५ टक्के कपात केली. पाव किंवा अर्धा टक्का कपात नेहमी होत असते. रिझर्व्ह बँकेने या वेळी त्यातला मध्य गाठला आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली असली, तरी बँकांनी हा फायदा आपल्या कर्जदारांपर्यंत पोहोचवलेला नाही. बाजारात कर्जाची मागणी फार नाही. त्यामुळे बँकांनी पाव टक्क्याची कपात केली असती, तरी कर्जदारांनी कर्जाची मागणी वाढवली नसती. 

अर्थकारण सध्या मंदावले आहे. सध्या कुठलीही बातमी अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकत नाही. पावसाळा चांगला झाला, खरीप, रब्बी पिके चांगली आली आणि परिणामी शेतकऱ्यांच्या हात चार पैसे खुळखुळून ग्रामीण क्षेत्रात बदल झाला, तरच अर्थव्यवस्था सुधारेल. 

गुंतवणुकीसाठी सध्या बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, येस बँक, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स हे शेअर्स चांगले वाटतात. 

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search