Next
सावरकरांमध्ये माणसे जोडण्याची, प्रेरणा देण्याची कला
कीर्तनसंध्या महोत्सवात आफळेबुवांचे प्रतिपादन
BOI
Friday, January 04, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये माणसे जोडण्याची, त्यांच्यामधील स्फुल्लिंग जागृत करण्याची अद्भुत कला होती. म्हणूनच जिथे जातील तिथे त्यांनी भरपूर माणसांना एकत्र आणले, माणसांची एक प्रकारे साखळीच तयार केली आणि त्यांना राष्ट्रकार्याकडे वळवून घेतले. सावरकरांचे हे वैशिष्ट्य राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (तीन जानेवारी २०१९) उलगडून दाखवले. आजच्या काळात अशा प्रकारे राष्ट्रकार्यासाठी, चांगल्या उपक्रमांसाठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. 

‘सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले, तेव्हा त्यांच्या मित्रमेळा संघटनेच्या कार्याची सुरुवात होऊन फार काळ लोटला नव्हता. तरीही त्यांना निरोप देण्यासाठी जमलेल्या निवडक लोकांची संख्या सुमारे दोन-तीनशेच्या घरात होती. पुढे इंग्लंडमध्येही त्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊन ‘अभिनव भारत’चे अनेक कार्यकर्ते तयार झाले. त्यांना लंडनमध्ये येण्यासाठी ज्यांनी शिष्यवृत्ती दिली, ते श्यामजी कृष्ण वर्माही सावरकरांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या चळवळीत सहभागी झाले. फ्रान्समधील मॅडम कामाही त्यांच्या चळवळीत आल्या. १८५७च्या स्वातंत्र्यसमरासंदर्भातील काही नोंदी ‘इंडिया हाउस’मधील कागदपत्रांमध्ये होत्या. तेथे इंग्लिश व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता. म्हणून सावरकरांनी तेथील एका भारतीयाच्या इंग्लिश पत्नीच्या माध्यमातून ‘इंडिया हाउस’मधील या नोंदी मिळवल्या. बॉम्ब भारतात पाठवणे शक्य नसल्याने त्याची मार्गदर्शक पुस्तिका पाठवायची होती; मात्र ती रशियन भाषेत होती. त्या वेळी सेनापती बापटांची सहाध्यायी असलेल्या एका रशियन मुलीची मदत घेऊन ती पुस्तके सावरकरांनी भाषांतरित करून घेतली. चतुर्भुज नावाचा स्वयंपाकी इंडिया हाउसमध्ये होता. त्याला भारतात पिस्तुले पाठवण्यासाठी सावरकरांनी तयार केले. त्यांच्या चळवळीत पंजाबपासून दक्षिणेपर्यंतच्या सगळ्या राज्यांमधील व्यक्ती होत्या. या सगळ्या गोष्टींमधून माणसे जोडण्याचा, त्यांना राष्ट्रकार्याला तयार करण्याचा सावरकरांमधील गुण दिसून येतो,’ असे आफळेबुवांनी सांगितले.

‘परदेशात जात असताना हरनामसिंगला घरची आठवण येत होती आणि तो परत यायला निघाला होता. त्या वेळी सावरकरांनी त्याला गुरुगोविंदसिंगांसह अनेक प्रेरक गोष्टी सांगून त्याचे मन इतके पालटवले, की त्याने चळवळीला वाहूनच घेतले,’ असे आफळेबुवा म्हणाले. ‘त्यांचे कार्य हे एक प्रकारे कीर्तनासारखेच, ज्ञानदीप लावण्याचे होते,’ असे ते म्हणाले.

‘म्हणून टिळकांना ‘लोकमान्य’ म्हणतात’
सावरकरांनी परदेशी कपड्यांची होळी केली, तेव्हा टिळकांना बोलावले होते. टिळक तेव्हा राष्ट्रीय नेते झाले होते. अनेकांनी त्या वेळी टिळकांना सांगितले होते, की ‘तो पोरांचा खेळ आहे. तिकडे जाऊ नये;’ मात्र त्यावर टिळक म्हणाले होते, की ‘आमच्यासारखी वजनदार व्यक्ती तिथे गेली, की तो पोरखेळ राहणार नाही. या मुलांना आपणच प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’ त्याप्रमाणे टिळकांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांना पाठिंबा दिला.

‘पुढे सावरकरांना लंडनमध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळण्याकरिता श्यामजी कृष्ण वर्मांकडे शब्द टाकण्याची विनंती त्यांनी टिळकांकडे केली होती. त्यानुसार टिळकांनी शब्द टाकला आणि सावरकर तिकडे जाऊ शकले. या गोष्टींमध्ये टिळकांनी दिलेला पाठिंबा पाहता त्यांना ‘लोकमान्य’ का म्हटले जाते, ते समजते,’ असे आफळेबुवांनी सांगितले. 

कृ. प्र. खाडिलकरांनी घेतले हमीपत्र
‘सावरकर लंडनला गेले, तेव्हा त्यांच्या चळवळीचे कार्य वाढले होते. त्यामुळे त्यांचे हमीपत्र घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्या वेळी नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी त्यांचे हमीपत्र घेतले होते. आपला राष्ट्रवाद केवळ नाटकापुरता मर्यादित न ठेवता, त्यांनी प्रत्यक्ष जीवनातही तसे कार्य केले होते,’ असे आफळेबुवांनी नमूद केले. 

‘लंडनमध्ये १८५७च्या स्वातंत्र्यसमराचा अपमान करणारे तमाशे सुरू होते. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांची सोंगे केली जायची. त्यांना फटके मारले जायचे. आपल्या वीरांचा हा उपमर्द स्वातंत्र्यवीर सावरकरांना सहन झाला नाही. तमाशे बंद पाडण्यासाठी त्यांनी ‘इंडिया हाउस’मधून युद्धातील इंग्रजांच्याच नोंदी मिळवून, त्या अभ्यासून ग्रंथ लिहिला. तो अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाला. देशासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांची चेष्टा लंडनवासीयांनाही झोंबली आणि वर्षभरातच हे तमाशे बंद पडले,’ असे आफळेबुवांनी सांगितले. 

‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपण जागतिक पातळीवरूनही प्रयत्न केले पाहिजेत हे सावरकरांनी ओळखले. म्हणून त्यांनी जर्मनीमध्ये समाजवाद्यांच्या संमेलनात मॅडम कामा यांना पाठवले. संमेलनात भारताचा काल्पनिक ध्वजही फडकला. त्यामुळे इंग्लंडवर दबाव येईल, असा सावरकरांचा कयास होता. तो प्रयत्न यशस्वी झाला,’ असे ते म्हणाले. 

क्रांतीचे लोण उसळले
‘पुस्तकातून पिस्तुले, बाँब बनवण्याचे साहित्य लंडनमधून भारतात येते आणि बाबाराव सावरकर ते सर्वत्र पोहोचवतात. यावरून इंग्रजांनी त्यांना पकडून अनन्वित छळ केला. इंग्लंडमध्येही इंग्रज सुरक्षित नाहीत, हा संदेश जगाला देण्यासाठी मदनलाल धिंग्राने ‘इंडिया हाउस’चा प्रमुख कर्झन वायली याला गोळ्या झाडल्या. मदनलालला फाशी होण्याच्या एक दिवस आधी सावरकरांनी साऱ्या वृत्तपत्रांत त्याचे मनोगत छापून आणले आणि इंग्लडच्या सत्ताधीशांना दणका दिला. नाशिकमध्ये बाबाराव सावरकरांचा छळ करणाऱ्या जॅक्सन कलेक्टरला कान्हेरे, कर्वे, देशपांडे, यांनी यमसदनी पाठवले. त्यानंतर क्रांतीचे लोण उसळले,’ असा इतिहास आफळेबुवांनी उलगडला.

नामदेवांचा संदेश
पूर्वरंगामध्ये आफळेबुवांनी ‘बोलू ऐसे बोल’ हा संत नामदेवांचा अभंग निरूपणासाठी घेतला. ‘नामदेव महाराजांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणत पंजाब गाठले. खरे पण गोड बोला, परमेश्वराचे कीर्तन करा आणि लोकांच्या मनातील शंका खोडून काढा, जेथे जेथे धर्माचे उत्सव सुरू नसतील तिथे ते सुरू करा, उपासना चालू ठेवा, असा संदेश नामदेवांनी दिला,’ असे बुवांनी सांगितले.

प्रश्नमंजूषेतील भाग्यवान विजेता सार्थक केळकर याचा सत्कार आफळेबुवांच्या हस्ते करण्यात आला.नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, शिवरायांची आरती, होळी बांधा रे साजिरी, अखिल हिंदू ध्वज तो उभवूया पुन्हा, शूरा मी वंदिले आदी पदे कीर्तनात बुवांनी गायली. त्यांना अभिजित भट याने गायनसाथ, तर हेरंब जोगळेकर (तबला), मधुसूदन लेले (संवादिनी), वैभव फणसळकर (सिंथेसायझर), उदय गोखले, प्रथमेश तारळकर, अदिती वैद्य-चक्रदेव, सुखदा मुळे यांनी वाद्यसाथ केली.

प्रश्नमंजूषेला प्रतिसाद
प्रश्नमंजूषा उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी विचारलेल्या प्रश्नांना एक हजार जणांनी उत्तरे दिली. त्यातून सार्थक प्रफुल्ल केळकर (रा. महात्मा गांधी रस्ता, रत्नागिरी) भाग्यवान विजेता ठरला. बुवांच्या हस्ते पुस्तक देऊन त्याचा सत्कार झाला. सुश्रुत उदय करंदीकर (मारुती मंदिर), समृद्धी उदय पडवळे (निवेंडी भगवतीनगर) हेदेखील विजेते असून, त्यांनाही गौरवले जाणार आहे. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.  

(दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... पहिल्या दिवशीच्या कीर्तनाचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. २०१८च्या कीर्तनसंध्या उपक्रमातील कीर्तनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search