Next
‘प्रत्येक खासगी विकसकाने किमान एक एसआरए प्रकल्प हाती घ्यावा’
डॉ. नितीन करीर यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, June 01, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे ४० टक्के लोकसंख्या ही आज झोपडपट्टीमध्ये राहते. हे सारे नागरिक स्वखुशीने झोपडपट्टीत राहत नाहीत. शहराचे सामाजिक स्वास्थ्य सांभाळायचे असेल, तर याही नागरिकांना चांगले राहणीमान आणि सुविधा देणे आवश्यक आहे आणि याचसाठी खासगी विकासकांनी एसआरए प्रकल्पांकडे वळणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक खासगी विकसकाने किमान एक एसआरए प्रकल्प हाती घ्यावा,’ असे मत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केले. पुण्यातील नाईकनवरे डेव्हलपर्सच्या ‘परिवर्तन’ या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे उद्घाटन व सदनिका ग्राहकांना सदनिका हस्तांतरणाचा कार्यक्रम डॉ. करीर यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.


नाईकनवरे डेव्हलपर्सचे संचालक हेमंत व रणजीत नाईकनवरे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, पुणे महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मशाल संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, ‘परिवर्तन’ या प्रकल्पाचे वास्तुविशारद संदीप महाजन, नगरसेवक धीरज घाटे, स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, परिवर्तन प्रकल्पातील सदनिकांचे मालक सलीम पटेल, शिवाजी पारिटे व शाहीद पटेल आदी या वेळी उपस्थित होते.  
                            
नाईकनवरे डेव्हलपर्सच्या वतीने सध्या दांडेकर पुलाजवळील ‘परिवर्तन’ या प्रकल्पाबरोबरच सातारा रस्ता, मंगळवार पेठ- जुना बाजार, रामटेकडी, विद्यापीठ रस्ता या ठिकाणी एसआरएचे प्रकल्प सुरू आहेत. दांडेकर पुलाजवळ ‘परिवर्तन’ आणि आणखी एक प्रकल्प उभारला जात असून या दोन प्रकल्पांमध्ये एकूण ६ इमारती बांधल्या जात आहेत. ‘परिवर्तन’ प्रकल्पातील एक इमारत पूर्ण झाली असून, त्यातील १९२ सदनिका व ७ दुकानांचे हस्तांतरण शनिवारी, एक जून रोजी करण्यात आले. 


‘सर्व आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच या प्रकल्पाचे हस्तांतरण केले गेले. या वेळी प्रत्येक सभासदाशी स्वतंत्र करारनामा करण्यात आला असून, अभिहस्तांतरण प्रक्रियादेखील पार पडली. हस्तांतरणापूर्वीच या सर्व बाबींची पुर्तता केलेला हा भारतातील एकमेव प्रकल्प ठरेल, त्यामुळे एसआरए क्षेत्रात एक नवा मापदंड प्रस्थापित होईल,’ असा विश्वास या वेळी हेमंत नाईकनवरे यांनी व्यक्त केला.

या वेळी बोलताना डॉ. करीर म्हणाले, ‘क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) व एमसीएचआय अर्थात महाराष्ट्र चेंबर ऑफ हाउसिंग इंडस्ट्री यांच्या सदस्यांनी किमान एक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हाती घेत शहराच्या विकासासाठी हातभार लावावा. आज बांधकाम क्षेत्राची परिस्थिती तितकीशी चांगली नाही, याची मला कल्पना आहे. असे असले तरी तीन ते चार बांधकाम व्यावसायिक एकत्र येत एक एसआरए प्रकल्प हाती घेऊ शकतील. झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक देखील शहराच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहेत आणि आपणही या शहराचा भाग असून, शहराच्या विकासात योगदान द्यायला हवे, अशी भावना याद्वारे त्यांच्या मनात निर्माण होईल.’

‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरएची स्थापना ही १४ वर्षांपूर्वी झाली. त्या वेळी क्रेडाईने मशाल या सामाजिक संस्थेच्या मदतीने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये एक सर्व्हे केला गेला. त्याची एक पुस्तिकाही छापली गेली. त्या सर्व्हेनंतर एसआरएने याचे गणित मांडीत ते विकासकांसमोर ठेवणे अपेक्षित होते;मात्र तसे झाले नाही. विकासकाने एसआरए प्रकल्प आणल्यानंतर तो तपासत बसणे हे एसआरएचे काम नाही, तर नागरिक व विकसक यांमध्ये त्यांनी पुलाचे काम करणे अपेक्षित आहे,’ असेही या वेळी डॉ. करीर यांनी नमूद केले. 

हेमंत नाईकनवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर रणजीत नाईकनवरे यांनी आभार मानले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचलन केले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search