Next
‘कुशल मनुष्यबळासाठी उद्योगांनी घ्यावा पुढाकार’
डॉ. रघुनाथ शेवगावकर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, April 29, 2019 | 03:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘शिक्षण आणि उद्योग ही क्षेत्रे एकमेकांवर अवलंबून आहेत. दोन्ही क्षेत्रांतील लोकांनी एकमेकांच्या गरजा ओळखून समन्वय साधायला हवा. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उद्योगांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी औद्योजिक सामाजिक बांधिलकीचा (सीएसआर) निधी शिक्षण क्षेत्रात अधिक गुंतवला पाहिजे. शिक्षण क्षेत्रावरील गुंतवणूक वाढली, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी केले.

वाघोली येथील रायसोनी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘जीएचआर कनेक्ट’ या एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉ. शेवगावकर बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या ‘ऐंगेजिंग विथ मिलेनियल्स’ या संकल्पनेवर या परिषदेला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) उपाध्यक्ष दीनानाथ खोळकर, रायसोनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त संचालक अजित टाटिया, रायसोनी शिक्षण संस्थेच्या कॉर्पोरेट रिलेशन्सचे संचालक नागेंद्र सिंग, रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅंड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. के. के. पालिवाल, रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅंड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, संचालिका डॉ. प्रीती बजाज, ग्लोबल एज्युकेशनचे संचालक आदित्य भंडारी आदी उपस्थित होते.


डॉ. शेवगावकर म्हणाले, ‘आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता उद्योगांसाठी पूरक नसते. अशावेळी त्यांना प्रात्यक्षिक ज्ञान आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर ते उद्योग क्षेत्रात कुशलतेच्या जोरावर रोजगार मिळवू शकतील. कौशल्य, संशोधन आणि इनोव्हेशन या गोष्टींवर विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही लक्ष द्यायला हवे. नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करू शकतील, अशा पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले, तर देशाच्या विकासातही चांगली भर पडेल. त्यामुळे उद्योगांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी द्यायला हवी. शिक्षणसंस्था आणि उद्योग यांच्यातील नाते एकमेकांना विकसित करणारे असावे.’

खोळकर म्हणाले, ‘उद्योगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंतरशाखीय कौशल्य आत्मसात करावीत. प्रशिक्षणाचा कालावधी जास्त ठेवला, तर विद्यार्थ्यांना अधिक शिकायला मिळेल. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, पण कुशल मनुष्यबळ नाही, अशी आजची स्थिती आहे. हे बदलण्यासाठी इंटर्नशीप उपक्रम महत्त्वाचा ठरेल. उद्योग क्षेत्राला विद्यार्थी-शिक्षक यांच्याबरोबर काम करण्यात उत्सुकता आहे.’


या परिषदेत आयटी, उत्पादन, अ‍ॅटोमोबाइल, पायाभूत सुविधा क्षेत्रांतील १८०पेक्षा जास्त उद्योग प्रतिनिधींनी भाग घेतला. औद्योगिक व शैक्षणिक संस्थाचा सहयोग वाढवण्यासाठी या वेळी ‘जीएचआर पुरस्कार’ देण्यात आले. एकूण २९ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या वेळी विविध विषयांवर तीन चर्चासत्र झाली. डॉ. प्रीती बजाज यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. कौशल खात्री यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन कोरडे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search