Next
वाचनातून समृद्धीकडे नेणारा महोत्सव
प्रसन्न पेठे, अनिकेत कोनकर
Saturday, August 19, 2017 | 07:00 PM
15 0 0
Share this article:

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात विद्येचे प्रमुख साधन असलेल्या पुस्तकांशी संबंधित एक महत्त्वाची घडामोड नुकतीच घडली. काही मराठी प्रकाशक, विक्रेते यांनी प्रथमच एकत्र येऊन वाचन जागर महोत्सव आयोजित केला होता. लेखकांशी गप्पा, २५ टक्के सवलतीसारखे उपक्रम राबवल्याने पुस्तकविक्रीत बऱ्यापैकी वाढ झाली. वाचकांना आणि प्रकाशन व्यवसायालाही समृद्धीकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, अशा या उपक्रमातून मिळालेल्या अनुभवाची नि फलिताची चर्चा करणारा हा लेख...
..........
‘हल्ली लोकांचं वाचन कमी झालंय,’ ‘पुस्तकांची खरेदी फारशी होत नाही,’ अशा प्रकारची वाक्ये आपल्या कानावर अनेकदा पडत असतात; पण ही वाक्ये खोटी ठरतील, अशा प्रकारचे वातावरण पुण्याने पाच ते १५ ऑगस्ट या कालावधीत अनुभवले. एरव्ही एकमेकांचे स्पर्धक असलेले काही मराठी प्रकाशक, लेखक आणि पुस्तकविक्रेते प्रथमच एकत्र आले आणि त्यांनी वाचन जागर अभियान सुरू केले. त्याअंतर्गत दहा दिवस आयोजित करण्यात आलेल्या वाचन जागर महोत्सवात खऱ्या अर्थाने वाचनाचा जागर घडला आणि एका चांगल्या उपक्रमाची आशादायी नांदी झाली. 

या कालावधीत वेगवेगळे लेखक-लेखिका, चित्रकारांशी गप्पा, दर्जेदार पुस्तकांवर २५ टक्के सवलत, भाग्यवान वाचकांना पुस्तकांची भेट, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. त्यांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि पुस्तकांच्या विक्रीतही बऱ्यापैकी वाढ नोंदवली गेली. एकुणातच, प्रकाशक, विक्रेते एकत्र येऊन वाचकांपर्यंत पोहोचले आणि ‘वाचाल तर समृद्ध व्हाल’ हा संदेश देण्यात यशस्वी ठरले, तर वाचकांचा चांगला प्रतिसाद नक्कीच मिळेल, पुस्तकविक्रीत वाढ होईल; त्यामुळे प्रकाशन व्यवसायाला तर चालना मिळेलच; पण चांगले वाचक घडायला हातभार लागू शकेल, असे सकारात्मक चित्र यातून उभे राहिले. भले त्यात काही सुधारणा आवश्यक असतील, अजून बऱ्याच जणांनी यात सहभागी होण्याची आवश्यकता असेल; पण काही तरी चांगल्या आणि आश्वासक उपक्रमाची सुरुवात झाली, एवढे मात्र नक्की. पुण्यात यशस्वी झालेल्या या उपक्रमामुळे वाचक घडवण्यासाठी, तरुण वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्याच्या विविध भागांत असे उपक्रम राबवले जावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राजहंस प्रकाशन, रोहन प्रकाशन, मॅजेस्टिक प्रकाशन, मनोविकास प्रकाशन, डायमंड पब्लिकेशन, समकालीन प्रकाशन, साधना प्रकाशन आणि ज्योत्स्ना प्रकाशन या प्रकाशकांसह पुण्यातील बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस, अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस अक्षरधारा बुक गॅलरी, मॅजेस्टिक बुक गॅलरी, डायमंड पब्लिकेशन शो-रूम, पुस्तक पेठ, रसिक साहित्य आणि शब्दांगण ही पुस्तकविक्रीची दालने या अभियानात सहभागी झाली होती. या अभियानाच्या सभासदांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केलेले हे अनुभव आणि मते...

आनंद अवधानी, समकालीन प्रकाशन :
या महोत्सवाकडे एक चांगली सुरुवात म्हणून पाहिले पाहिजे. पूर्वी मराठी व्यावसायिकांवर टीका व्हायची; पण त्यांनी आता आपण एकत्र येऊन काही करू पाहतोय हे दाखवून दिले आहे. काही सेल्युलर कंपन्या ज्याप्रमाणे एकत्र येतात, त्याप्रमाणे एक वेगळा उपक्रम म्हणून या वाचन जागर महोत्सवानिमित्त प्रकाशक आणि विक्रेत्यांनी एकत्र येऊन एक वेगळी सुरुवात केली असे नक्कीच म्हणता येईल. या कालावधीत पुस्तकविक्रीच्या सर्व दुकानांमध्ये उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. सर्व दुकानांमध्ये आकर्षक सजावट केली होती. पुस्तकांवर २५ टक्के सवलत होती. त्यामुळे वाचकांनाही चांगले वातावरण अनुभवता आले. दर वर्षी ऑगस्ट ते फेब्रुवारी हा पुस्तकविक्रीचा महत्त्वाचा सीझन असतो आणि त्यासाठी ऑगस्टपासून दुकानदारांना वेध लागतात; पण या वर्षी दुकानदारांनी आपणहूनच त्या सीझनची सुरुवात करून दिली आहे. विविध माध्यमांकडूनही या उपक्रमाला चांगली प्रसिद्धी मिळाली.

योगेश नांदुरकर, रसिक साहित्य :
या महोत्सवात वाचकांचा उत्साह पाहायला मिळाला. भारतभर जी नोटाबंदी, मंदी आणि ‘जीएसटी’ची चर्चा होती त्याचा काही विशेष परिणाम जाणवला नाही. वाचक, विक्रेते आणि प्रकाशक अशा तिन्ही घटकांमध्ये या महोत्सवाबद्दल खूपच सकारात्मक भावना होती. अनेक लेखक, कवी, अभिनेते मंडळींनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने सर्वांचा उत्साह दुणावला. एका वेगळ्या अभियानाचा आपण भाग आहोत अशी एक खास भावना प्रत्येकाच्या मनात होती. या महोत्सवाचा परिणाम म्हणून, एरव्हीपेक्षा रसिकांची पुस्तकखरेदी खूप वाढली असे वाटले नाही; पण सकारात्मकता निश्चितच जाणवली. आम्ही सुरुवातीला काही प्रकाशक आणि विक्रेतेच एकत्र आलो असलो, तरी त्यामागे कोणालाही वगळण्याचा हेतू नाही. यापुढे जास्तीतजास्त मंडळींना बरोबर घेऊन महाराष्ट्रभर असा महोत्सव नक्की करू. पुण्याजवळच्या उपनगरांपासून सुरुवात करण्याचे ठरवत आहोत. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही ‘फेसबुक लाइव्ह’चा वापर केल्यामुळे हे कार्यक्रम युरोप, अमेरिकेसारख्या ठिकाणच्या मराठी मंडळींनीही आवर्जून पाहिले आणि त्यांचा आनंद लुटला. त्यांनी आमच्याकडे ऑनलाइन पद्धतीने पुस्तक खरेदीसुद्धा केली.

मिलिंद भातखंडे, बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस :
अशा प्रकारचा हा पहिलाच आगळावेगळा उपक्रम असून, तो प्रकाशक-वितरकांना जवळ आणणारा होता. ग्राहकांसाठी एकाच वेळी आठ ठिकाणी अशा प्रकारे २५ टक्के सवलतीत पुस्तके उपलब्ध करून दिली गेल्याने त्यांनाही चांगले पर्याय उपलब्ध झाले. नेहमीच्या ग्राहकांनी काही वेगळी पुस्तकेही खरेदी केली. अगदी एका वाक्यात सांगायचे, तर यामुळे एक अत्यंत चांगली सुरुवात झाली आणि हे प्रकाशक आणि वितरक यांची चांगली एकी झाली.
  
संजय भास्कर जोशी, पुस्तक पेठ :
उत्तम सीझन आता सुरू होत असतो, म्हणून ही वेळ साधली. कोणालाही वगळण्याचा प्रश्नच नव्हता; पण कुठूनतरी सुरुवात होणे महत्त्वाचे होते. सगळे प्रकाशक आले, तर आम्हालाही आनंदच होणार आहे. या उपक्रमामुळे एकूण व्यवसायात आम्हाला उत्तम वाढ झालेली दिसली. या कालावधीत आम्ही जवळजवळ रोज कार्यक्रम केले आणि रोज आमच्याकडे भरपूर रसिकांची गर्दी असायची. अनिल अवचट, अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, जयप्रकाश प्रधान, निरंजन घाटे, संदीप खरे, मधुराणी प्रभुलकर, कौशल इनामदार, प्रदीप निफाडकर अशी नामवंत मंडळी लोकांना भेटायला येत होती. त्यामुळे आता हा महोत्सव संपल्यावर अशाही प्रतिक्रिया आल्यात, की ‘आज अस्वस्थ वाटतंय, चैन पडत नाही. आता काय करू?’ या निमित्ताने आम्ही पावसाच्या कवितांचा एक उपक्रम आयोजित केला होता. ग्राहकांनी पावसावरची एक स्वरचित कविता बोर्डवर लिहायची होती. त्यातल्या निवडक कवितांना आम्ही बक्षिसे दिली. एवढेच नव्हे, तर शेवटच्या दिवशी त्यातल्या ‘बेस्ट’ कवितेला त्या दिवशीचे प्रमुख पाहुणे कौशल इनामदार यांनी तिथल्या तिथे तीन मिनिटांत चाल लावून, ती गाऊनही दाखवली. त्या विजेत्याला त्यामुळे मिळालेले समाधान आमच्यासाठी फार मोलाचे होते. आता लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.

माधव वैशंपायन, पुस्तक पेठ :
आमच्यासारख्या विक्रेत्यांच्या माध्यमातून आवडत्या लेखकांना भेटायला मिळाल्याचा खूप जास्त आनंद आमच्या ग्राहकांना झाला. त्यामुळे त्यांचे आमच्याशी असलेले नाते आणखी घट्ट व्हायला मदत झाली.

अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन :
या वाचन जागर महोत्सवाच्या निमित्ताने जो लेखक-वाचक संवाद झाला, तो लोकांना फार आवडला. गेल्या काही वर्षांत लेखकांना भेटण्याची संधी प्रौढ वाचकांना मिळू लागली आहे; पण या महोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच माधुरी पुरंदरे लहान मुलांना भेटल्या आणि त्यामुळे मुलांना खूप आनंद झाला. मुले त्यांची पुस्तके वाचून आली होती आणि त्यांनी माधुरीताईंना मनमोकळे प्रश्न विचारले. त्यामुळे पुस्तकांचा खपही चांगला झाला. लेखक-वाचक यांमधला संवाद महत्त्वाचा असतो आणि अशा कार्यक्रमांमुळे लेखकांनासुद्धा वाचकांशी संवाद साधून आनंद मिळाला. ‘भाग्यवान वाचक’सारख्या काही उपक्रमांमुळे वाचकांचा एक चांगला डेटाबेस तयार झाला. पुण्यातल्या या कार्यक्रमाविषयी ऐकून आता ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणांहून अशा प्रकारच्या कार्यक्रमांची मागणी आली आहे.

मिलिंद परांजपे, ज्योत्स्ना प्रकाशन :
वाचन जागर महोत्सवाला प्रतिसाद चांगलाच मिळाला. याआधी असे कार्यक्रम होत नव्हते. आता असे कार्यक्रम वारंवार करावेत अशी मागणी झाली. मुलांसाठी आयोजिलेला माधुरी पुरंदरे यांचा कार्यक्रम मुलांइतकाच पालकांनाही आवडला. खूप दूरवरूनसुद्धा पालक मुलांना घेऊन आले होते. मिलिंद मुळीक यांच्यासारखे चित्रकार लोकांना त्या निमित्ताने भेटले. त्यांच्याविषयी लोकांना खूप कुतूहल असल्याचे जाणवले. आणि लोकांनी बऱ्याच शंकाही विचारून घेतल्या. भविष्यात अनेक ठिकाणी असे कार्यक्रम नक्की करायचे, असे ठरवले आहे.

रोहन चंपानेरकर, रोहन प्रकाशन :
प्रकाशक आणि विक्रेते संघटित होऊन चांगले उपक्रम करू शकतात, हे या अभियानातून ठळकपणे समोर आले. या उपक्रमातून वाचन जागृती निश्चितच झाली. मराठी पुस्तके वाचणारे वाचक हे बहुतांशी चाळिशीच्या पुढचे असल्याचे सर्वच ठिकाणच्या प्रतिसादावरून आढळले. अर्थात, अगदी लहान मुले आणि तरुणसुद्धा मराठी पुस्तके आणि लेखकांच्या कार्यक्रमाला येत होते, हेही निरीक्षणातून जाणवले. ‘बातमीमागची बातमी’ या जयप्रकाश प्रधान यांच्या कार्यक्रमाच्या वेळी अचानक पाऊस सुरू झाला तेव्हा उपस्थितांना बाहेरच्या मोकळ्या जागेतून दुकानाच्या आत दाटीने बसावे लागले; पण त्यातही सातवीतला एक मुलगा मांडी घालून एकाग्रतेने पूर्ण कार्यक्रम ऐकत होता, हे दृश्य आश्वासक म्हणता येईल. या अभियानातून लेखक-वाचक संवाद घडले. त्यातून लेखकांनाही नवे काही प्रयोग करून बघण्याची, नवीन वाट चोखाळण्याची ऊर्जा मिळाली असावी, असे वाटते. या अभियानाला लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे साधारणपणे एरव्हीपेक्षा ४० टक्के जास्त विक्री झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. हा उपक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रात न्यायचे प्रकाशक आणि वितरक मंडळींनी ठरवले आहे. आजही महाराष्ट्रात जवळपास १८ जिल्ह्यांमध्ये पुस्तकांचे दुकान नाही. त्यामुळे असे महोत्सव त्या ठिकाणी केल्यास वाचकांमध्ये निश्चितच जागृती होऊन पुस्तकांची मागणी वाढली, तर दुकानेही सुरू होऊ शकतील आणि भावी पिढ्यांची सोय होईल.

लक्ष्मण राठिवडेकर, शब्दांगण :
या उपक्रमातून प्रकाशक आणि वितरक यांचे झालेले संघटन फार महत्त्वाचे वाटले. वाचकांपर्यंत जास्तीत जास्त पुस्तके पोहोचवणे आणि त्यायोगे वाचकांना जागृत करणे या अशा प्रकारच्या एकीतून शक्य होईल, असा विश्वास वाटतो. या अभियानामुळे पुस्तक विक्रीत निश्चितच वाढ झाली आणि ही उत्साहाची बाब आहे. वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळाला; पण अजूनही तरुण पिढी म्हणावी तितकी मराठी पुस्तकांच्या खरेदीकडे वळलेली दिसली नाही. येणाऱ्या ग्राहकांमध्ये पस्तिशीच्या पुढचे वाचक जास्त असल्याचे दृश्य होते. या प्रकारची अभियाने वर्षातून दोन-तीन वेळा व्हायला हवीत आणि मुख्यतः बाल-कुमार यांच्यासाठी खास अभियाने असायला हवीत.

रमेश राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी :
या अभियानामुळे वाचकांपर्यंत एक चांगला संदेश गेला. आपला आवडता लेखक भेटणे, त्याचे विचार ऐकणे, त्याच्याशी बोलणे, त्याची स्वाक्षरी घेणे याचा आनंद वाचकांना या निमित्ताने घेता आला. ‘अक्षरधारा’ला पुस्तकविक्री क्षेत्रात २२ वर्षांचा आणि ५७५ प्रदर्शनांचा अनुभव आहे. या अभियानाचादेखील आम्हाला चांगला अनुभव आला. उत्तम विक्री झाली. आमचे स्वतःचे जवळपास सात हजार सभासद आहेत. त्यांना आम्ही कळविले होते. याशिवाय काही वाचक हा उत्सव कसला आहे, कसा आहे, या उत्सुकतेपोटी दुकानात आले होते. या अभियानातून वाचकांमध्ये उत्सुकता नक्कीच वाढली. काही ग्राहकांनी मात्र ‘उत्तम साहित्य देणारे अधिक प्रकाशक हवे होते,’ असे आवर्जून सांगितले. त्या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करता येतील. मुलांसाठी पुस्तके काढणारे अधिक प्रकाशक हवे होते, असेही निरीक्षण बऱ्याच जणांनी नोंदवले; पण एकुणात वाचकांचा प्रतिसाद खूपच चांगला मिळाला. काही जणांनी तर ‘हे अभियान १० दिवसच का? महिनाभर हवे होते,’ असेही सांगितले.

आशिश पाटकर, मनोविकास प्रकाशन :
प्रकाशक आणि विक्रेते यांनी पुस्तके लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे नेली, तर पुस्तकांना निश्चितपणे उठाव आहे, हे या महोत्सवातून ठळकपणे जाणवले. त्यामुळे वाचन जागर अभियानाचा हा प्राथमिक प्रयोग, हा प्रकाशक आणि वितरक यांच्या दृष्टीने दिशादर्शक ठरला हे महत्त्वाचे. लोकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता. सर्व लेखकांनीही मनापासून सहभाग घेतला. अच्युत गोडबोले यांच्यासारख्यांनी आपल्या सर्व मीटिंग्ज कॅन्सल करून आठवडाभर सर्व ठिकाणी उपस्थिती लावली. दुकाने बंद व्हायची वेळ आली, तरी लोकांची गर्दी कायम असे. दहीहंडीच्या दिवशी तर ‘रसिक साहित्य’सारख्या वर्दळीच्या ठिकाणी दुकान बंद करताकरता लोक दाटीने आत शिरले आणि दुकान बंद केल्यावर खरेदी करून मागच्या दाराने बाहेर पडले, असा अभूतपूर्व प्रतिसाद होता. या दहा दिवसांत जवळपास ५० कार्यक्रम झाले आणि सर्वच कार्यक्रम वाचकांच्या प्रतिसादामुळे हिट झाले. यापुढे आम्ही शाळा आणि कॉलेजांमध्ये जाऊन असे अभियान राबवणार आहोत. कारण तरुण मुलामुलींमध्ये ही जागृती व्हायला हवी आहे. त्यांना माहिती (Information) आणि ज्ञान (Knowledge) यातला फरक समजावून द्यायला हवा. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरून मिळते ती माहिती आणि हातात घेऊन पुस्तक वाचल्याने मिळते ते ज्ञान, हा फरक कळायला हवा. कॉलेजच्या कट्ट्यांवर लेखक आणि पुस्तके यांच्याविषयी चर्चा व्हायला हव्यात. ‘अमुकच वाचा’ असे त्यांना कोणीतरी येऊन सांगण्यापेक्षा मुळात ‘वाचा’ हे बिंबवणे आवश्यक आहे. या अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कोणाकडून प्रायोजकत्व घेतले नव्हते. सर्वांनी आपापल्या परीने खर्च केला होता. आता मुंबई, कोल्हापूर अशा ठिकाणीही जायचे आहे. 

दत्तात्रेय पाष्टे, डायमंड पब्लिकेशन :
लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. शेवटच्या दिवशी म्हणजे १५ तारखेपर्यंत लोकांची गर्दी होती. लेखकांच्या भेटीसाठी लोकांनी उत्सुकता दाखवली. व्यक्तिमत्त्व विकास, चरित्रे, वैचारिक अशा पुस्तकांना चांगली मागणी होती आणि विक्रीही उत्तम झाली. अशा प्रकारचे उपक्रम वारंवार व्हायला हवेत.

शिल्पा जोशी, वाचक : 
हा उपक्रम अतिशय छान होता. एरव्ही एखाद्या संमेलनात लेखक मोठ्या व्यासपीठावर आणि आपण प्रेक्षकात, अशी दुरून भेट असते; पण या अभियानामुळे आवडत्या लेखकांशी अत्यंत अनौपचारिक गप्पा मारण्याचा, क्वचितच वाट्याला येणारा योग जुळून आला. लेखकांशी अगदी थेट समोरासमोर भेट आणि मनातला कुठलाही प्रश्न त्यांना थेट विचारता येण्याची सुसंधी मिळाली. दुकानामध्ये आपल्यासारखी आवड असणाऱ्या इतर वाचकांशी संवाद साधला गेला. एखाद्या पुस्तकावर गप्पा किंवा एकमेकाला पुस्तक सुचवणे हेही शेअरिंग झाले. अनिल अवचट, निरंजन घाटे यांच्याशी संवाद साधून पुस्तक लेखनामागची स्फूर्ती समजावून घेता आली.

अद्वैत धर्माधिकारी, वाचक :
मी स्वतः लेखक आणि अनुवादक आहे. हा अत्यंत छान उपक्रम होता. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या काळात सध्या लोकांचे सीरियस वाचन होत नाही. तरुणाई सोशल मीडिया किंवा टीव्हीमध्ये गुंतलेली आढळते. त्याद्वारे माहिती मिळते; पण ज्ञान मिळत नाही. लोक घरोघरी खूप पैसे खर्च करून सजावट करतात; पण पुस्तकांवर म्हणावा तितका खर्च करत नाहीत. अशा उपक्रमांमुळे नक्कीच लोकांमध्ये पुस्तकांविषयी जागृती होईल. मी स्वतः लग्न-मुंज आदी समारंभांत आवर्जून पुस्तके भेट देतो. त्यामुळे पुढच्या पिढीतही वाचनाचा वारसा पोहोचवता येऊ शकतो. या उपक्रमात लेखकांची भेट झाल्यामुळे त्यांची लिहिण्यामागची प्रेरणा समजून घेता येऊ शकली. असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत.

(यापैकी काही सभासदांच्या प्रतिपादनाचा व्हिडिओ सोबत देत आहोत. वाचन जागर महोत्सवात झालेल्या विविध कार्यक्रमांचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन https://goo.gl/aCpjNF या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहे. काही कार्यक्रमांच्या व्हिडिओ क्लिप्सही उपलब्ध आहेत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search