Next
श्री महालक्ष्मीचे कोल्हापूर
BOI
Wednesday, February 06, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

श्री महालक्ष्मी, कोल्हापूर (अंबाबाई)‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागापासून आपण महाराष्ट्रातील काही पर्यटनस्थळांची माहिती घेणार आहोत. सुरुवात करू या कोल्हापूरपासून....
.............
या सदराच्या गेल्या अनेक भागांत आपण कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळे पाहिली. गेल्या भागात आपण ती सफर पूर्ण केली. आजपासून महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहू. या सफरीला सुरुवात करू कोल्हापूरकडून. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री महालक्ष्मीमुळे कोल्हापूरचे खूप महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, कोल्हापूरचे नाव कोल्हासुराच्या नावावरून ठेवले गेले. देवीने त्याला ठार मारल्याच्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत. परंतु त्याचे नाव त्या गावाला ठेवण्याची इच्छा त्याने मृत्यूसमयी प्रकट केली होती, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे कोल्हासुराच्या नावावरून कोल्हापूर नाव आले. 

कोल्हापूर हे पश्चिम चालुक्य आणि राजा चोल आणि त्यांचे धाकटे भाऊ राजेंद्र चोल यांच्यातील संघर्षाचे केंद्र होते. सन १०५२मध्ये कोप्पमच्या (सध्याचे खिद्रापूर) लढाईनंतर राजेंद्र चोल दुसरा विजयी झाला आणि कोल्हापूर येथे गेला. त्यानंतर राष्ट्रकूट आले. राष्ट्रकूटांचे पतन झाल्यावर कोल्हापूर येथे शिलाहार राजे राज्य करीत होते. त्यांनी दक्षिणेकडील महाराष्ट्रावर राज्य केले. सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव भागात त्यांची सत्ता होती. ब्रह्मपुरी या मूळ गावाचा विस्तार होऊन कोल्हापूर झाले. या परिसराने कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटी पाहिल्या. सन १६७५पासून हा भाग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. महाराणी ताराबाईंनी १७०७मध्ये येथे वेगळ्या राज्याची निर्मिती केली. त्या कोल्हापूर संस्थानाची आजही ओळख आहे. 

कोल्हापूरला कुस्तीशौकिनांची पंढरी समजले जाते. प्रत्येक पेठेत तालीम आहे आणि प्रत्येकाला आपल्या तालमीचा अभिमान असतो. कोल्हापूर हे खवय्यांचे गाव आहे. येथील तांबड्या व पांढऱ्या रश्श्याची खासियत नाव घेताच तोंडाला पाणी सुटावे अशी आहे. रांगडी कोल्हापुरी माणसे मनाने मोकळीढाकळी आणि बिनधास्त असतात. कोल्हापूर शैक्षणिक, औद्योगिक व सहकारी क्षेत्रात आघाडीवर आहे. कला व संस्कृतीचे हे माहेरघर आहे. अनेक लेखक, कवी, अभिनेते, गायक, कुस्तीगीर, लोकनाट्यकार, संगीतकार, वादक, विचारवंत या भूमीने देशाला दिले. त्यांची यादी फार मोठी होईल. महाराणी ताराराणीबाईसाहेबांचे कर्तृत्व आणि राजर्षी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजे यांनी आपल्या विचारांचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रावर उठविला. 

श्री महालक्ष्मी मंदिर

श्री महालक्ष्मी मंदिर हे पौराणिक उल्लेखानुसार १०८ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर केव्हा व कोणी बांधले, याबाबत अनेक विचारप्रवाह आहेत; मात्र एक नक्की, की साधारण इ. स. ७००व्या शतकात याची उभारणी झाली असावी. मंदिरातील रचनेनुसार काळानुरुप त्यात सुधारणा झाली असावी, असा अंदाज बांधता येतो. सन ९०० ते सन ११००च्या दरम्यान झालेल्या भूकंपामुळे मंदिराची पडझड झाली होती. त्या वेळी शिलाहार राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराची शिखर रचना अलीकडील २००-३०० वर्षांतील असावी. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये बहामनी व मुघल सुलतानांनी केलेल्या आक्रमणाच्या वेळी महालक्ष्मीची मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. पुढे इ. स. १७२२मध्ये दुसऱ्या संभाजी महाराजांनी मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. सिधोजी हिंदूराव घोरपडे यांनी ही कामगिरी पार पाडली. या मंदिराची चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार व अगदी शेवटी कोल्हापूर संस्थानाकडून दुरुस्ती व विकास झाला आहे. 

श्री महालक्ष्मी मंदिर

हे मंदिर पश्चिमाभिमुख असून, पश्चिमेकडे महाद्वार आहे. अलीकडच्या काळात बांधलेला मराठा शैलीतील सभामंडप असून, तो लाकडी, सुरूच्या खांबांचा असून, त्याला महिरपीप्रमाणे कमानी आहेत. गेल्या एक हजार वर्षांत मंदिराची अनेकदा वाढ व दुरुस्ती झाली आहे. मंदिराला चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्वेकडे देवीचा गाभारा व रंगमंडप हा सर्वांत जुना भाग आहे. उत्तरेस महाकालीचा गाभारा, तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा आहे. या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपाला महानाटमंडप म्हणतात. मूर्तीच्या जवळ असलेला सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी जगदंबेचे रूप आहे, असे मानतात. देवीची दगडी मूर्ती ४० किलोग्रॅम वजनाची असून, मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. देवीचा अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग अत्यंत कल्पकतेने बांधलेला आहे. तसेच मंदिर परिसरात देवता, सूर्य, महिषासुरमर्दिनी, विठ्ठल-रखुमाई, शिव, विष्णु, तुळजाभवानी इत्यादी मूर्ती व पूजास्थाने आहेत. तसेच विश्वेश्वर महादेव मंदिरदेखील आहे. 

रंकाळा तलाव

रंकाळा तलाव :
हे कोल्हापूरकरांचे, तसेच पर्यटकांचे आवडीचे ठिकाण. पूर्वी येथे दगडखाण होती. पूर्वी नवव्या शतकात झालेल्या भूकंपामुळे भूमिगत पाणी या ठिकाणी प्रवाहित झाले असावे. त्यामुळे हे सरोवर तयार झाले असावे, असेही मानण्यात येते. हा तलाव पन्हाळ्याशी भुयारी मार्गाने जोडला आहे, अशी दंतकथा आहे. या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्याच्या नावावरून या तलावास रंकाळा हे नाव पडले आहे. १० किलोमीटर परीघ असलेल्या या तलावाचे क्षेत्र २०२ चौरस हेक्टर आहे. अंदाजे खोली ३० फुटांपेक्षाही जास्त आहे. महापालिकेमार्फत येथे नौकानयनाच्या सुविधाही आहेत. 

रंकाळा तलावावरील सूर्यास्त

संध्याकाळी पर्यटक व कोल्हापूरकरांची पावले इकडे वळतातच. मुंबईच्या चौपाटीप्रमाणे गर्दीमुळे फुलणाऱ्या या ठिकाणाचे रंकाळा चौपाटी असे नामकरण झाले आहे. चौपाटीवर मिळणाऱ्या सर्व पदार्थांची येथे रेलचेल असते. दक्षिणेस असलेला शालिनी पॅलेस, दक्षिण पूर्व बाजूला असलेले पद्माराजे उद्यान यामुळे तलावाची शोभा वाढली आहे. 

संध्यामठ

तलावाच्या काठावर संध्यामठ, तसेच पौराणिक संदर्भ असलेली नंदीची एक मोठी मूर्ती असलेले देवालय आहे. जैन कथानकानुसार, खाणीतून काढलेल्या दगडांतून राजा गंडरादित्य याने जी ३६० जैन मंदिरे बांधली, त्यांना, तसेच महालक्ष्मीच्या देवळालाही दगडांचा पुरवठा येथून करण्यात आला. 

शालिनी पॅलेस

भवानी मंडप :
हे कोल्हापुरातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. कोल्हापूर शासकीय व्यवस्थापनात आल्यावर सन १८१३मध्ये त्या वेळचे दिवाण सर सदाखान यांनी येथे सुधारणा केल्या. येथे भव्य व जुन्या इमारती आहेत. त्याच्या मध्यभागी कोल्हापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिर आहे. येथेच शाहूमहाराज स्मारक उभारण्यात आले आहे. शाहूमहाराजांनी शिकार केलेले वाघ व इतर प्राणी स्मारकामध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला छोटे शिवमंदिर आहे. मंदिराच्या समोर सुंदर महाल आहे. १९२६ ते ३०च्या दरम्यान छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यात सुधारणा केली. त्याच्यामध्ये त्यांनी लाकडाच्या कमानी, तसेच हॉलची उंची वाढविली. विठ्ठल मंदिर भवानी मंडपापासून अर्धा किलोमीटर दक्षिणेला सुंदर कोरीव अशा काळ्या दगडामध्ये हेमाडपंती पद्धतीने बांधलेले आहे

भवानी मंडप

कोल्हापुरातील अन्य अनेक ठिकाणांची माहिती पुढील भागात घेऊ या. 

कोल्हापूर हे ठिकाण रेल्वे, हवाई व रस्ते मार्गाने भारताशी जोडलेले आहे. राहण्याची, भोजनाची खास कोल्हापुरी व्यवस्था उपलब्ध असून, येथे वर्षभर यात्रेकरू व पर्यटक येतच असतात. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vaibhav Sane About 196 Days ago
Very nice info.. Thank you.. Waiting for more posts
0
0
जयश्री चारेकर About 200 Days ago
छान माहिती मिळाली. पुन्हा नव्याने बघता येईल कोल्हापूर .
0
0

Select Language
Share Link
 
Search