Next
दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतकमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन
२० ते २२ सप्टेंबर रोजी कार्यक्रम
BOI
Monday, September 16, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this article:

दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या शतक महोत्सवी सोहळ्याबाबत माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र जोशी. सोबत असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर.

पुणे : ‘शब्दांमधला अर्थ कागदावर उमटवण्याचे कसब हे मुद्रकाकडेच असते. अशाच मुद्रकांनी एकत्र येत १९१९ साली पुण्यात भारतातील मुद्रण व्यावसायिकांच्या पहिल्या संस्थेची स्थापना केली. हीच दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन आपल्या स्थापनेची शंभरी साजरी करीत आहे. याचेच औचित्य साधत संस्थेच्या वतीने शतकमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मुद्रक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

‘येत्या शनिवारी, २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हयात रिजन्सी हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले. असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर या वेळी उपस्थित होते.  

याविषयी अधिक माहिती देताना रवींद्र जोशी म्हणाले, ‘इंग्रजांच्या काळात मुद्रण व्यवसायाने पुणे शहरात बाळसे धरले. पहिल्या महायुद्धानंतर शाई व कागद यांचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर मुद्रकांना संघटना स्थापन करीत एकत्र येण्याची गरज भासू लागली. या वेळी पुण्यातील आर्यभूषण, चित्रशाळा, केसरी आदी नामवंत मुद्रणालयांच्या मालकांबरोबर बालोद्यान मुद्रणालयाचे मालक बाबुराव सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने १९ मे १९१९ रोजी शहरातील २० ध्येयवादी मुद्रकांनी एकत्र येत मुद्रण क्षेत्राचा प्रसार, प्रचार व्हावा, नव्या तंत्रज्ञांनाची माहिती मुद्रकांना व्हावी या उद्देशाने दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनची स्थापना केली. मुद्रकांनी मुद्रकांसाठी व या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांसाठी स्थापन केलेली जगातील पहिली व सर्वांत जुनी संस्था. विशेष म्हणजे पुढे दिल्ली येथील अखिल भारतीय मुद्रक संघ, महाराष्ट्र मुद्रण परिषद आणि पुणे जिल्हा मुद्रण संघ यांची स्थापनादेखील दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनने केली. हीच संस्था आता आपली शंभरी साजरी करत असून, यानिमित्ताने शतक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवार दि. २१ ऑगस्ट रोजी पंजाब केसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य संपादक आणि पीटीआयचे अध्यक्ष विजयकुमार चोपडा यांना मुद्रण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे. याबरोबरच मुद्रण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आठ व्यक्तींचादेखील संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका ज्येष्ठ महिला मुद्रकाचादेखील समावेश आहे. संस्थेच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा असलेल्या ‘शतमुद्रा’ या ग्रंथाचे प्रकाशन, गेली ८० वर्षे संस्थेच्या वतीने काढण्यात येत असलेल्या ‘मुद्रण प्रकाश’ या मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन आणि मुद्रणविषयक खास पोस्टल स्टॅम्प व पाकिटाचेही अनावरण या वेळी करण्यात येणार आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची झलक दाखविणाऱ्या ‘कथा शंभर पानांची’ या माहितीपटाचे प्रदर्शनही या वेळी करण्यात येईल.’

‘सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, टोयो इंक इंडियाचे अध्यक्ष हरुहीको अकुत्सू सान, टेकनोवा इमॅजिंग सिस्टिम्सचे अध्यक्ष प्रणव पारीख, पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल एस. एफ. एच. रिज्वी, हरियाणाच्या दिनबंधू छोटू राम विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेंद्रकुमार अनायथ हे या वेळी उपस्थित असतील. याबरोबरच २० व २२ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मुद्रक संघाची सर्वसाधारण सभा व नियामक मंडळाची बैठकही या ठिकाणी पार पडेल ज्यामध्ये देशभरातील तब्बल ६०० ते ७०० मुद्रक सहभागी होणार आहेत,’ असेही जोशी यांनी सांगितले.

‘आज मुद्रण क्षेत्र हे जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे व्यवसाय निर्मिती करणारे क्षेत्र असून भारतामध्ये सुमारे तीन लाख मुद्रक आहेत. याबरोबरच सुमारे ३५ ते ४० लाखांहून अधिक नागरिकांना या क्षेत्रामुळे रोजगार मिळतो. असे असताना मुद्रण व्यवसायाचा प्रचार, प्रसार होण्याबरोबरच या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मुद्रकांना मिळावी, त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांवर उत्तरे मिळावीत, चर्चा व्हावी या उद्देशाने दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन एक संघटन म्हणून कार्यरत आहे. मुद्रण क्षेत्राबरोबरच संस्था सामाजिक क्षेत्रातही हिरीरीने सहभागी होत आहे,’ असेही जोशी यांनी सांगितले.

दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘नजीकच्या भविष्यात मुद्रण क्षेत्राच्या क्रांतीची माहिती देणाऱ्या एका संग्रहालयाची उभारणी संस्थेच्या वतीने पुणे शहरात करण्याचा आमचा मानस आहे. ज्यामध्ये ५०० वर्षांचा मुद्रण कलेचा इतिहास, काळाप्रमाणे बदलत असलेले तंत्रज्ञान, आलेली स्थित्यंतरे, बदलत चाललेली मशिनरी, या विषयाशी संबंधित पुस्तके, छायाचित्रे, प्रदर्शनी यांचा समावेश यांचा समावेश असेल. याशिवाय शास्त्री रस्त्यावर असलेल्या संस्थेच्या १० हजार स्केअर फूट जागेचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी एक ‘मुद्रण मॉल’ बनविण्याचे संस्थेचे स्वप्न आहे. या मुद्रण मॉलमध्ये मुद्रणाशी संबंधित सर्व वस्तुंची दालने असणार असून, याचा फायदा मुद्रण व्यवसायिकाला एकाच छताखाली मुद्रणाशी संबंधित सर्व गोष्टी मिळण्यासाठी होईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search