Next
दुष्काळाशी दोन हात; आदिवासी शेतकऱ्याचा धडगाव पॅटर्न
वॉटर बँकेतून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा; पाणीवापराची आचारसंहिता
शशिकांत घासकडबी
Monday, November 12, 2018 | 02:15 PM
15 1 0
Share this storyनंदुरबार :
दुष्काळावर मात करण्यासाठी विविध स्तरांवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु त्या १०० टक्के यशस्वी होतातच असे नाही. परंतु गावपातळीवर एखादी व्यक्ती वा समूह स्वयंप्रेरणेने काम करून पाणी नियोजन करतात, त्या वेळी त्यांनी केलेले काम अनेकांना प्रेरणादायी ठरते. त्यापैकीच एक म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी शेतकऱ्याने केलेला पाणी नियोजनाचा नवीन धडगाव पॅटर्न.

‌नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील काकरदा येथील वसंत पाडवी यांनी उभारलेली ‘वॉटर बँक’ राज्यभर कौतुकाचा विषय ठरली आहे. आदिवासी असलेल्या वसंत पाडवी या शेतकऱ्याला ‘वॉटर बँके’ची कल्पना सुचली आणि त्याने आठ-१० शेतकऱ्यांना एकत्र करून शासनाच्या सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले. परंतु शासनाकडून मिळालेल्या अनुदानात या शेतकऱ्यांच्या मनात असलेले मोठे शेततळे तयार होणार नव्हते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपले स्वत:चे पैसे घालून ४० गुंठे जमिनीवर (एक एकर) श्रमदानातून शेततळे तयार केले. त्यात पावसाळ्यातील पाणी साठवून मत्स्य व्यवसाय सुरू केला. त्यातून वॉटर बँकेची देखभाल, दुरुस्ती यांचा खर्च निघून शेतकऱ्यांना ४० हजारांचा नफा झाला आहे. 

मत्स्य व्यवसायासारखा पूरक व्यवसाय तर या शेतकऱ्यांनी सुरू केलाच. परंतु या वॉटर बँकेतून अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पाणीपुरवठा केला. हा पाणीपुरवठा करताना या शेतकऱ्यांनी एक आचारसंहिता तयार केली. त्यानुसार, साठवलेले पाणी पिकांना जास्त काळ देता यावे, यासाठी एका दिवसाआड प्रत्येक शेतकऱ्याला २० मिनिटे पाणी देण्यात येते; मात्र पाण्याचा वापर करताना ठिबक (ड्रिप), तुषार (स्प्रिंकल) सिंचनाचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

पाण्याची बचत करत असताना, आंबा, सीताफळ, आवळा, लिंबू, काजू यांसारख्या फळझाडांसह भाजीपाला लावण्यावर त्यांनी भर दिला आहे. काकरदा येथील शेतकऱ्यांनी केलेला हा नवीन प्रयोग राज्यातील दुष्काळी परिस्थितीत आदर्श ठरेल असा आहे. पाणी साठवताना पाण्याच्या वापरासाठीदेखील राज्यात आचारसंहिता तयार करण्याचे या आदिवासींचे सूत्र सरकारने आणि इतर शेतकऱ्यांनी स्वीकारणे गरजेचे आहे. केवळ आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत. परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली पाहिजे. त्यासाठी गावपातळीवर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीपूरक उपक्रम हातात घेणे गरजेचे आहे. 

सरकारनेदेखील वसंत पाडवींचा वॉटर बँकेचा उपक्रम राज्यात कशा प्रकारे राबविता येईल, यावर विचार करून अंमलबजावणी केली तर फायदेशीर ठरू शकेल. दुष्काळाचे सावट राज्यावर असताना एक आदिवासी शेतकरी ‘वॉटर बँक’ स्थापन करून एक नवा आदर्श निर्माण करतो, हे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांनी भविष्यासाठी स्वत: पाण्याचे स्रोत शोधणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि त्या आधारे भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. शासनाचे अनुदान, चारा, छावण्या हे तात्पुरते उपाय असतात. स्वबळावर आत्मनिर्भरतेने जगण्यासाठी शेतकऱ्यांनी आता सज्ज झाले पाहिजे. ते महत्त्व अधोरेखित करण्याचे काम हा पॅटर्न करतो. 
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मंगला पेन्डसे About 87 Days ago
नमस्कार खूप छान माहिती याचा विचार अनेकांना माहीत नाही. कळवते पुढे.
0
0

Select Language
Share Link