Next
‘ई-टॉयलेटमुळे स्मार्ट सिटी उपक्रमाला बळ मिळेल’
प्रेस रिलीज
Tuesday, July 17, 2018 | 05:13 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘डेक्कन, फर्ग्युसन रस्ता हा वर्दळीचा आणि भर शहरवस्तीचा भाग आहे. अशा ठिकाणी लायन्स क्लबकडून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहामुळे महिलांची सोय होणार आहे. या ‘ई-टॉयलेट’मुळे पुण्यासाठी महत्त्वाकांशी असलेल्या स्मार्ट सिटी उपक्रमाला बळ मिळेल,’ असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्याकडून महिलांसाठी शहरात उभारण्यात येणाऱ्या १० ई-टॉयलेटपैकी पहिल्या ई-टॉयलेटचे महापौरांच्या हस्ते डेक्कन कॉर्नर येथील खंडूजी बाबा चौकात उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, माजी प्रांतपाल द्वारका जालान, संदीप मालू, लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष विजय भंडारी, सचिव राजीव अगरवाल, सहसचिव सुनील शहा, कोषाध्यक्ष संजय डागा व डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन सिग्नेचर प्रोजेक्ट श्याम खंडेलवाल आदी उपस्थित होते.

या प्रसंगी ई-टॉयलेटसाठी अर्थसहाय्य देणाऱ्या सुभाष गुप्ता व सुशीला गुप्ता, उत्पादक सॅमटेकचे शोबित गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला.

टिळक म्हणाल्या, ‘नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लायन्स व रोटरी क्लब यांसारख्या स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या, तर शहराचा चेहरामोहरा बदलेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने या स्वच्छतागृहाला जास्त पाणी लागणार नाही. पाण्याचा गैरवापर होणार नाही.’

भंडारी म्हणाले, ‘यंदा क्लब तीन ‘ई’वर काम करीत आहे. त्यामध्ये ई-लर्निंग, ई-स्वच्छता आणि ईन्व्हायरॉन्मेंटचा समावेश आहे. त्याअंतर्गत १०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड (इंटरॅक्टिव्ह), १० ई-टॉयलेट आणि हडपसर-सातववाडी येथील ऋषी आनंदवन उद्यानाचे संवर्धन केले जाणार आहे. या सर्व उपक्रमांसाठी जवळपास चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेने ५० टक्के अनुदान दिल्यास अशी २० टॉयलेट आणि २०० स्मार्ट बोर्ड बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

पुण्याला स्मार्ट करण्यासाठी लायन्स सातत्याने योगदान देत असल्याचे रमेश शहा यांनी सांगितले. खडकी शिक्षण संस्थेच्या चेतन दत्ताजी गायकवाड येथे पहिला स्मार्ट बोर्ड बसविण्यात आला. या स्मार्ट बोर्डबरोबर अभ्यासक्रमही देण्यात आला आहे. उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते पाच स्मार्ट बोर्ड बसविण्यात आले. खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते सातववाडी येथील ऋषी आनंद उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. या उद्यानासाठी क्लबकडून ४० लाखांचा निधी दिला जाणार आहे.


ई-टॉयलेटची वैशिष्ट्ये :
शहरवस्तीत महिलांना स्वच्छतागृहाची होणारी अडचण लक्षात घेऊन १५ लाख रुपये किंमतीची १० ई-टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. अतिशय अत्याधुनिक असे हे स्वच्छतागृह असून, प्रवेशासाठी एक रुपयाचा कॉईन टाकावा लागेल. आतमध्ये इमर्जन्सी बटन, फॅन, एक्झॉस फॅन, स्वयंचलित फ्लश, कमोड साफ करण्याची यंत्रणा आहे. या टॉयलेटच्या देखभालीसाठी क्लबमार्फत एक व्यक्ती नेमला जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link