Next
सोनाराने (परत) टोचले कान...!
BOI
Monday, May 08, 2017 | 06:45 AM
15 6 0
Share this article:

इंग्रजीचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे, हे वेगवेगळ्या माध्यमांतून सध्या दिसून येत आहे. युरोपीय आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर यांनी तर इंग्रजीचा प्रभाव कमी होत असल्याचे कारण देऊन युरोपीय महासंघाच्या परिषदेत फ्रेंचमध्ये भाषण केले. त्या निमित्ताने, इंग्रजीच्या घटत्या प्रभावाबद्दल...
...........
जीन क्लॉड जंकरमागणी व पुरवठा हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात, हे अर्थशास्त्रातले साधे तत्त्व आहे. पुरवठा वाढला, की मागणी कमी होते आणि मागणी वाढली की पुरवठा कमी होतो, असे हा सिद्धांत सांगतो. इंग्रजीबाबत आज नेमके हेच होत आहे. अर्थात इंग्रजी हेच आपल्या उज्ज्वल भविष्याचे तिकीट आहे, असे मानणाऱ्यांना हे इतक्यात पटणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला म्हणून सगळ्याच भाबड्या समजुती दूर होतील, असे नाही. 

...मात्र कधी कधी दूरदेशीचे सोनारच कान टोचून देतात आणि बहिरेपणाची सोंगे गळून पडतात. युरोपीय आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉड जंकर हे या सोनारांच्या मांदियाळीतील नवे नाव. जगाच्या पाठीवर यशस्वी व्हायचे असेल, तर इंग्रजी आलीच पाहिजे असे सांगणाऱ्यांना या जंकर महाशयांनी जबरदस्त चपराक लगावली आहे. काय केले त्यांनी?

इंग्रजी भाषेचा प्रभाव दिवसेंदिवस लुप्त होत आहे. म्हणून मी इंग्रजीत भाषण देणार नाही,’ असे या जंकर महाशयांनी सांगून टाकले, तेही युरोपीय महासंघाच्या एका परिषदेत. ती होती इटलीत आणि जंकर यांनी एवढे हे वाक्य इंग्रजीत उच्चारल्यानंतर फ्रेंच भाषेत बोलणे सुरू केले. त्यांच्या या वाक्याला उपस्थित अधिकारी, नेते व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला, ही त्यावरची आणखी एक कडी होती. जंकर यांना अनेक भाषा अस्खलिखितपणे अवगत आहेत आणि विविध कार्यक्रमांत ते नियमितपणे इंग्रजी बोलतात, हे येथे नमूद करण्याजोगे. अर्थात त्यांच्या या विधानाला ‘ब्रेक्झिट’चा संदर्भ होता; पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही.

जंकर यांचे बोलणे प्रचारकी नाही, की नवीन नाही. गेल्या आठवड्यातच नाही का ‘केपीएमजी’ने एक अहवाल प्रसिद्ध करून त्याचे सूतोवाच केले होते? भारतीय भाषांमध्ये आंतरजालाचा (इंटरनेट) वापर करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, भारतीय (मुख्यतः हिंदी) भाषकांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ष २०२१पर्यंत इंग्रजीला मागे टाकून आंतरजालावरील भारतीय भाषकांची संख्या २० कोटी एवढी होईल, असा अंदाज ‘केपीएमजी’ने व्यक्त केला आहे.

आणखी चार वर्षांनी म्हणजे २०२१पर्यंत आंतरजालावर ५३.६ कोटी लोक स्वतःच्या भाषांमध्ये व्यवहार करतील. भारतीय भाषांमध्ये आंतरजाल वापरणारे लोक मोठ्या संख्येने सरकारी सेवा, जाहिराती व बातम्या स्वभाषेत पाहतात. गेल्या वर्षी, २०१६मध्ये भारतीय भाषांमध्ये आंतरजालावर मुशाफिरी करणाऱ्यांची संख्या २३.४ कोटी एवढी होती, तर १७.७ कोटी जणांनी हा वापर इंग्रजीतून केला, असे हा अहवाल सांगतो. 

इथे आणखी एक गंमत आहे. हिंदीचा व्याप पाहून आपल्याला वाटू शकते, की इंग्रजीला आव्हान तीच भाषा देईल. परंतु आंतरजालावरील भारतीय भाषांमध्ये तमीळ पहिल्या आणि हिंदी दुसऱ्या जागी आहे. कन्नड, बंगाली व मराठी भाषांचा क्रमांक त्यानंतर येतो. अर्थात जंकर आणि केपीएमजी आज जे सांगत आहेत ती गोष्ट याआधीही अनेकांनी सांगितली आहे. फक्त ‘फेअर अँड लव्हली’ विकाराची बाधा झालेल्या भारतीय समाजाला ती समजून घ्यायची नाहीये. 

‘हिंदी आणि अन्य प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची ऑनलाइन विक्री गेल्या काही काळात वाढतच चालली आहे. केवळ गेल्या सहा महिन्यांत भारतात हिंदी पुस्तकांची विक्री ६० टक्क्यांनी वाढली आहे. शिवाय याच काळात हिंदी पुस्तकांचा पुरवठाही ४० टक्क्यांनी वाढला आहे,’ अशी माहिती ‘अॅमेझॉन’ने दोन वर्षांपूर्वी दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी ‘अॅमेझॉन’ने ‘किंडल’वर भारतीय भाषांतील पुस्तके वाचण्याची सोय उपलब्ध करून दिली. एप्रिल २०१४मध्ये ‘अॅमेझॉन’च्या भारतीय शाखेने हिंदी पुस्तकांची ऑनलाइन विक्री सुरू केली, त्या वेळी त्या वर्षाच्या शेवटी कंपनीने वाचकांचे एक सर्वेक्षण केले होते. तेव्हा त्यांना आढळले, की अपराधकथांचे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांच्या ‘कोलाबा षडयंत्र’ या हिंदी पुस्तकाने चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ला कितीतरी मागे टाकले होते.

थोडक्यात म्हणजे आभासी मानल्या गेलेल्या आंतरजालावर आणि प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणाऱ्या वास्तव जगातही भारतीय भाषांनी अजिबात मान टाकलेली नाही. भारतीय भाषांमधील साहित्य व लेखनाला येत्या काळात अधिकाधिक मागणी येईल, असा आशावाद व्यक्त करणाऱ्याला वेड्यात काढणाऱ्यांची संख्या मोठी आहेच. परंतु मराठीसहित अन्य भारतीय भाषांचा उभारीचा काळ अजून यायचाच आहे, याचेही पुरावे काही कमी नाहीत.

त्यामुळे इंग्रजी शिकली की लौकिक यशाचा परवाना मिळाला, यावर ज्यांची श्रद्धा ‘फिक्स’ झालेली आहे त्यांनी डोळे उघडून पाहावे, अशी ही स्थिती आहे. कारणे सोपी आहेत. गुगल ट्रान्स्लेट असो की विकिपीडिया, ज्ञानासाठी निव्वळ इंग्रजीवर विसंबून राहण्याची गरज आता राहिलेली नाही. दुसरीकडे जन्मणाऱ्या प्रत्येक बाळाला इंग्रजीचे बाळकडू देण्याचा अट्टाहास! मग हीच बाळे मोठी झाल्यावर ती सगळीच अंगातील वाघिणीचे दूध दाखवणार. मग तेव्हा फक्त इंग्रजी येते, यावर गुजराण व्हायची नाही, तर त्याहून अधिक काही कौशल्ये अंगी आहेत अशाच व्यक्तीला संधी मिळणार. मग हे कौशल्य कोणते तर ते स्थानिक भाषेचे!

पाच-सहा वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेच्या भवितव्यासंदर्भात ‘ब्रिटिश कौन्सिल’ने डेव्हिड ग्रॅडॉल यांना अभ्यास करण्यास सांगितले. ग्रॅडॉल यांचा अहवाल ‘इंग्लिश नेक्स्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे (आणि इंग्रजीतील अन्य साहित्याप्रमाणेच आंतरजालावर मोफत उपलब्ध आहे). त्यात ग्रॅडॉल म्हणतात, ‘युरोपीय महासंघात (आणि जगात इतरत्रही) इंग्रजी शिकणे तुलनेने स्वस्त आहे. परंतु अन्य भाषा शिकण्यासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे परकीय भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यातून मिळणारे उत्पन्न येत्या काळात कमी होण्याची शक्यता आहे.’

आता यातून काही बोध घ्यायचा का नाही, हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. भाषा ही काय बोलले ते सांगते, समजून घ्यायचे का नाही, याबाबत ती काहीही करू शकत नाही!

- देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com 

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)
 
15 6 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search