Next
वारसा गुटेनबर्गच्या वंशजांचा
BOI
Monday, January 22, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

ई-पुस्तकांचे वर्तुळ वाढले असले, तरी छापील पुस्तकांवर वाचकांच्या उड्या पडत आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या नऊ दिवसांच्या जागतिक पुस्तक मेळाव्याला १२ लाख जणांनी भेट दिली असून, ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा दोन लाखांनी अधिक आहे. ई-पुस्तक असो वा छापील पुस्तक, हे गुटेनबर्गचे वंशज आहेत. ते या ना त्या स्वरूपात आपल्याभोवती राहणार आहेत. गरज आहे ती त्यांच्यापर्यंत जाण्याची.
...........
इ. स. १४५६मध्ये योहान्स गुटेनबर्ग नावाच्या तंत्रज्ञाने छपाईच्या यंत्राचा शोध लावला. त्याचा उद्देश मुख्यतः बायबल छापण्याचा होता, तरी संदेशवहनाच्या प्रांतात ती एक क्रांती होती. शतकानुशतके चालत आलेली हस्तलिखितांची पद्धत या नव्या शोधाने इतिहासजमा केली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना हस्तलिखितात होणाऱ्या पाठभेदांनाही त्यामुळे पूर्णविराम मिळाला.

त्यानंतर १८३० साली स्टीम प्रिंटिंग मशीनचा शोध लागला आणि मुद्रित माध्यमांनी काळाची गणिते बदलली. या यंत्रामुळे छपाई अधिक सुलभतेने करता येऊ लागली. त्यानंतर एका शतकभराने रोटरी मशीनचा शोध लागला. त्यामुळे तर काही मिनिटांत हजारो वर्तमानपत्रे छापता येऊ लागली. त्यानंतर वर्तमानपत्रांच्या क्षेत्रात छपाई यंत्रांच्या संदर्भात मोठा विकास झाला. प्रत्येत दशकात यंत्रांमध्ये होणाऱ्या प्रगतीतून वर्तमानपत्रांचा दर्जा आणि संख्या या दोन्हींमध्ये वाढ करणे शक्य होत गेले.

त्यानंतरची क्रांती घडली इंटरनेटच्या (आंतरजाल) आगमनानंतर. साधारण २५ वर्षांपूर्वी लागलेल्या या शोधाने आज प्रत्येक प्रकारच्या माध्यमांचे स्वरूप पालटून टाकले आहे. पुस्तकांच्या बाबतीतही काही वेगळी कथा नव्हती. आंतरजालामुळे ई-पुस्तकांची सद्दी सुरू झाली. जसजसा या पुस्तकांचा वापर वाढला, तसतसे वाचकांच्या मनात प्रकाशित पुस्तकांच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. हा तंत्रज्ञानाचा झपाटा एवढा जबरदस्त होता, की पश्चिमेतील अनेक मोठमोठ्या पुस्तक दुकानांनी टाळे लावले. ‘न्यूजवीक’सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकाने छापील आवृत्ती बंद केली. त्याच्याच आगे-मागे ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’सारख्या पुरातन विश्वकोशानेही आपला छापील गाशा गुंडाळला. आकड्यांच्या स्वरूपात पाहिले, तरी ई-पुस्तकांचा प्रसार किती मोठ्या प्रमाणात झाला हे लक्षात येईल. ऑगस्टच्या २००९च्या सुमारास आंतरजालावर सुमारे दोन लाख ई-पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध होती. केवळ एका वर्षाने म्हणजेच डिसेंबर २०१०पर्यंत एकट्या गुगलने ३० लाख ई-पुस्तके उपलब्ध करून दिली होती. वर्ष २०१२ तर असे आले, की त्या वर्षी छापील पुस्तकांपेक्षा ऑनलाइन पुस्तकांचे वितरण जास्त झाले.

सुटसुटीत आकार असल्याने कुठेही नेता येणे, बॅटरीचे दीर्घ आयुष्य ही ई-रीडरची काही बलस्थाने. त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे ई-इंक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या साधनावर वाचन करणे अगदी जुन्या मानसिकतेच्या लोकांनाही शक्य होते. किंडल आणि ई-रीडरच्या आगमनामुळे तर प्रत्येक वर्तमानपत्र, नियतकालिक व पुस्तक वाचकाच्या अक्षरशः खिशात आले आहे. ज्यांना वेगळा ई-रीडर घ्यायचा नाही, त्यांच्यासाठी मोबाइल किंवा टॅब्लेटमध्येच ई-रीडरची किती तरी अॅप उपलब्ध आहेत. त्यामुळे ही पुस्तके आल्यावर कागदी पुस्तके कोण वाचणार, हा प्रश्न प्रकाशक व वाचकांना पडणे स्वाभाविक होते.

...मात्र ई-पुस्तक आल्यामुळे छापील पुस्तकांवर काहीही परिणाम झालेला नाही. भरमसाठ वाहिन्या आल्यानंतरही वृत्तपत्रे बंद पडली नाहीत, उलट ती अधिक देखणी आणि आशयसंपन्न झाली. त्याचप्रमाणे डिजिटल साहित्याचे आक्रमण होत राहिले, तरी मुद्रित शब्दांचे साम्राज्य अबाधित राहिले आहे. ई-पुस्तकांचे वर्तुळ वाढले असले, तरी छापील पुस्तकांचा दरारा कायम आहे आणि वाचकांच्या त्यांच्यावर उड्या पडत आहेत, असे आश्वासक चित्र समोर आले आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या २६व्या जागतिक पुस्तक मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रकाशकांचे तरी हेच म्हणणे आहे.

या मेळाव्याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. येथे येणाऱ्या पुस्तकप्रेमींच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ तर झालीच आहे, शिवाय व्यवसायातही घसघशीत वाढीची नोंद झाली आहे. प्रगती मैदान येथे झालेल्या या जागतिक पुस्तक मेळाव्यात सुमारे ८०० प्रकाशक सहभागी झाले होते. नऊ दिवस चाललेल्या या मेळाव्याला १२ लाख जणांनी भेट दिली. गेल्या वर्षी हीच संख्या १० लाख एवढी होती. विशेष म्हणजे १४ दिवस चालणाऱ्या जागतिक व्यापार मेळाव्याला भेट देणाऱ्या लोकांपेक्षाही ही जास्त संख्या होती. एकट्या ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने (एनबीटी) ८७ लाख रुपयांची पुस्तकविक्री केली. यावरून तेथील व्यावसायिक उलाढालीचा अंदाज यावा.

‘एनबीटी’चे प्रमुख बलदेवभाई शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ‘एनबीटी’ने देशात सुमारे १२ लाख पुस्तकांची विक्री केली. लोक स्वतःच्या आवडीनुसार पुस्तक वाचण्याचे माध्यम निवडू शकतात. परंतु लोकांमध्ये वाचनाची आवड असाययला पाहिजे, असे शर्मा म्हणतात.

जागतिक पातळीवरही आपल्याला हाच प्रवाह दिसतो. ‘असोसिएशन ऑफ अमेरिकन पब्लिशर्स’ या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०१७मध्ये ई-पुस्तकांच्या विक्रीत १६.९ टक्क्यांनी घट झाली. मुख्यतः ई-पुस्तकांच्या वाढत्या किंमतीमुळे ही घट झाली होती. त्यानंतरच्या महिन्यात इंग्लंडमध्येही ई-पुस्तकांची विक्री कमी झाली. कारण अॅमेझॉनने प्रकाशकांसोबत केलेल्या करारामुळे छापील पुस्तकांपेक्षा ई-पुस्तके महाग झाली होती.

आज बाजारपेठेत ई-पुस्तके, ऑडियो पुस्तके, हार्डबाउंड, तसेच पेपरबॅक पुस्तके उपलब्ध आहेत. बाजारात सर्वांना जागा आहे आणि वाचकांच्या दृष्टीनेही ‘अधिकस्य अधिकं फलम्’ या न्यायाने त्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे ई-पुस्तक आणि छापील पुस्तकांची बाजारपेठ वेगवेगळी आहे आणि त्या बाजारपेठा एकमेकांना विरोधी नाहीत. उलट कधी कधी त्या एकमेकांना पूरक म्हणूनही काम करू शकतात. काळानुसार नवनवी माध्यमे येतात. परंतु नवीन माध्यमांच्या येण्यामुळे जुन्या माध्यमांचे राज्य संपतेच असे नाही. वाचक प्रवासात ई-पुस्तक वाचतील किंवा ऐकतील. परंतु पुस्तक छातीवर ठेवून किंवा डोक्याशी ठेवून झोपण्याची वाचकांची सवय अद्याप गेलेली नाही. घाई-गडबडीत वाचक ई-पुस्तक वाचतीलही. परंतु त्यांना निवांत आस्वाद घ्यायचा असेल तेव्हा त्यांना पुस्तकाकडेच वळावे लागेल.

ई-पुस्तक (इलेक्ट्रॉनिक पुस्तक) हे कागदाऐवजी डिजिटल स्वरूपात असते. हे पुस्तक संगणक, मोबाइल किंवा अन्य डिजिटल उपकरणांवर वाचता येऊ शकते. ई-पुस्तके पहिल्यांदा आली, तेव्हा प्रकाशकांमध्ये चिंतेचे वातावरण होते, की आता छापील पुस्तके कोण घेणार? परंतु या पुस्तकांची प्रकाशकांना मदतच झाल्याचे समोर येत आहे. ई-पुस्तक आणि छापील पुस्तकांची बाजारपेठ वेगवेगळी आहे. गुगल बुक्स, बुकगंगा डॉट कॉम किंवा डेली हंट यांसारख्या संकेतस्थळांवरून ई-पुस्तके घेतली जात आहेत, वाचली जात आहेत. दुसरीकडे छापील पुस्तकेही खपत आहेत.

हा लेख लिहीत असताना पुण्यातील एका कार्यक्रमातील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे. ‘वाचक कमी झाले आहेत, अशी उगाचच ओरड केली जाते. प्रत्यक्षात प्रकाशकांची वितरण व्यवस्था कमकुवत झाली आहे,’ असे तावडे त्यात म्हणाले आहेत. तावडे यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. वाचक कुठेही गेलेले नाहीत, त्यांना पुस्तकापर्यंत घेऊन जाणारी दिशाचिन्हे गायब झाली आहेत. ई-पुस्तक असो वा छापील पुस्तक, हे गुटेनबर्गचे वंशज आहेत. ते या ना त्या स्वरूपात आपल्याभोवती राहणार आहेत. गरज आहे ती त्यांच्यापर्यंत जाण्याची.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search