Next
सुनील गावस्कर, परवीन सुलताना, आलोकनाथ
BOI
Tuesday, July 10, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर, शास्त्रीय गायिका परवीन सुलताना आणि चरित्र अभिनेते आलोकनाथ यांचा दहा जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......
सुनील गावस्कर 

दहा जुलै १९४९ रोजी मुंबईत जन्मलेला सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातला सलामीचा सर्वोत्तम आणि विक्रमवीर तंत्रशुद्ध फलंदाज, तसंच अतिशय परखड आणि मार्मिक भाष्य करणारा एक्स्पर्ट कमेंटेटर! ‘लिटल मास्टर’ हे सार्थ बिरुद लाभलेल्या सुनीलने ‘सावली प्रेमाची’ या सिनेमातही काम केलंय आणि ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा’ हे गाणंसुद्धा गायलंय! जगातल्या आजपर्यंत सर्वोत्तम मानल्या गेलेल्या डेनिस लिली, थॉम्प्सन, रिचर्ड हेडली, इम्रान खान, माल्कम मार्शल, जोएल गार्नर, होल्डिंग, अॅन्डी रॉबर्टस् अशांच्या वेगवान झंझावाती तोफखान्यासमोर हेल्मेटही न घालता शतकामागून शतकं ठोकणारा सुनील असामान्यच! कसोटी क्रिकेटमधल्या त्याच्या ३४ शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरने मोडेपर्यंत वीस वर्षं अबाधित होता. कसोटी फलंदाजीमधले बहुतेक सर्वच माईलस्टोन्स त्यानेच निर्माण केले. उदाहरणार्थ - वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पणातच चार शतकं, सर्वप्रथम दहा हजार धावा (१०,१२२), दोन्ही इनिंग्जमध्ये शतक झळकावण्याची कामगिरी तीन वेळा, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या अशा चार इनिंग्जमध्ये खेळताना द्विशतक झळकावण्याची कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू, कसोटीत शंभर कॅच पकडणारा पहिला भारतीय, सचिन तेंडुलकरने रेकॉर्ड मोडेपर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १०० शतकं ठोकणारा पहिला फलंदाज, असे अनेक विक्रम सुनीलच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या अॅलन बॉर्डरने त्याच्यासारख्याच दहा हजार धावा नंतर ठोकल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हटलं जातं. एक गमतीशीर विक्रम म्हणजे एका फर्स्ट क्लास सामन्यात त्याने डाव्या हाताने फलंदाजी केली आणि तरीही तो अखेरपर्यंत नॉटआउट राहिला होता. सनी डेज, आयडॉल्स, रन्स अँड रुइन्स, वन डे वंडर्स, अशी त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्याचा गौरव केला आहे.
.......    

परवीन सुलताना 

दहा जुलै १९५० रोजी आसाममध्ये जन्मलेल्या परवीन सुलताना या पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. अफगाणी वडील आणि इराणी आईच्या पोटी जन्माला आलेली ही कन्या. घरातूनच संगीताची आवड आणि वारसा लाभल्यामुळे खूप लहान वयापासूनच त्यांचं शास्त्रशुद्ध गायनाचं शिक्षण सुरू झालं होतं. वडिलांनी त्यांना लहानपणापासून त्या काळच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायकांची आणि लता मंगेशकरांची गाणी ऐकवत सुरांचा अभ्यास शिकवला होता. पतियाळा घराण्याचे गायक दिलशाद खान हे त्यांचे गुरू आणि पुढे पतीही बनले. परवीन सुलताना यांनी अनेक भाषांमध्ये गायन केलं आहे. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला होता. २०१४ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय गंधर्व कलानिधी, संगीत नाटक अकादमी, श्रीमंत शंकरदेव पुरस्कार, मियां तानसेन पुरस्कार आणि फिल्मफेअर असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. 
.....

आलोकनाथ 

दहा जुलै १९५६ रोजी बिहारमध्ये जन्मलेले आलोकनाथ हे प्रामुख्याने चरित्र अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. टीव्ही मालिका आणि हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप पाडली आहे. रिश्तेनाते, दर्पण, बुनियाद, तारा, पिया का घर अशा दूरदर्शन मालिका गाजवत असतानाच त्यांनी गांधी, कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ हैं यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांतून कसदार अभिनयाने त्या भूमिका जिवंत केल्या आहेत.
.......  

यांचाही आज जन्मदिन :
विद्यमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह : १० जुलै १९५१.
कथाकार जी. ए. कुलकर्णी : १० जुलै १९२३ ते ११ डिसेंबर १९८७.
कवयित्री पद्मा गोळे : १० जुलै १९१३ ते १२ फेब्रुवारी १९९८.

(जी. ए. कुलकर्णी आणि पद्मा गोळे यांच्याविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून जी. ए. कुलकर्णी यांची पुस्तकं घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link