Next
‘लहान मुलांसाठी इंटरनेट अधिक सुरक्षित करावे’
प्रेस रिलीज
Tuesday, November 14 | 05:49 PM
15 0 0
Share this story

सायबर सिक्युरिटी परिषदेत सहभागी डॉ. सुबी चतुर्वेदी, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, रवी गुप्ता निराली भाटिया, सुधीर हिरेमठ आदी
पुणे : ‘इंटरनेट आता सर्वव्यापी बनले आहे. मुलांना त्यांच्या आवडीचा प्रत्येक विषय शिकण्याचे, आवडीची प्रत्येक गोष्ट शेअर करण्याचे स्वातंत्र्य इंटरनेटमुळे मिळाल्याने तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, त्याचवेळी मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा फारच गंभीर झाला आहे,’ असे मत एमएजी युनायटेड नेशन्स इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (यूएन-आयजीएफ)च्या सदस्य आणि सीओएआयच्या पब्लिक अफेअर्स अँड कम्युनिकेशन्सच्या वरिष्ठ संचालक,  ख्यातनाम कार्यकर्त्या डॉ. सुबी चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. 

पुणे पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘आपले भवितव्य डिजिटली सुरक्षित बनवणे’ या विषयावरील सायबर सिक्युरिटी परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.  या वेळी  ४०० हून अधिक शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. 

‘मुलांच्या शैक्षणिक आणि विकासात्मक फायद्यासाठी इंटरनेटमुळे ज्ञान आणि मनोरंजनाचा अथांग ठेवा उपलब्ध होतो. या इंटरनेटचा वापर असंख्य प्रकारे करता येतो;पण, त्याचवेळी त्यातील धोकेही अनेक पटींनी वाढतात.  यात ऑनलाइन बुलींग, छळ, अयोग्य कंटेंट, वायरस, स्पायवेअर, फिशिंग स्कॅम त्याचप्रमाणे संगीत, सिनेमे किंवा सॉफ्टवेअरच्या अवैध फाइल्स बेकायदेशीररित्या शेअर करण्याचा समावेश आहे’, असे डॉ. चतुर्वेदी म्हणाल्या.

ब्ल्यू व्हेल चॅलेंज आणि सेल्फीच्या वेडाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘इंटरनेटच्या धोक्यांपासून मुलांना सुरक्षित ठेवणे म्हणजेच त्यातील धोक्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्यांच्या शिकण्यात व्यत्यय न आणता त्यांच्यावर लक्ष ठेवणे.’

पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अध्यक्षीय भाषण केले. गुगलच्या ट्रस्ट अँड सेफ्टी विभागाचे प्रमुख रवी गुप्ता यांच्यासह अनेक तज्ञांनीही मार्गदर्शन केले.  सायबर सायकोलॉजिस्ट निराली भाटिया, सुधीर हिरेमठ यांनी यासंदर्भातील मानसशास्त्रीय परिणाम आणि त्यातील हस्तक्षेप यावर चर्चा केली. या चर्चेचे सूत्रसंचालन ‘करिअर कॉर्नर’चे एमडी  ऋषिकेश हुंबे यांनी केले.

‘कोणतीही महत्त्वाची माहिती कुणालाही देऊ नये आणि कोणतीही शंका असल्यास थेट विचारावे, हे मुलांना शिकवायला हवे. इतरांशी जसे तुम्ही प्रत्यक्षात वागला असतात तसेच त्यांच्याशी ऑनलाइन वागा,’ असे डॉ. चतुर्वेदी म्हणाल्या. ‘पालकांनीही आपण मुलांवर योग्य प्रकारे लक्ष ठेवतोय आणि इंटरनेट वापराची मर्यादा ठरवतोय, याची खातरजमा करायला हवी. तर, मुलांनी पालकांचे ऐकायला हवे आणि त्यांच्याशी स्पष्ट बोलायला हवे. सर्वप्रथम इंटरनेटच्या बाबतीत स्वत: पूर्ण माहिती करून घेणे आणि ‘सायबर अवेअर’ होणे, मुलांना आयडेंटिटी रूल्स शिकवणे, सुयोग्य इंटरनेट फिल्टर्स बसवणे आणि सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवणे, मुलांसोबत पुरेसा वेळ घालवणे आणि त्यांच्या सायबर अवेअर बनवणे, सर्व डिव्हाइसेस सार्वजनिक जागांवर ठेवणे, मुलांच्या टीव्ही पाहण्याच्या वेळेप्रमाणेच त्यांची ऑनलाइन वेळही ठरवून द्यावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवादाचे सर्व मार्ग खुले करून एक विश्वाीसार्ह नाते निर्माण करावे’, असा सल्ला डॉ. सुबी चतुर्वेदी यांनी पालकांना आणि शिक्षकांना दिला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link