Next
कर्नाटकातील ‘सुवर्णभूमी’ : रायचूर
BOI
Wednesday, December 19, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

भारतात आंध्र प्रदेश-कर्नाटकच्या सीमाभागात खनिज स्वरूपात सोने आढळते. कर्नाटकच्या कोलार, चित्रदुर्ग आणि रायचूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात फेरफटका मारू या रायचूर जिल्ह्यात...
.............
कर्नाटकातील रायचूर जिल्हा इतिहास आणि परंपरेने समृद्ध आहे. या जिल्ह्यात विविध किल्ले, प्राचीन शहरे आणि ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतात. भारतात आंध्र प्रदेश -कर्नाटकच्या सीमाभागात खनिज स्वरूपात सोने आढळते. कर्नाटकात कोलार, चित्रदुर्ग व रायचूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी आहेत; पण उत्पादन-खर्च याचा मेळ नसल्याने अनेक ठिकाणी प्रत्यक्ष खाणकाम बंद आहे. उत्पादनखर्च कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. रायचूर जिल्ह्यातील काही ठिकाणांची माहिती आजच्या भागात घेऊ या.

या जिल्ह्यात सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध आहे. त्यामुळे सिमेंट उद्योग मोठा आहे, तसेच या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औष्णिक विद्युतनिर्मितीही होते. ग्रॅनाइट अनेक रंगांत उपलब्ध आहे. एकूण भाग शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे; पण देशभरात सिमेंट व ग्रॅनाइटचा पुरवठा येथून होत असतो. रायचूरला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मौर्य काळापासूनचे शिलालेख या भागात आहेत. या भागाने दक्षिण भारतातील अनेक राजवटी पाहिल्या. प्रामुख्याने सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक, होयसळ, चालुक्य, कदंब, चालुक्य आणि शेवटी काकतीय राजवट येथे अस्तित्वात होती. रायचूरमध्ये १२९४मध्ये काकतीय राणी रुद्रमादेवी हिने किल्ला बांधला असा शिलालेखात उल्लेख आहे. मलिक कफूर याने १३१०च्या सुमारास त्यावर कब्जा केला. नंतर बहामनी आणि त्यानंतर निजाम सत्ता आली. नंतर १९४७पर्यंत ब्रिटिश सत्ता होती.

रायचूर किल्ला

रायचूर किल्ल्यावर सापडलेली तोफ

रायचूर :
रायचूरमधील किल्ला वारंगळची राणी रुद्रमादेवी हिचा सेनापती गंगा रेड्डी याने १२९४मध्ये बांधला. रायचूरमध्ये हिंदू आणि जैन राजे सत्तेवर येऊन गेले. इ. स. १५२०मध्ये कृष्णदेवरायाने रायचूर जिंकले. विजयनगर पाडावानंतर ते हैदराबादच्या निजामाकडे गेले. किल्ल्याच्या पश्चिमेकडील दरवाज्याजवळ जुन्या घराचे अवशेष आहेत. पाच इंच व्यासाचे ग्रॅनाइटचे ९५ तोफगोळे येथे अलीकडेच सापडले आहेत. तसेच एक जुनी तोफही सापडली आहे. किल्ल्याला सर्व बाजूंनी खंदक आहे. इ. स. १५४९मध्ये इब्राहिम आदिलशहा प्रथम याने आतल्या भागाचे प्रवेशद्वार बांधले. ४१ फूट लांबीचा दगडी स्लॅब हे येथील मुख्य आकर्षण आहे. त्यावर तेलुगूमधील एक स्क्रिप्ट आहे. तसेच बैलांच्या साह्याने वर ओढून नेल्याचे चित्रही आहे. 

एक मिनार की मस्जिदएक मिनार की मस्जिद : पर्शियन शैलीतील मिनार असलेल्या या मशिदीला एकच मिनार आहे. म्हणून ‘एक मिनार की मस्जिद’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. दौलताबाद आणि बिदरच्या धर्तीवर हा मिनार उभारण्यात आला आहे. ६५ फूट उंच आणि १३ फूट व्यासाचा मिनार दगड, विटा आणि चुन्याच्या साह्याने बांधलेला आहे. येथे पर्शियन भाषेतील एक शिलालेख आहे. त्यानुसार हे मुस्लिमांचे शहरातील सर्वांत जुने उपासना स्थान आहे. 

जामी मस्जिद : हे रायचूर शहराचे एक महत्त्वपूर्ण धार्मिक ठिकाण असून, तेथील सर्वांत सुंदर आणि सर्वांत मोठ्या मशिदींपैकी एक आहे. मशिदीच्या रचनेत दोन दरवाजे आणि सहा विशाल खांबांचा समावेश आहे. या मशिदीमध्ये आदिलशाहाच्या घराण्यातील व्यक्तींच्या कबरी आहेत. 

रायचूर हे सध्या सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. कर्नाटक नाट्य अॅकॅडमीमार्फत येथे आठ दिवस जिल्हा रंगोत्सव साजरा होतो. कुरवपूरकुरवपूर : हे दत्त संप्रदायातील भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे. येथे श्रीपाद श्रीवल्लभस्वामी अंतर्धान पावले. त्यानंतर ते कोठेही दिसले नाहीत. ते सूक्ष्म रूपात येथे वास्तव्य करून आहेत, अशी भक्तांची भावना आहे. जेथे श्रीपाद स्वामींनी ध्यानधारणा केली, ती गुहा येथे आहे व तेथेच त्यांच्या पादुका स्थापन केल्या आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ हे श्रीदत्त (दत्तात्रय) यांचा कलियुगातील पहिला अवतार समजले जातात. कृष्णा नदीच्या काठावर हे ठिकाण असून, येथून थोड्या अंतरावर कृष्णा आणि भीमेचा संगमही आहे. टेंबे स्वामी जेथे राहिले ते ठिकाण, औदुंबर वृक्ष, तसेच खूप जुना वटवृक्षही येथे आहे. नदीतून पलीकडे जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. जवळच कोरवा हे ठिकाण आहे. त्याला नारदगड्डे असेही म्हणतात. येथे नारदमुनींनी तपश्चर्या केली होती. हे लिंगायत लोकांचे पवित्र ठिकाण आहे. येथे मोठी वार्षिक यात्रा भरते. 

मस्की येथील शिलालेख असलेली गुंफा
अशोक शिलालेख

मस्की :
मस्की शहर तुंगभद्राची उपनदी असलेल्या मस्की नदीच्या काठावर आहे. १८७० ते १८८८ दरम्यान रॉबर्ट ब्रूस फूट यांनी सुरुवातीला मस्कीचा अभ्यास केला. १९१५मध्ये खाण अभियंता सी. बेडॉन यांनी सम्राट अशोक याचा शिलालेख शोधून काढला. १९३५-१९३७मध्ये हैदराबाद राज्याच्या पुरातत्त्व विभागाने येथे उत्खनन व संशोधन सुरू केले. १९५४मध्ये अमानंद घोष यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या वतीने आसपासची जागा खोदली व अनेक अवशेष दिसून आले. या क्षेत्राचा इतिहास चार कालखंडांमध्ये विभागलेला आहे, असे आढळले. तीन हजार ते १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी अस्तित्वाच्या खुणा येथे दिसून आल्या. जुनी पॉटरी, दागिने, तसेच काही नाणीही आढळून आली. हट्टी/हुट्टी येथील सोन्याच्या खाणी :
सोन्याच्या धातूचे खाणकाम आणि प्रक्रिया करून सोन्याचे उत्पादन करणारी हुट्टी गोल्ड माइन्स लिमिटेड (एचजीएमएल) ही भारतातील एकमेव कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून चित्रदुर्ग जिल्ह्यातील अजानहळ्ळी येथेही सोन्याची खाण कार्यरत आहे. कोलार येथील उत्पादन खर्चिक होऊ लागल्याने खाणकाम बंद आहे. हे ठिकाण रायचूरपासून १०७ किलोमीटरवर आहे.

कल्लूर : कल्लूर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. साधारण १३व्या शतकात मुस्लिम शासकांनी या गावाभोवती संरक्षक भिंत बांधली होती. त्याला पाच दरवाजे होते. त्यापैकी तीन दरवाजांना मानवी दरवाजा, कळमाला दरवाजा आणि रायचूर दरवाजा असे म्हणतात. गावात आदिलशाहीत बांधलेली चावडी असून, इमारतींमध्ये कन्नड भाषेत लाकडी शिलालेखही आहे. या गावात आणि त्याच्या आसपास सहा मंदिरे आहेत. यापैकी मार्कंडेश्वर मंदिर हे गावातील सर्वांत जुने मंदिर आहे. येथे शिलालेखही आहेत. ते बहुधा कल्याणी चालुक्यांच्या काळातील असावेत. कल्लूरचे आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक मोठ्या आणि सुबक विहिरी आहेत. त्यापैकी पाच विहिरी अतिशय विशाल आहेत व त्यांना पायऱ्याही आहेत. सर्वांत मोठी विहीर १२० फूट खोल आहे तेथील पाणीही गोड आहे. विहीर कधी आणि कोणी बांधली याची माहिती नाही. 

मालेशंकर मंदिर, गब्बूर

गब्बूर :
देवदुर्ग तालुक्यात गब्बूर येथे अनेक जुनी मंदिरे व शिलालेख आहेत. त्यामुळे ते मंदिराचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे कल्याणी चालुक्यकालीन सुमारे ३० मंदिरे व २८ शिलालेख आहेत. जुन्या काळात ते शिक्षण केंद्र होते आणि गर्भपुरा/गोपुरग्राम म्हणूनही ओळखले जात असे. येथील सर्वांत महत्त्वाची मंदिरे मालेशंकर, व्यंकटेश्वर, ईश्वरा, बंगारा बसप्पा आणि हनुमान यांची आहेत. गब्बूर हे रायचूर जिल्ह्यातील मंदिरांचे गाव म्हणून ओळखले जाते. बरीच मंदिरे कल्याणी चालुक्यांच्या काळात बांधलेली आहेत. येथील एक शिलालेख हैदराबादच्या पुरातत्त्व संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. 

औष्णिक विद्युत केंद्र, रायचूर

जलदुर्ग :
रायचूर जिल्ह्यातील हे एक नैसर्गिक आणि ऐतिहासिक सहलीचे ठिकाण आहे. येथे विजापूरच्या आदिलशाहीतील राजांनी किल्ला बांधला. कृष्णा नदीच्या काठावर असल्याने त्याला जलदुर्ग म्हणतात. मेडोज टेलरने या किल्ल्याला ‘नोबल क्वीन’ असे संबोधले आहे. येथे एक धबधबाही आहे.  

श्रीपाद श्रीवल्लभ, कुरवपूरदेवरभूपूर : हे धार्मिक ठिकाण असून, टेकडीवर वसलेल्या आम्रेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दर वर्षी फाल्गुन महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. हे ठिकाण लिंगागुरपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे.

कडलूर : रायचूर तालुक्यातील कडलूर हे पवित्र स्थान आहे. या गावाच्या उत्तरेस भीमा-कृष्णा नदीचा संगम आहे. चिकलपरवी येथे सापडलेल्या शिलालेखानुसार, विजयनगर राजा कृष्णदेवाराय यांनी येथील यात्रेकरूंना त्यांच्या कुटुंबासह भेट दिली आणि पूजा केली असा उल्लेख आहे. 

मुदावल : हे लिंग्सुगुर तालुक्यातील प्रागैतिहासिक स्थळ असून लिंग्सुगुरपासून सुमारे १२ मैल अंतरावर आहे. या गावात एक दगड-भिंत आहे. त्यामुळे हे एक महत्वाचे ठिकाण असावे. जवळील टेकडीच्या उतारावर काही जुन्या, मानवी वापरातील वस्तू आढळून आल्या आहेत. सोन्याचे तुकडे, लोह, तसेच काही दागिनेही येथे सापडले आहेत. 

मुद्गल किल्ला

मुद्गल :
येथे किल्ला आहे. तसेच रोमन कॅथलिक चर्चही आहे. या ठिकाणाला यादव काळापूर्वीपासूनचा इतिहास आहे. तसे कित्येक शिलालेख शहराच्या आसपास सापडले आहेत. येथे यादव राजवट येण्यापूर्वी काकतीय राजवट होती. नंतर बहामनी सुलतानकडे सत्ता आली. येथील किल्ल्याची नंतर दुरुस्ती करण्यात येऊन त्यावर बंदुका, तोफा ठेवण्याची व्यवस्था केल्याचे दिसून येते. 

कुरवपूर येथील नौकाप्रवासाची मजाकविताल : या गावात काही जुने शिलालेख आहेत. इ. स. १२००मधील त्र्यंबकेश्वर मंदिर आणि आकर्षक दुर्गामूर्तीसाठी, तसेच उत्तम दर्जाच्या तांदळांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. सुफी लल्लेमष्क दर्ग्यामुळे हे मुस्लिमांचे पवित्र ठिकाण आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पवनऊर्जा निर्माण केली जाते. रायचूरपासून सुमारे ६० किलोमीटरवर हे ठिकाण आहे. 

जामी मस्जिद
कसे जाल रायचूरला?
रायचूर हे ठिकाण दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद आणि मुंबईला रेल्वेने जोडलेले आहे. जवळचा विमानतळ १८३ किलोमीटरवर हैदराबाद येथे आहे. येथे जाण्यासाठी उत्तम कालावधी नोव्हेंबर ते मार्च हा आहे. येथे राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय आहे. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shashi Pimplaskar About 211 Days ago
Very informative. Thanks for sharing this.
0
0

Select Language
Share Link
 
Search