Next
नवलाख तळपती दीप विजेचे येथ...
BOI
Tuesday, October 10 | 06:45 AM
15 0 0
Share this story

फोटो सौजन्य : मंदार सारंग (mazbhraman.blogspot.in)

कोजागरीचा चंद्र मावळल्यावर दिवाळीची चाहूल लागते. मनाच्या कोनाड्यात हळूच एक मिणमिणती पणती अनेक हळव्या आठवणींना जागं करते. कवी कुसुमाग्रजांची ‘स्मृती’ ही कविता नकळत ओठांवर येते. ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज आस्वाद घेऊ या त्याच कवितेचा...
............
कोजागरीचा चंद्र मावळतो आणि आश्विनाच्या हवेतला गारवा दिवाळीचा सांगावा घेऊन येतो. दसऱ्याचं हृदयाकार आपट्याच्या पानाचं सोनं, सोन्यासारख्या माणसांना जिवापाड जपण्याचा संदेश देतं आणि कोजागरीचं चांदणं जागृतीचा, सजगतेचा संदेश देतं... या साऱ्या संदेशांचा विचार करता करता दिवाळीची चाहूल कधी लागते ते कळतही नाही. मनाच्या कोनाड्यात हळूच एक मिणमिणती पणती अनेक हळव्या आठवणींना जागं करते. कवी कुसुमाग्रजांची ‘स्मृती’ ही कविता नकळत ओठांवर येते.

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकूळ केव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात!

दिवाळी आली, की रंगीबेरंगी लखलखत्या विजेच्या माळा घराघरांवर दिसतील. सध्या सगळ्यांच्याच मोबाइलवर एक पोस्ट फिरतेय, ती म्हणजे ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घालू या. चायनीज माळा, बल्ब, सजावटीचं साहित्य, फटाके कितीही स्वस्त असले तरी ते घ्यायचे नाहीत. भारतीय बनावटीच्याच वस्तू विकत घेऊ या आणि आपल्या भारतीय बंधू-भगिनींना दिवाळीनिमित्त मदत करू या.’ पोस्ट चांगली आहे. देशभक्तीची भावना जागृत करणारी आहे.

वास्तवतेचं भान ठेवता ठेवता, प्रॅक्टिकल जीवनशैली जगता जगता नागरी, शहरी जीवनातलं बेगडीपण कुणी लक्षातच घेत नाही. खरं म्हणजे शहरात रोजच दिवाळी असल्यासारखा दिव्यांचा झगमगाट असतो. कात्रज घाट, दिवे घाट किंवा खंडाळ्याचा बोरघाट उतरताना आपण बघतो दिव्यांचा झगमगाट. लवकरच शहरात पोहोचणार या आनंदानं नि:श्वास सोडतो; पण कुसुमाग्रजांसारखा संवेदनशील कवी हळव्या स्मृतींपाशी रेंगाळत राहतो. घाटातून खाली शहरातल्या दिव्यांना पाहून त्यांना कल्पना सुचते, की ‘उतरली तारकादळे जणू नगरात...’ आकाशातल्या तारका, चमचमणाऱ्या चांदण्याच जणू नगरात उतरल्या आहेत... त्यांना पाहून कविमन व्याकूळ होतं, कवीला आठवते ‘माजघरातील मंद दिव्याची वात!’

कवी कुसुमाग्रजांनी प्रारंभीची काही वर्षे मुंबईला काढली. पत्रकार म्हणून काम केलं. तेव्हा मुंबईतलं जीवन त्यांनी अनुभवलं. जे त्यांना कधीच भावलं नाही... गावाकडची माती, तो निसर्ग आणि त्यांच्या भावविश्वातलं ते घर, ते परसदार, ते अंगण. सगळं सगळं त्यांना खुणावत होतं... व्याकूळ करत होतं...

वाऱ्यावर येथील रातराणी ही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकूळ केंव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध

शहरातले बंगले, भव्य अपार्टमेंट्स, सोसायट्यांमधील बागा आणि अवतीभवतीचा रातराणीचा धुंद गंध पसरवणारा वारा कवीला सुखावत नव्हता, तर परसातल्या निशिगंधाच्या स्मृतीनं आणखीच व्याकूळ करत होता. निशिगंधाचा मंद सुवास त्यांना हवाहवासा वाटत होता... कविमनाची ही व्याकूळता प्रतिभावंत संगीतकार सी. रामचंद्र यांच्या स्वरांनी टिपली आणि स्मृतींना जागवणारं एक सुरेख गीत जन्माला आलं. गिटार आणि हलकासा ऱ्हिदम यांच्या साथीनं स्वत:च्याच आवाजात सी. रामचंद्र यांनी कुसुमाग्रजांची ही कविता स्वरबद्ध केली आणि भावगीतांची दुनिया शब्दस्वरांनी मोहरली... कवितेतले शब्द, शब्दांचा आशय, हळुवार भावना या साऱ्यांना जपत सी. रामचंद्र यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेला न्याय दिला.

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकूळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट

नदीकिनारी असलेल्या गावाला एका समृद्ध संस्कृतीची ओळख असते. उसळणाऱ्या, हेलकावणाऱ्या‍ लाटांनी भरलेला सागर आणि भव्यदिव्य, गगनाला भिडलेल्या उंच इमारतींचा थाट कविमनाला आनंददायी करत नव्हता, तर पुन्हा पुन्हा कवीला आठवत राहतो, व्याकूळ करतो तो गावाकडचा नदीकिनारा आणि भंगलेला असला तरी संस्कृतीच्या, परंपरांच्या खुणा, अवशेष जपून ठेवणारा तो नदीकाठचा घाट.

शहरांमध्ये कितीतरी प्रकारचे जलसे होतात. बेहोषीचा रंग आणणारे नृत्याचे आविष्कार बघायला मिळतात; पण अशा मैफलींमध्ये कवीचा जीव रमत नाही. नि:संग मनानं सहभागी व्हावं लागतं; पण आठवत राहतो, व्याकूळ करत राहतो तो अभंग, जो आर्त स्वरात कुणीतरी आळवलेला असतो. कवी म्हणतो...

बेहोष चढे जलशांना येथील रंग
रुणझुणता नूपुर जीव बने नि:संग
परि स्मरतो आणिक करतो व्याकूळ केव्हा
तू आर्त मला जो ऐकविलास अभंग!

कवी कुसुमाग्रजांच्या शब्दांमधलं आणि संगीतकार सी. रामचंद्रांच्या स्वरांमधलं सामर्थ्य इतकं, की शहरी बेगडी कृत्रिम जीवन आणि गावाकडचं सांस्कृतिक वैभव रसिकांसमोर साक्षात उभं राहतं. नकळत रसिकमन या भावगीताशी इतकं एकरूप होतं, तादात्म्य पावतं, की हे भावगीत शहरी आणि ग्रामीण जीवनाचं मूर्तिमंत चित्र डोळ्यापुढे उभं करतं. निशिगंधाचा मंद सुवास, तो नदीकिनारा आणि भग्न अवशेष उराशी बाळगून पसरलेला घाट. रंगील्या जलशातील बेहोषीपेक्षा आर्त स्वरांमधल्या अभंगातली व्याकूळता हवीहवीशी असं सांगणाऱ्या साऱ्या  स्मृतींना जागवणारं हे गीत हमखास आठवतं, जेव्हा दिवाळीची चाहूल लागते.

कुसुमाग्रजांच्या ‘स्मृती’ या कवितेतलं शेवटचं कडवं मात्र सी. रामचंद्रांनी गीतामध्ये समाविष्ट केलं नाही. मूळ कवितेतल्या चार कडव्यांनी सगळं काही सांगितलंय, असं त्यांना वाटलं असेल. पाचव्या कडव्यात कवी म्हणतो, अवतीभवती लावण्यवती वावरताहेत; पण तुझं ते साधेपण, विरहातले उदास डोळे आणि कारुण्यविलास मला अधिकच व्याकूळ करतो...

लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत माणकापरि तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकूळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातील करुण-विलास!

उचित शब्दयोजना, संयमित भावनांचं दर्शन आणि समर्पक उपमा हे कुसुमाग्रजांच्या काव्याचं वैशिष्ट्य या कवितेत आपल्याला दिसतं. केशवसुतांच्या काव्यातलं ओजस्वीपण आणि गोविंदाग्रजांच्या कल्पनेचं वैभव ल्यालेली कुसुमाग्रजांची ही कविता सी. रामचंद्रांच्या स्वरस्पर्शानं मोहरली आणि आपल्या भावजीवनातलं एक स्मृतिशिल्प बनली.

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
S.P.Karande About 116 Days ago
Khup khup aabhar.shaharat kantalalelya mansana gavchya matichi odh lagte, hi vyakulta nemakya shabdat vyakt keli aahe.Radgrahan chngle kele aahe.Dhanyavad.
0
0
माया कुलकर्णी About
प्रतिमाताई, अप्रतिम कविता निवडली आज. कुसुमाग्रजांच्या शब्दांना,आण्णांसाहेब चितळकरांच्या स्वर संगीताला उपमा नाही, तितकीच उपमा तुमच्या रसिक मर्मज्ञ विश्लेषणाला पण नाही. मन मोहरुन, डोळे भरभरून वाहायला लावणारं रसग्रहण खुप खुप आवडलं.
2
0
ज्योत्स्ना About
लेख वाचून सतत सुरू असलेल्या अन् कॅलेंडर मधल्या येऊ घातलेल्या दिवाळीची चाहूल लागली . . .
1
0
Dinesh Dagadkar About
Tuza shabda fulora asaach bahrat raho, Tu gandh prajkatcha sada det raho Mi gandh divana tuzya shabdancha Tu zad aandache, he asech baharat raho.
2
0

Select Language
Share Link