Next
दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा
राज्य सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन
प्रेस रिलीज
Wednesday, October 31, 2018 | 03:06 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राज्य सरकारने चार वर्षांत यशस्वी कामगिरी केली असून, राज्याला निराशेतून बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर आणले आहे. ‘भाजप’तर्फे आपण मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो,’ असे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी मंगळवारी (ता. ३० ऑक्टोबर) सांगितले.

‘भाजप’चे राज्य सरकार ३१ ऑक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण करत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला दानवे यांनी सरकारचे अभिनंदन केले. ‘राज्यातील शेकडो गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने संघटनेतर्फे यंदा सरकारच्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करण्यात येणार नाही. तथापि, ‘भाजप’चे पदाधिकारी व कार्यकर्ते ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधून सरकारच्या कामगिरीची माहिती देतील,’ असे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘चार वर्षांपूर्वी काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट व निष्क्रिय राजवटीला कंटाळलेल्या जनतेने भाजपाला कौल दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेती, ग्रामविकास, शहरांचा विकास, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, उद्योग, कायदा-सुव्यवस्था अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘भाजप’चे केंद्र सरकार हिमालयाप्रमाणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहिले आहे. काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या पंधरा वर्षांच्या कामापेक्षा खूप जास्त विकास कार्य ‘भाजप’च्या सरकारने चार वर्षांत केले आहे. राज्य चार वर्षांपूर्वीच्या निराशेतून बाहेर पडून विकासाच्या महामार्गावर वाटचाल करत आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती अशा सर्व निवडणुकात ‘भाजप’ पहिल्या नंबरवर राहिला आहे.’

दानवे पुढे म्हणाले, ‘सरकारने शेतीवरील खर्च दुप्पट केला असून कर्जमाफी, पीकविमा, आपत्ती निवारण व अडतमुक्ती अशा विविध प्रकारे शेतकऱ्यांना ५१ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. शेतकऱ्यांना मर्जीने हवा तेथे माल विकता यावा यासाठी नियमनमुक्ती, बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, शेतकऱ्यांकडून अडत वसूल करणे बंद हे राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय आहेत. सोळा हजार गावांत यशस्वी जलयुक्त शिवार योजना, दुधाच्या खरेदी दरात वाढ अशी अनेक कामे सरकारने केली.’

‘प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत आतापर्यंत पाच लाख ८२ हजार ५२८ घरे पूर्ण झाली असून, आधीच्या सरकारने अपूर्ण ठेवलेली घरेही पूर्ण केली. शिक्षणात २०१३साली महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावर होता तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून १५ लाख रुग्णांना लाभ झाला आहे. ‘भाजप’ सरकारने चार वर्षांत ६० लाख शौचालये बांधून महाराष्ट्र हगणदारीमुक्त केला. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन केल्यामुळे सुविधा निर्माण झाली आहे. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय केले,’ अशी माहिती दानवे यांनी दिली.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी भाजप सरकारने चार वर्षांत सर्व परवानग्या मिळवून, आराखडा तयार करून वर्क ऑर्डरही दिली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मराठा समाजाने आपल्या समस्या मांडण्यासाठी मोर्चे काढल्यानंतर भाजप सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेतली व समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा चालू असून, त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्यात येत आहेत. त्यासोबतच समाजातील विद्यार्थ्यांना फीसाठी आर्थिक मदत, राहण्यासाठी होस्टेल, तरुणांना रोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मदत ही कामे गतीने चालू आहेत,’ असे ते म्हणाले.

‘नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठीचे भू-संपादन ८५ टक्के पूर्ण झाले आहे. हा महामार्ग उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. मुंबई, पुणे व नागपूर येथे मेट्रोची कामे सुरू आहेत. या शहरातील वाहतुकीची समस्या सुटायला मदत होईल. राज्यात गेल्या चार वर्षांत तीन लाख ३६ हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक आली असून, आता देशातील विदेशी गुंतवणुकीच्या निम्मी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूकही आधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत एक कोटी १९ लाख लाभार्थींना ५९,७४६ कोटी रुपये कर्ज मिळाले आहे. युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी ही योजना महत्त्वाची आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link