Next
‘मराठीवरचं प्रेम कृतिशील हवं’
BOI
Monday, March 05, 2018 | 02:56 PM
15 0 0
Share this story


‘सर्वांनी आपल्या मातृभाषेचा व्यवहारात अधिकाधिक वापर करायचा, मातृभाषेतच अधिकाधिक बोलायचं आणि आपलं शेकडो वर्षांपासून समृद्ध असणारं साहित्य अधिकाधिक वाचायचं. आपल्या भाषेवर प्रेम करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दरमहा आपल्या मासिक उत्पन्नातला काही भाग हा पुस्तक-खरेदीसाठी आणि मासिकांच्या वर्गणीसाठी राखून ठेवला पाहिजे! आपलं प्रेम हे असं कृतिशील असायला हवं!’ हे मत आहे लेखक, समीक्षक संजय भास्कर जोशी यांचं. ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या मराठी राजभाषा दिन उत्सवांतर्गत त्यांची भेट घेतली असता, त्यांनी मांडलेली ही मतं...
...........
मराठी भाषा दिनासारखा मंगल दिवस नाही’ असं आवर्जून सांगत लेखक आणि समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी, ‘मराठी भाषांवर इतर भाषांचं आक्रमण होतंय आणि त्यामुळे आपली मराठी कमकुवत होईल’ वगैरे विचारांना साफ उडवून लावलं. ‘मोठ्या रेषेला हात न लावता आपण तिच्या शेजारी त्याहून मोठी रेषा काढली तर ती रेषा आपोआप लहान दिसते’ याचा दाखला देत, ‘आपणच सर्वांनी मिळून आपली मराठी भाषा इतकी मोठी करू या, की इतर कोणतीही भाषा तिच्यापुढे लहानच दिसेल (ठरेल)’ असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, ‘आपली भाषा मोठी करायची म्हणजे काय? अगदी सोप्पं - आपण सर्वांनी आपल्या मातृभाषेचा व्यवहारात अधिकाधिक वापर करायचा, मातृभाषेतच अधिकाधिक बोलायचं आणि आपलं शेकडो वर्षांपासून समृद्ध असणारं साहित्य अधिकाधिक वाचायचं!! इतकं जरी केलं तरी आपली मराठी समृद्धही होईल आणि अधिकाधिक फुलेलही! अशा तऱ्हेने आपण आपल्या भाषेची रेषा मोठी करायची, की बाकीची आक्रमणं आपोआप छोटी ठरतील!दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपली मराठी भाषा ही ‘अभिजात भाषा’ म्हणून ओळखली जाण्यासाठी सर्वांनी मिळून शासनाकडे मागणी करायची. जी भाषा काळाच्या कसोटीवर टिकून उरते ती अभिजात भाषा! आणि मराठी या निकषावर पूर्णपणे उतरते. त्यामुळे माझीसुद्धा सरकारकडे आग्रहपूर्वक मागणी आहे की मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळायला हवा! एकदा का मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाला की भाषेच्या प्रसारासाठी आणि उन्नतीसाठी अधिकाधिक निधी मिळेल. आणि त्यायोगे अनेक उपक्रम हाती घेता येऊ शकतील,’ असं जोशी यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले,’ मराठी वाचणारे कमी झालेत ही रडही खोटी आहे. पुरातन काळापासून कधीही वाचक भरभरून नव्हते. एकूण लोकसंख्येचा विचार करता वाचकांची टक्केवारी कमीच असायची; पण सध्याचा विचार केला तर शिक्षणाचा प्रसार, साक्षरता आणि लोकसंख्या याच्यामध्ये ज्या प्रमाणात वाढ झाली आहे ते बघता, वाचकांची टक्केवारी ज्याला ‘अॅबसोल्युट वाचकसंख्या’ म्हणता येईल ती नक्की वाढलेलीच आहे.’ 

जोशी यांनी त्यांच्या स्वतःच्या ‘पुस्तक पेठ’ या दुकानाचा दाखला देत सांगितलं, ‘उत्तमोत्तम पुस्तकांना नक्कीच चांगली मागणी आहे. वाचकांनीदेखील नवनव्या लेखकांना उत्तेजन द्यायला हवं. आपला वारसा उत्तम आहेच; पण नव्याचं स्वागत करणंही तितकंच गरजेचं आहे. आपण वाचकांनीच नव्या साहित्याला उभारी दिली पाहिजे. नवीन मंडळींना दाद द्यायला हवी, प्रोत्साहन द्यायला हवं!’ 

वाचकांनी विचार करावा की आपण जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा हजार रुपये सहज उडवतो, मग एखाद्या चांगल्या मासिकाची हजार रुपये वर्गणी का नाही भरत,’ असा सवालही त्यांनी विचारला. 

मराठी संपत चालली म्हणून गळे काढणाऱ्यांना जोशी यांनी एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला. तो म्हणजे, ‘आपल्या भाषेवर प्रेम करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दरमहा आपल्या मासिक उत्पन्नातला काही भाग पुस्तक खरेदीसाठी आणि मासिकांच्या वर्गणीसाठी राखून ठेवला पाहिजे! आपलं प्रेम हे असं कृतिशील असायला हवं!’ 

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील).
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link