Next
‘गांधीजींचे विचार वैश्विक कल्याणाचे’
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, October 02 | 04:25 PM
15 0 0
Share this story

राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी गांधी भवन येथील गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करताना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील. शेजारी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. पी. ए. इनामदारआणि मान्यवर.

पुणे : ‘मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला अशा अनेक जागतिक नेत्यांनी गांधी विचारातून प्रेरणा घेतली. कारण गांधीजींचे विचार मानवतेच्या कल्याणाचे, चिरंतन आणि वैश्विक आहेत. म्हणून गांधीजींच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी गांधी सप्ताहासारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे उद्घाटन सिक्कीमचे माजी राज्यपाल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गांधी सप्ताहाचे हे नववे वर्ष आहे. उद्घाटन कार्यक्रम एक ऑक्टोबरला सायंकाळी गांधी भवन, कोथरुड येथे झाले.

‘गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार उपस्थित होते. प्रारंभी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेला अभिवादन करण्यात आले आणि वाचन करण्यात आले; तसेच सर्वधर्मीय धर्मगुरूंनी प्रार्थना सादर केल्या.

संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. महात्मा गांधी यांचा विचार गणेशोत्सवात मांडणाऱ्या मंडळांचे प्रतिनिधी उदय जगताप, रवींद्र माळवदकर यांचा सत्कार करण्यात आला. या मंडळांना अनुक्रमे २५ हजार, ३५ हजार पारितोषिक देण्यात आले.

या प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, ‘गांधीजींनी वर्णद्वेषाविरूद्ध, जातीयतेविरुद्ध आणि शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध लढा देऊन जीवन कार्याला सुरुवात केली. वृत्तपत्रे, प्रबोधनाच्या मार्गाने लढा दिला. गरिबी निर्मूलनाचा ध्यास घेतला. ज्या मार्गांना महात्मा गांधी मार्ग नाव दिले आहे, त्याचा एम. जी. रोड असा उच्चार करण्याऐवजी पूर्ण उच्चार करून त्यांचे प्रेरणादायक स्मरण करावे.’

डॉ. इनामदार यांनी अध्यापनाचे शिक्षण घेणाऱ्या भावी शिक्षकांना महात्मा गांधींचे तत्वज्ञान शिकविण्यासाठी महाराष्ट्र स्मारक निधीला मदत करण्याचे आश्वासन दिले.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘महात्मा गांधी कधीही कालबाह्य होणार नाहीत. कारण प्रत्येक नवी पिढी त्यांचे विचार पुढे नेत आहे; पण नाश, आत्मनाश करताना सृष्टीचा नाश करण्याची विकृती दिसत असताना गांधी विचार ही विकृती काढण्याचा मार्ग दाखवत आला आहे. हिंसेचे उदात्तीकरण केले, तर जगच शिल्लक राहणार नाही. नश्वराची पूजा होता कामा नये. शाश्वताची पूजा झाली पाहिजे. शाश्वताचा शोध घेत, आत्मपरीक्षण करीत मोहनदास गांधी यांचा प्रवास महात्मा होण्यापर्यंत झाला. या निमित्ताने त्यांचे स्मरण केले पाहिजे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link