Next
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राज्यात शुभारंभ
अल्पभूधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळणार; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन
BOI
Monday, February 25, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘शेतकरी जगला की शेतमजूर जगतो, शेतमजूर जगला की बारा बलुतेदार जगतात, बारा बलुतेदार जगले की ग्रामीण अर्थव्यवस्था उभी राहते. हे चक्र विचारात घेता अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकास आणि उन्नतीसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली असून त्याद्वारे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळणार आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

लागवडीलायक धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असलेल्या अल्पभूधारक शेतकरी कुटुबियांना दोन हजार रुपये प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात सहा हजार रुपयांची मदत देणाऱ्या  ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’चा शुभारंभ केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. २४ फेब्रुवारीला मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी व फलोत्पादन सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे हे उपस्थित होते.

या वेळी जावडेकर म्हणाले, ‘केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. शेतजमीन मृदा आरोग्य पत्रिका, शेतकऱ्यांना निम कोटिंगयुक्त युरियाचा पुरवठा, सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतीसाठी मुबलक कर्ज पुरवठा, शेतमालाला किफायतशीर भाव, शेतीसाठी पूरेसा पाणी पुरवठा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना अशा अनेक योजना केंद्र तथा राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. या विविध विकास योजनांमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार असून तो कर्जबाजारी होणार नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच पडणार नाही.’ तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीची ही सर्वात मोठी योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘छोटया शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारी ही योजना असून, महाराष्ट्रातील सुमारे ६९ लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ७० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन हप्त्यामध्ये एकूण चार हजार २०० कोटी रुपयांचा लाभ मिळेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत’, अशी माहिती त्यांनी दिली.

कृषी व फलोत्पादन सचिव एकनाथ डवले यांनी प्रास्ताविकात योजनेची माहिती दिली. तलाठी यांच्या मदतीने लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार असून, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक या कामी सहकार्य करणार आहेत. योजना सुटसुटीत असून यासाठी, आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या वेळी प्रातिनिधिक स्वरुपात चौदा लाभार्थी शेतकऱ्यांचा पुष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शेतकरी, कृषी क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link