Next
भीमथडी जत्रा २२ ते २६ डिसेंबरदरम्यान
BOI
Saturday, December 15, 2018 | 01:50 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्राच्या संस्कृतीत जत्रा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सोहळा असतो. भीमथडी जत्रेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा दुवा ठरणारा संवाद सोहळा दर वर्षी पुण्यात रंगतो. यंदा हा सोहळा २२ ते २६ डिसेंबर दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर, सिंचननगर येथे होणार आहे. या वर्षी दोनशेहून अधिक स्टॉल्स येथे पहावयास मिळतील.

बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे गेली १३ वर्षे पुण्यात भीमथडी जत्रा भरवली जाते. ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांच्या हस्ते २२ डिसेंबर २०१८ रोजी यंदाच्या भीमथडी जत्रेचे उद्घाटन होईल.

सुनंदा पवार व सई पवार नेगी
याबाबत अधिक माहिती देताना सुनंदा पवार म्हणाल्या, ‘महिला बचत गटांची दर्जेदार उत्पादने, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो. त्यामुळे गेल्या १३ वर्षात भीमथडी जत्रेला पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिले. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला आणि ग्रामीँण कलाकारांच्या कलागुणांना दाद देण्याच्या उद्देशाने आम्ही या जत्रेची सुरुवात केली. यातून अनेक महिला बचत गटांची आर्थिक प्रगती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या.’

भीमथडी जत्रेत सई पवार नेगी यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘भीमथडी सिलेक्ट’ हे एक अनोखे आकर्षण आहे. यामध्ये ‘रीसायकल, रीयूज अँड सस्टेन’ म्हणजे ‘पुनर्निमाण, पुनर्वापर आणि टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित उत्पादने उपलब्ध केली जातात. यंदादेखील याचा एक विशेष विभाग असून, त्यात देशातील पारंपरिक हातमाग, हस्तकलेचे नमुने पहायला मिळतील.’ 

याबाबत अधिक माहिती देताना सई पवार नेगी म्हणाल्या, ‘या वर्षी पारंपरिक हातमागावरील विणकाम आणि इतर हस्तकला टिकवून ठेवण्यासाठी काम करणारे कारागीर आणि डिझायनर्सचे ३८ स्टॉल्स येथे असतील. त्यांनी सेंद्रिय कापूस, खादी, लिनन आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून निर्माण केलेली उत्पादने येथे असतील. गेल्या वर्षी पुणेकरांचा त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला होता.’ 

‘भीमथडी जत्रेत उपलब्ध होणारी उत्पादने ऑनलाइनही खरेदी करता येणार असून, त्यासाठी www.bhimthadibazar.com हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. सध्या येथे २७ महिला बचत गटांची उत्पादने उपलब्ध आहेत’, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

भीमथडी जत्रेत यंदा होणारे संगीत, नृत्याचे कार्यक्रम हे देखील विशेष आकर्षण आहे. यामध्ये २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता काश्मिरी संगीतकार सुफियान मलिक यांचे सादरीकरण होणार असून, २३ डिसेंबर रोजी कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आहे. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता लोकप्रिय गायिका कविता सेठ यांचा कार्यक्रम होणार असून,२५ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ‘अभंगा रिपोस्ट’ जाझ स्वरूपात मराठी अभंगाचे सादरीकरण होणार आहे. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ‘स्पंदन’ हा कथ्थक आणि बॉलीवूड डान्स फ्यूजनचा कार्यक्रम होणार आहे.      


कार्यक्रमाविषयी 
भीमथडी जत्रा 
स्थळ : कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर, पुणे 
वेळ : शनिवार, २२ डिसेंबर , संध्याकाळी ४ ते रात्री १०.
         रविवार, २३ ते बुधवार, २६ डिसेंबर - सकाळी १० ते रात्री १०. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link