परभणी : परभणीतील गणेश वाचनालयातर्फे साहित्यविषयक विविध उपक्रम राबविले जातात. या वाचनालयाला ११८ वर्षांची देदीप्यमान परंपरा आहे. ‘एक लेखक एक दिवस’ या उपक्रमांतर्गत १० फेब्रुवारी रोजी या वाचनालयातर्फे ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या प्रसाद कुमठेकर यांच्या उदगिरी बोलीतील कादंबरीवर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
‘एक लेखक एक दिवस’ या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या वेळी संबंधित पुस्तकाचे लेखक स्वतः या चर्चेत सहभागी होतात. याशिवाय वाचक आणि समीक्षक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतात. यामुळे पुस्तकाची कूळकथा व पार्श्वभूमी श्रोत्यांना ऐकायला मिळते.
अतिशय कमी दिवसांत अस्सल उदगिरी बोलीतील कथा वाचकांच्या पसंतीला उतरल्या. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही आली. यात अगदी सहज सोप्या विवेचनासह लेखकाने व्यापलेले अवकाश मोठे आहे. त्या गोष्टी प्रत्येकाला आपल्या वाटतात, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

या प्रसंगी कादंबरीवर बोलण्यासाठी उपस्थित असलेले सोलापूर विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक आणि नव्या दमाचे समीक्षक डॉ. दत्ता घोलप यांनी कादंबरी लेखनावर केलेले अभ्यासपूर्ण विवेचन नवी समज देणारे होते. आजच्या कादंबरीच्या मर्यादा आणि अवकाश व्यापण्याची क्षमता यांवरील त्यांचे भाष्य महत्त्वाचे होते. त्यांनी ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ आणि ‘बगळा’ या कुमठेकर यांच्या पुस्तकांचे वेगळेपण, त्यातील विवेकमूल्य, कथनातील प्रयोग, यातील भाषिक संस्कृती, भूगोल आणि एकूणच मराठी कादंबरीच्या वाटचालीत येऊ घातलेले नवे बदल विशद केले.
‘बगळा’ आणि ‘बारकुल्या’ यांमधील अस्सल बोलीप्रमाणे सहजतेने प्रसाद कुमठेकर यांनी आपले मत व्यक्त केले. ‘मी लेखक वगैरे नाही. माझा भवताल आणि मला भेटत गेलेले अनेक लोक यांच्याकडून मला जे मिळत गेले, जे मला मांडावेसे वाटले, ते मी माझ्या बोलीत गांभीर्याने आणि अतिशय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला,’ असे ते म्हणाले.
पत्रकार-लेखक विजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि कवी-निवेदक महेश देशमुख यांनी लेखकाची प्रकट मुलाखत घेतली.
(प्रसाद कुमठेकर यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)