Next
संकल्पना नैसर्गिक आहाराची...
BOI
Wednesday, April 25, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


आजकाल शाळांमध्ये अगदी छोट्या मुलांना ‘अग्नीशिवाय स्वयंपाक’ अशी एक संकल्पना सांगितली जाते. यामुळे मुले अतिशय आनंदाने वेगवेगळे पदार्थ बनवतात व त्याचा आनंदही घेतात. तसेच काहीतरी आपण मोठेही करू शकतो. आठवड्यातून एक दिवस फक्त नैसर्गिक अन्नपदार्थच खायचे... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या महत्त्वपूर्ण नैसर्गिक आहाराबद्दल... 
..............................
आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये काहीतरी हटके करायला मिळाले, की मज्जा येते..! नेहमीपेक्षा वेगळी केशरचना, कपडे, बॅग या सगळ्यांमध्ये भरपूर विविधता पाहायला मिळते व लोक आवडीने यांवर पैसे व वेळ खर्च करताना दिसतात. असेच काहीसे हटके आपण आपल्या आहारामध्येही करू शकलो तर..? नक्कीच धम्माल येईल..! 

आजकाल शाळांमध्ये अगदी छोट्या मुलांना ‘अग्नीशिवाय स्वयंपाक’ अशी एक संकल्पना सांगितली जाते. यामुळे मुले अतिशय आनंदाने वेगवेगळे पदार्थ बनवतात व त्याचा आनंदही घेतात. तसेच काहीतरी आपण मोठी माणसेही करू शकतो. आठवड्यातून एक दिवस फक्त नैसर्गिक अन्नपदार्थच खायचे. गॅस किवा ओव्हन यांचा फारसा वापर न करता, जे बनवणे शक्य आहे असेच पदार्थ खायचे. 

आता मात्र डोक्याला ताण द्यावा लागेल. ही संकल्पना खूप छान आहे. त्यातून मिळणारे फायदेही खूप आहेत; पण मग असे काहीतरी बनवायचे काय..? तर यासाठी खूपच छान पर्याय आल्यापुढे येतील. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आपण काय काय खाऊ शकतो, याची यादी बनवा आणि सुरुवात करा. 

सुरुवातीला वाटेल, उपाशीच राहावे लागेल; पण असे अजिबात नाही. चला, अशीच एक यादी तयार करू या.. - सुका मेवा, दुध, फळे, सॅलड, कडधान्ये (मोड आलेली), सातूचे पीठ (पारंपरिक पण एक पौष्टिक पदार्थ) मक्याचे कणीस (स्वीट कॉर्न), नारळपाणी, नीरा, सरबत, वेगवेगळ्या लाह्या (जसे साळ, राजगिरा, गहू, ज्वारी, नाचणी इ.), शेंगदाणे, फुटाणे, खोबरे अशी यादी वाढतच जाईल.

आणखी थोडा विचार केला, तर या संपूर्ण यादीत नक्कीच आणखी भर पडेल. पोळी भाजी नाही खाल्ली, तर जेवण कसे होणार..? असा प्रश्न नक्कीच पडेल. तर एक दिवस पोळी-भाजी किंवा नेहमीचे जेवण नको, म्हणूनच हा नवीन ‘पौष्टिक’ पर्याय. आपणच आपला एक दिवसाचा ‘आहार तक्ता’ बनवायचा. नोकरदार वर्गाने हा पर्याय म्हणून सुट्टीचा दिवस ठेवावा, कारण यामध्ये दर दोन तासांनी काहीतरी खायचे आहे. 

यात मग सुका मेवा, दुध, फळे नाश्यायचला सातूचे पीठ, दही पोहे, चुरमुरे व कडधान्यांची भेळ, स्वीट कॉर्न इत्यादी. जेवण्याचा वेळही ठरवून ठेवा. सोबत भरपूर सॅलड, दही, ताक, फळे व भाज्यांचे ताजे रस आहेतच. आधल्या-मधल्या वेळेत शेंगदाणे, गुळ, खोबरे, फुटाणे हे एकत्रित खाण्यासाठी आणि यांसोबतच अत्यंत पौष्टिक पण दुर्लक्षित खाद्य म्हणजे फळांच्या बिया. उदा. लाल भोपळा, टरबूज, कलिंगड इ. या फळांच्या बिया मिळून एक चमचाभर जरी खाल्ल्या, तरी त्यातून भरपूर पोषण मिळते. एक बाऊल सॅलड बनवतांना त्यात नुसत्या भाज्यांचा वापर न करता थोडे फळाचे तुकडे, सुका मेवा, कडधान्य (मोड आलेले) असे सर्व गुणधर्ममिश्रित संयोजन बनवू शकता. 

चला तर मग, एक दिवस गॅस आणि स्वयंपाकघराला आराम देऊ या व पचनसंस्थेवरचा ताण कमी करू या. अशा आहाराने शरीराला अत्यंत उत्तम पोषकतत्वे जशीच्या तशी मिळतील. कारण प्रक्रिया न करता आपण खाणार व शरीराचे ‘निर्विशीकरण’ही उत्तम होऊन शरीरात साठलेले विषारी पदार्थ निघून जातील. तरतरी, उत्साह, हलकेपणा जाणवेल. 

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link