Next
‘चांगली तयारी करणाऱ्याला एमपीएससीत निश्चित यश मिळते’
लेखाधिकारी प्रशांत जगताप यांचे प्रतिपादन
BOI
Friday, July 26, 2019 | 11:19 AM
15 0 0
Share this article:

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लेखाधिकारी प्रशांत जगताप.

रत्नागिरी : ‘स्पर्धा परीक्षा अत्यंत पारदर्शक आहेत. कोणताही वशिला येथे चालत नाही. चांगली तयारी करणार्‍याला यश निश्‍चित मिळू शकते. कधीकधी एमपीएससीद्वारे किंवा सरळ सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती निघते. अशावेळी आपण एमपीएससीसाठी केलेला अभ्यास सहज कामी येतो. कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमी दिशादर्शक ठरत आहे,’ असे लेखाधिकारी प्रशांत जगताप यांनी सांगितले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे ‘एमपीएससी परीक्षांची तयारी’ या विषयवार मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

जगताप म्हणाले, ‘कोकण बोर्डाचा बारावीचा निकाल राज्यात अव्वल आहे; पण ही मुले पुढे काय करतात, असा प्रश्‍न पडतो. कोकणात २५ अधिकार्‍यांपैकी २४ जण कोकणाबाहेरचे किंबहुना दुसर्‍या राज्यातील आहेत. कोकणाला निसर्गाने एवढे दिले आहे की कष्ट करायची गरज नाही. ही मानसिकता बदलण्याचे काम अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमी करत आहे. घरामध्ये गरिबी किंवा सामाजिक स्थितीसुद्धा वाईट असेल, तर अशी मुलेच प्रचंड कष्ट करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. आता कॉलेजला आलेली पिढी या परीक्षांचा अभ्यास करून लवकर यश मिळवत आहे.’


‘एमपीएससीचा अभ्यास केलेला विद्यार्थी कधीही उपाशी राहू शकत नाही. एखादी परीक्षा जाहीर होते, पदे भरपूर असतात व त्यात एमपीएससीचा अभ्यास उपयोगी ठरतो व यश मिळते. सात लाख विद्यार्थी पूर्वपरीक्षा देतात, त्यातील दहा हजार निवडतात. मुख्य परीक्षेत यातील एक हजार आणि मुलाखतीसाठी यातील ३५० जणांची निवड होते,’ अशी माहिती जगताप यांनी दिली.

या वेळी अकादमीचा विद्यार्थी शंतनू दुधाडे यांची सहायक कार्यकारी अभियंता वर्ग एक या पदावर एमपीएससी अभियांत्रिकी सेवा या परीक्षेतून निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. नोकरी मिळाल्यानंतर आपण आठ ते दहा तास काम करू शकतो, तर ती नोकरी मिळवण्यासाठी आपण आठ ते दहा तास अभ्यास का करू शकत नाही, असे दुधाडे याने बोलताना सांगितले. अभ्यास व नोकरीचे गुणांकन, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक, मुलाखतीतील अनुभव, संदर्भ पुस्तके याबाबत दुधाडे याने सविस्तर माहिती दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search