Next
‘बचत गटांनी आकर्षक वेष्टनासह उत्पादन विक्री करावी’
रवींद्र वायकर यांचा सल्ला
BOI
Wednesday, January 02, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this story

गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते महिला बचत गटांचा गौरव करण्यात आला.

रत्नागिरी : ‘महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी, उत्पादनांची विक्री चांगल्या प्रमाणात व्हावी यासाठी बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने आकर्षक वेष्टनासह विक्रीस आणण्याचा  प्रयत्न करावा’,असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शन ३० डिसेंबर २०१८ ते ३ जानेवारी २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, शिल्पा सुर्वे, महिला व बाल कल्याण सभापती साधना साळवी, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आरगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक पनवेलकर, जिल्हा विकास अधिकारी आरिफ शहा, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे आदी उपस्थित होते.

‘बचत गटांना मोक्याच्या ठिकाणी स्वयंपाकगृह उपलब्ध करून देण्याबाबत विचार करू, यामुळे त्यांना कायमस्वरुपी उत्पादन विक्री होऊ शकेल. बचत गटांच्या पदार्थांना घरगुती चव असते. रेल्वे स्थानक, तसेच रेल्वेमधूनही या पदार्थांच्या विक्रीसाठी प्रयत्न करेन. यामुळे रेल्वे प्रवाशांनाही कोकणी खाद्य पदार्थांचा स्वाद घेता येईल’,असे वायकर यांनी सांगितले. 

या वेळी गणपतीपुळे येथे बुडत असलेल्या पर्यटकांना वाचविणाऱ्या जीवरक्षकांचा वायकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  ‘रत्नागिरीच्या सर्व सागरी किनाऱ्यावर असे जीवरक्षक ठेऊन त्यांना आवश्यक असणारी साधने पुरविण्याबाबत प्रयत्न करणार आहोत. यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षितपणे सागरी किनाऱ्यांचा आस्वाद घेता येईल’, असे वायकर यांनी या वेळी सांगितले. 
 
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी म्हणाल्या, ‘महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात बचतगटांचा मोठा वाटा आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागात कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सरससारख्या प्रदर्शनामधून बचत गटांच्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळत आहे. मात्र, या वस्तूंची विक्री वाढण्यासाठी महिलांना विक्री व बाजारपेठ कौशल्याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे.’

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण म्हणाले, ‘ या महिला सबला आहेत. महिलांना व्यवस्थापन कौशल्याचे चांगले ज्ञान असते. कुटुंबाच्या चरितार्थासाठी उमेदच्या माध्यमातून महिलांची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. बाजारपेठेचा कल लक्षात घेऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादनांची विक्री करण्याचा प्रयत्न महिलांनी करावा. रेल्वे स्थानकांवरुनही गटांच्या उत्पादनांची विक्री होऊ शकेल. या सरस प्रदर्शनात १००हून अधिक महिला बचत गट सहभागी झाले आहेत ही विशेष आनंददायी आणि बचत गट चळवळीची उमेद वाढवणारी आहे.’

मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल म्हणाल्या, ‘सरस हे एक व्यासपीठ आहे. महिलांनी या प्रदर्शनात माहिती घ्यावी, उत्पादनाची विक्री कशी होते याचा अभ्यास करावा. बचत गट आर्थिक सक्षम कसा होईल याचा प्रयत्न करावा. ग्राहकांबरोबर संवाद कौशल्य कसे करावे, या बाबीही सरस प्रदर्शनातून समजावून घ्याव्यात. डी मार्टसारख्या मोठ्या संस्थांशी आम्ही संपर्क केला आहे. यामुळे वर्षभर महिला बचत गटांची उत्पादनांची विक्री होण्यास मदत होईल.’

विवेक पनवेलकर म्हणाले, ‘महिला बचत गटांच्या स्टॉल्सना प्रतिसाद उत्तम आहे. विक्री कौशल्याचा अनुभव यावा यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १७ हजार ४०० बचत गट असून, एक  लाख २० हजार महिलांचा यामध्ये समावेश आहे. उमेद अंतर्गत ४५० ग्रामसंघ स्थापन झाले आहेत. स्वयंसहाय्यता बचत गट चळवळ चांगली रुजली आहे.’

या वेळी तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील स्वयंसहाय्यता गटांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दै. पुढारीचे वार्ताहार राजेश ज्योष्टे यांना सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट बँक शाखा व्यवस्थापक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरुख शाखेचे अमोल शांडगे यांचाही गौरव करण्यात आला. 

विक्रांत सरगल यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link