Next
पहिले राष्ट्रीय अखिल मराठा संमेलन २५ ऑगस्टला ठाण्यात
देशभरातील १०० मराठा संस्थांचा सहभाग
प्रशांत सिनकर
Tuesday, August 20, 2019 | 12:41 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : अखिल मराठा फेडरेशन आणि ठाण्याचे मराठा मंडळ यांनी आयोजित केलेले राष्ट्रीय पातळीवरील पहिले अखिल मराठा संमेलन २५ ऑगस्ट २०१९ रोजी ठाण्यात होणार आहे. या संमेलनात देशभरातील किमान १०० मराठा संस्थांचा सहभाग असेल. या संमेलनात विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने आणि चर्चा होणार आहेत.

२५ ऑगस्टला दुपारी साडेतीन ते रात्री १० या वेळेत ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात हे संमेलन होणार आहे. या संमेलनातील पहिल्या सत्रात विद्यार्थी आणि तरुण पिढीसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सैन्यदल, वायुदल, नौदलामध्ये युवा पिढीला असलेले उज्ज्वल भवितव्य याविषयी सांगण्यासाठी जनरल विजयराव पवार या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 

उद्योगक्षेत्रात गरुडभरारी मारण्याची जिद्द मनात बाळगणाऱ्या युवावर्गाला ‘उद्योजक शिवाजी महाराज’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक प्रा. नामदेवराव जाधव मार्गदर्शन करणार आहेत. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांसंदर्भात दिशादर्शनासाठी ‘एमपीएससी’ बोर्डाचे माजी अध्यक्ष मधुकरराव कोकाटे मार्गदर्शन करणार आहेत.

देशभरातून आलेल्या १००हून अधिक मराठा संस्थांचे वैचारिक अधिवेशन दुसऱ्या सत्रात होणार आहे. या अधिवेशनात समाजाच्या, संस्थांच्या आणि शासनाप्रति ठराव मांडण्यात येतील. यातून मराठा समाजाला संबंधितांकडून काय अपेक्षा आहेत, याची माहिती दिली जाणार आहे.

मराठा समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कठोर अंमलबजावणीसाठी गेल्या तीन वर्षांत झालेल्या ५८ क्रांती मोर्चांना प्रतिसाद देऊन शासनाच्या आरक्षण समितीने केलेल्या सकारात्मक कामगिरीची पोचपावती तिसऱ्या व अंतिम सत्रात देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात मोठ्या भावाच्या समंजस भूमिकेतून, समाजाच्या मागण्यांसाठी अत्यंत शांतपणे, सर्व कायदे आणि नियम पाळून आयोजिलेल्या मूक मोर्चांनंतर जे यश मिळाले, त्या यशाचे फलित सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवणे ही त्या त्या विभागात वर्षानुवर्षे कार्य करणाऱ्या संस्थांची जबाबदारी आहे आणि त्यायोगे त्या बळकट होणे गरजेचे आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे. 

समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांप्रति ते करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. परगावच्या लाखो भक्तांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करणारे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयसिंह राजेभोसले, भारतीय सिनेसृष्टीत कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात आधिपत्य गाजवणारे जागतिक दर्जाचे कलादिग्दर्शक नितीन देसाई, मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस मराठ्यांचा बुलंद आवाज ठरलेल्या ‘दैनिक पुढारी’ या वर्तमानपत्राचे प्रतापराव जाधव, शिक्षणमहर्षी प्रा. दशरथ सगर, जगप्रसिद्ध अमृत डिस्टिलरीचे संस्थापक उद्योजक कै. नीलकांतराव जगदाळे (कर्नाटक) यांची प्रेरणादायी कामगिरी सर्वांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.

ज्या संस्था त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहेत त्यांचे कौतुकही या वेळी केले जाणार आहे. बौद्धिक खाद्य पुरविण्यासाठी नामवंत लेखकांचे साहित्य/प्रकाशनांचे प्रदर्शन संमेलनस्थळी ‘साहित्य कट्टा’ या विभागात आयोजित केले जाणार आहे. पुस्तकांच्या विक्रीतून जमा होणारा निधी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.

ज्या नवीन मराठा संस्थांना फेडरेशनमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी नोंदणी कक्षही संमेलनस्थळी असेल. या आगळ्यावेगळ्या समाजजागृती संमेलनाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल मराठा फेडरेशनचे सरचिटणीस आणि ठाण्याच्या मराठा मंडळाचे चिटणीस राजेंद्र साळवी यांनी केले आहे.
 
संपर्क : ९७०२३ ५२५६६
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
sudhakar patangrao About 23 Days ago
मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा खुप सुंदर आयोजन
0
0

Select Language
Share Link
 
Search