Next
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल...
BOI
Tuesday, October 31 | 06:45 AM
15 0 0
Share this story

आषाढी असो किंवा कार्तिकी एकादशी, टाळ-मृदंगाच्या गजरात ऐकू येतो पंडित भीमसेन जोशींचा स्वर आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ हा संत नामदेवांचा अभंग... राम फाटक यांची जन्मशताब्दी २१ ऑक्टोबरला साजरी झाली आणि आज कार्तिकी एकादशी आहे. त्या औचित्याने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’मध्ये आज घेऊ या ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’चा आस्वाद...
...............
दिवाळीतल्या गोड आठवणीत रमलेल्या जिवाला आणि दीपज्योतींच्या उजळलेल्या प्रकाशाकडे भान हरपून पाहणाऱ्या डोळ्यांना चाहूल लागते श्री विठ्ठल दर्शनाची! चातुर्मासातील अत्युच्य आनंदक्षणाची! आश्विन-कार्तिकातील पहाटवाऱ्याबरोबर विठ्ठल मंदिरातील काकड आरतीचा भक्तिरसानं ओतप्रोत भरलेला स्वर हळूहळू टिपेला पोहोचतो. कारण कार्तिकी एकादशीचा सोहळा भक्तजनांना अनुभवायचा असतो याचि देही याचि डोळा!

आज कार्तिकी एकादशी! मनाचं पाखरू केव्हाच पोहोचलंय पंढरपुरी... चंद्रभागेच्या तिरी... टाळ-मृदंगाचा गजर आषाढी एकादशीएवढा मोठा नसला, तरी हा गजर अंतर्मनाला साद घालणारा... खरीखुरी जाग आणणारा... दिवाळीतली पणती अंतर्मनातही तेवती ठेवणार ना, असा प्रश्न विचारणारा... विठूराया तुझ्या भक्तीचा भुकेला आहे हे सांगणारा... सावळ्या विठ्ठलाची महती गाणारा... पांडुरंग सर्वांचा, गोरगरिबांचा, कष्टाळू शेतकऱ्यांचा, ऊन-वारा-पाऊस झेलणाऱ्या वारकऱ्यांचा, अखंड हरिनाम घेणाऱ्यांचा, भजन-कीर्तन गाणाऱ्यांचा, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ असं सांगणाऱ्या संतांचा... 
आत्ता या क्षणी विठूरायाच्या पंढरीचं दर्शन मन:चक्षूंनी घेता घेता पं. भीमसेन जोशी यांचे स्वर कानात घुमू लागलेत... 

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल...

अभंग ऐकता ऐकता पंडितजींच्या स्वरांना अभिवादन केलं आणि संत नामदेवांच्या भक्तिभावानं भारलेल्या शब्दांना मनोभावे नमस्कार केला. त्याबरोबरच या अभंगाला ज्यांनी आपल्या संगीतरचनेनं आकाशवाणीच्या स्वरलहरींवरून घराघरात पोहोचवलं त्या प्रतिभासंपन्न संगीतकाराचं म्हणजेच विख्यात संगीतकार राम फाटक यांचं कृतज्ञतेनं स्मरण केलं. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. २१ ऑक्टोबरला त्यांचा जन्मदिवस होता. 

राम फाटक अर्थात रामचंद्र कृष्णाजी फाटक यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला. आकाशवाणी नागपूर केंद्रात १९५७ ते १९६६पर्यंत त्यांनी संगीतनिर्माता म्हणून काम केलं. त्यानंतर एक जानेवारी १९६७पासून निवृत्तीपर्यंत ते आकाशवाणीच्या पुणे केंद्रात कार्यरत होते. ‘संतवाणी’ची निर्मिती करण्याचं श्रेय राम फाटक यांना जातं. आकाशवाणीच्या पुणे केंद्रात रुजू झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेला ‘स्वरचित्र’ हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला. नागपूरला असताना त्यांनी ‘सोनिया सुगंधु आला’ या शीर्षकांतर्गत गीतांच्या मासिक कार्यक्रमाची निर्मिती केली. पुण्यात आल्यावर ‘स्वरचित्र’ या नावानं त्यांनी कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमातून जी गाणी प्रसारित केली गेली त्यातील काही गाण्यांनी तर अफाट लोकप्रियता मिळवली. त्यातील पं. भीमसेन जोशींनी गायलेलं ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गीत नंतर बाबुजींच्या आवाजात ध्वनिमुद्रिकेतून प्रसिद्ध झालं. ‘स्वरचित्र’ म्हणजे स्वरांनी सजवलेलं भावसौंदर्य असं म्हटलं जायचं. ‘स्वरचित्र’मधलं पहिलं गाणं बाबुजींनी म्हटलं होतं. त्यासाठी राम फाटक यांनी बा. भ. बोरकर यांची कविता निवडली होती. 

तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहून घे...

हे गीत रसिक श्रोत्यांना खूप आवडलं. आणि मग एकामागून एक दर महिन्याला अशा स्वरांनी सजवलेल्या भावसौंदर्याची भेट ‘स्वरचित्र’मधून राम फाटकांनी रसिकांना बहाल केली. संगीत विभागाचे तत्कालीन प्रमुख रवींद्र आपटे यांनी सादर केलेल्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात राम फाटक यांनी ‘स्वरचित्र’बद्दल हृद्य आठवणी सांगितल्या होत्या. कार्यक्रम अधिकारी शुभदा अभ्यंकर आणि रवींद्र आपटे यांच्याजवळ राम फाटक यांच्या अनेक आठवणी आहेत.   ‘स्वरचित्र’ या कार्यक्रमाची परंपरा आकाशवाणी पुणे केंद्रानं आजतागायत जपली आहे. 

पं. भीमसेन जोशी यांच्याकडून भावगीत गाऊन घेणारे पहिले संगीतकार म्हणून राम फाटक यांची ख्याती झाली. ‘रेडिओवर संगीतनिर्मात्याने वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत, नवनव्या संगीतरचना केल्या पाहिजेत या ध्यासातूनच ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गीत जन्माला आलं,’ असं स्वत: रामभाऊंनीच म्हटलं आहे. ‘स्वरचित्र’साठी भावगीतांची निर्मिती त्यांनी केलीच; पण अवघा महाराष्ट्र भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाला तो त्यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘संतवाणी’नं. मराठी भक्तिसंगीताच्या क्षेत्रात ‘संतवाणी’नं इतिहास घडवला. ‘संतवाणी’चं बीज आकाशवाणी पुणे केंद्राच्या ‘स्वरचित्र’ या कार्यक्रमात रुजलं. 

पंडितजींकडून ‘स्वरचित्र’साठी एखादी रचना गाऊन घ्यायची तर कोणती, असा प्रश्न रामभाउंना पडला. त्याचं उत्तर त्यांना ‘सकलसंतगाथा’मध्ये सापडलं. आकाशवाणीच्या ग्रंथालयात सकलसंतगाथा चाळता चाळता त्याच्या नजरेस पडला संत नामदेवांचा अभंग

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल।। 
माता विठ्ठल पिता विठ्ठल।
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल।।

पंडितजींच्या गळ्यातून हा अभंग गाऊन घेताना अवघ्या जन्माचं सार्थक झाल्याची भावना राम फाटक यांच्या मनात जागृत झाली. पं. भीमसेन जोशी यांच्यासाठीच या संगीतरचनेची निर्मिती झाली, याचं कारण विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्याच शब्दात सांगायला हवं. ते म्हणतात, ‘अभंग गाताना स्वरलयीपेक्षा अधिक महत्त्व पंढरपुरीच्या घननिळ्यावरील भक्तिभावाला. हे ज्याला उमगलं त्यालाच भजनात आणि संतवाणीत निखळ आनंदाचा अक्षय ठेवा गवसणार!’ खरंच पं. भीमसेन जोशी यांच्या स्वरात अभंग ऐकताना आपल्यालाही हाच अनुभव येतो. आषाढी असो वा कार्तिकी, पंडितजींच्या घनगंभीर आवाजातले अभंग आसमंत भारून टाकतात. वारकऱ्यांची पावलं या अभंगाच्या ठेक्यात पंढरीकडे वाटचाल करतात. जणू पंडितजींचा स्वर विठूरायाची भेट घडवून आणणारा पावन सेतू ठरतो आणि ऐहिक जीवनाकडून पारलौकिकत्वाकडे घेऊन जाणाऱ्या वाटेवरचा जणू प्रकाशदीप असतो.  

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल।।  

आनंदाचं निधान, सर्व सुखाचं आगर, प्रेमाचा सागर म्हणजे विठ्ठल... हा विठूराया सर्व रूपांत दिसतो. इतकंच नाही, तर स्व-रूपातही दिसतो. आपणच आपले विठ्ठलमय होऊन जाणारे संत नामदेव, या अद्वैत भावनेला स्वरबद्ध करणारे राम फाटक आणि आपल्या अलौकिक स्वरांमधून हा अभंग गाणारे पं. भीमसेन जोशी... या त्रिवेणी संगमावर रसिकांना साक्षात दर्शन होतं श्री विठ्ठलाचं... आषाढी असो किंवा कार्तिकी एकादशी, टाळ-मृदंगाच्या गजरात ऐकू येतो पंडितजींचा स्वर आणि राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला हा संत नामदेवांचा अभंग...

नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला।
म्हणोनि कळिकाळा पाड नाही।। 

ज्यांच्याजवळ स्वरांची शक्ती आणि विठ्ठलभक्ती आहे त्यांनी संकटाची पर्वा करायची तरी कशाला? त्रिभुवनातील कोणतीही गोष्ट विठ्ठलभक्तीपेक्षा महत्त्वाची नाही हे जितकं खरं, तितकंच परमेश्वराशी सख्य साधणारी संगीतकलाही महत्त्वाची. म्हणून तर आज कार्तिकी एकादशी साजरी करताना ओठावर येतो राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला हा अभंग... 

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल।।

विठूरायाच्या भक्तीत रममाण होऊ या आणि त्याबरोबर अशा भक्तिरसपूर्ण स्वरांनी मोहरलेल्या अभंगरचना ऐकून स्वरब्रह्माचाही आनंद घेऊ या...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link