Next
‘वडार समाजाच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद’
BOI
Wednesday, December 19, 2018 | 03:09 PM
15 0 0
Share this storyसोलापूर : ‘वडार समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपआराखडा तयार करून त्यासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर १७ डिसेंबर २०१८ रोजी वडार समाजाचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री विजय देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार राजन विचारे, आमदार बबन शिंदे, आमदार प्रणिती शिंदे,  आमदार भारत भालके, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अध्यक्ष विजय चौगुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘वडार समाजाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. या समाजाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. आता या समाजाच्या विकासासाठी काम करण्याची वेळ आली आहे. या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. विविध समस्या निराकरण करण्यासाठी इदाते आयोगाच्या शिफारशींचा विचार केला जाईल.’‘वडार समाजातील बेघर लोकांना घरांसाठी आर्थिक मदत देण्यात येईल. वस्ती असलेल्या जमिनीच्या जागेचे मालकीचे अधिकार प्रदान करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. वडार समाजातील शिक्षण संस्थांसाठी आणि वसतिगृहांसाठी जमीन देण्याचा राज्य शासन प्राधान्याने विचार करेल; तसेच खाणी वितरणात वडार समाजाला आरक्षण देता येईल का याबाबत राज्य शासनाकडून विचार केला जाईल. वडार समाजातील युवक स्वयंरोजगाराकडे वळावा, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामात समाजातील मजूर संस्थांना दहा टक्के कामे राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाईल,’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वडार समाजाच्या विकासासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात करून या समितीच्या अध्यक्षपदी विजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे जाहीर करतानाच चौगुले यांना राज्यमंत्री दर्जा दिला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अरविंद लिंबावळे यांची भाषणे झाली. वडार समाजातील प्रशासकीय अधिकारी बालाजी मंजुळे, उद्योगपती दिलीपराव मोहिते, चित्रकार शशिकांत धोत्रे, अरविंद शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय चौगुले यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
शिवाजी व्यवहारे About 95 Days ago
उपेक्षीत समाजाला ज्ञाय मिळेल . छान बातमी आहे .
0
0

Select Language
Share Link