Next
नव्वदीत प्रवेश केलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
प्राची गावस्कर
Thursday, April 26 | 02:06 PM
15 0 0
Share this story

अर्थतज्ज्ञ, संस्कृतचा व्यासंग असलेले लेखक, कवी असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष डॉ. वसंतराव पटवर्धन यांनी २४ एप्रिल रोजी ९०व्या वर्षात पदार्पण केले. एवढे वय असले, तरी त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. त्यांच्या या सकारात्मक जगण्याचे रहस्य, त्यांची आजवरची वाटचाल त्यांच्याचकडून जाणून घेऊ या ‘बाइट्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या या मुलाखतीतून ... 
........
- सर, आर्थिक क्षेत्राची, विशेषतः बँकिंग क्षेत्राची वाटचाल तुम्ही जवळून पाहिली आहे. सध्याचे विविध क्षेत्रांतील बदलही तुम्ही अनुभवत आहात. या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

- मी १९४७मध्ये ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये रुजू झालो, तेव्हा बँकेच्या फक्त २२ शाखा होत्या आणि ठेवी दोन कोटी रुपयांच्या होत्या. आता त्या ९० हजार कोटी रुपयांच्या आहेत. बँकिंग क्षेत्र तेव्हा अगदी प्राथमिक स्थितीत होते. १९६९मध्ये इंदिरा गांधी यांनी जेव्हा बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, तेव्हा बँकिंग क्षेत्राचे वर्णन ‘कमांडिंग हाइट्स ऑफ इकॉनॉमी’ म्हणजेच ‘अर्थव्यवस्थेतील हिमालयासारखी उत्तुंग शिखरे’ असे केले जायचे. त्यावर देशाचा अधिकार असला पाहिजे, या भूमिकेतून हे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्या वेळेला सगळ्या बँकांच्या मिळून सहा हजार शाखा होत्या. आता त्यांची संख्या दीड लाखाहून अधिक आहेत. बँकांमधील व्यवहारांचे प्रमाण, ठेवींचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. ‘जनधन’सारख्या योजना, नोटाबंदी यांमुळे १३ लाख कोटींची संपत्ती बँकांमध्ये आली. दुर्दैवाने सध्या एनपीए (अनुत्पादक खर्च) वाढत आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी, गीतांजली जेम्स, व्हिडिओकॉन यांसारख्या बड्या व्यक्ती/कंपन्यांनी कर्ज बुडवल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना असे वाटू लागले आहे, की आम्ही फक्त बँकेत पैसे ठेवायचे आणि मोठ्या उद्योजकांनी बुडवायचे, तर बँकांचा उपयोग काय? पण हे लक्षात घेतले पाहिजे, की बँका बुडीत कर्जासाठी तरतूद करून ठेवतातच. अशा कर्जांचे प्रमाण केवळ १० ते १२ टक्के असते. त्यामुळे उर्वरित ९० टक्के ठेवी, भांडवल सुरक्षित असते. सरकार भांडवल पुरवठाही करत असते. त्यामुळे लोकांना चिंतेचे कारण नाही. बँकिंग हा अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. शेती, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान अशी विविध क्षेत्रे अर्थव्यवस्थेला दिशा देत असतात. या प्रत्येक क्षेत्राची वाढ उत्तम गतीने झाली, तर भारताची अर्थव्यवस्था ७.४ टक्के नव्हे, तर ८.४ टक्के गतीने वाढू शकेल. आपल्याकडे सध्या शेती क्षेत्राचा विकास दीड ते दोन टक्के दराने होत आहे. दुर्दैवाने अद्याप पाण्याचे नियोजन झालेले नाही. आज एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पूर असे चित्र आपल्याला दिसते. नद्याजोड प्रकल्प राबवला, तर देशातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. अमेरिका, ब्राझील येथे दुष्काळ हा शब्द कधी ऐकायला मिळत नाही. तसा आपल्याकडचा दुष्काळ हद्दपार होईल. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, बी-बियाणे वापरले तर शेतीचे उत्पादनही वाढेल. शेती हा अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. याचप्रमाणे उद्योगधंदे वाढले, सेवा क्षेत्र विकसित झाले, तर देश नक्कीच महासत्ता होईल. आज आपल्या देशात लाखो किलोमीटरचे महामार्ग बांधले जात आहेत. उद्योगधंदे वाढतील. शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्र या तिन्ही बाजूंनी प्रगती झाली, तर अर्थव्यवस्था नक्कीच सुधारणार आहे. भारतीय संस्कृतीही एक तीळ सात जणात वाटून खावा असे सांगते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही भक्कम पायावर उभी आहे. 

- तुमच्या आयुष्यातील संघर्षमय परिस्थितीवर तुम्ही कोणत्या सकारात्मक ऊर्जेने मात केलीत? तुमच्या सकारात्मक ऊर्जेचे स्रोत कोणते?

- मी बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा याच क्षेत्रात करिअर करायचे निश्चित केले होते; मात्र आयुष्यात चढ-उतार येतच असतात. त्यामुळे करिअरवर लक्ष केंद्रित केलेले असतानाच घराच्या आघाडीवर मात्र संकट आले होते. माझ्या नऊ वर्षांच्या मुलाच्या हृदयाला एक छोटेसे छिद्र होते. वॉनलेसवाडी येथे त्याची शस्त्रक्रिया झाली; पण तो वाचू शकला नाही. हा आघात मी खंबीरपणे पचवला आणि पाच-सहा दिवसांत माझ्या कामाला सुरुवात केली. असे अनेक प्रसंग आले; पण माझ्या कामावरील निष्ठेने मला सतत सकारात्मक ऊर्जा दिली. तसेच मला सर्व गोष्टींमध्ये रस आहे. आजही मी नवीन चित्रपट पाहतो. कार्यक्रमांना जातो. आजही माझे वृत्तपत्रांमध्ये लेखन सुरू असते. वाचन करतो. फिरायला जातो. घरी थोडा व्यायाम करतो. आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींबाबत मला कुतूहल असते. या सगळ्या गोष्टींचा मी उत्साहाने आस्वाद घेतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते. माझे मामा एस. एम. जोशी हे मोठे पुढारी होते. त्यांचा सहवास मला लाभला. सुधीर फडके, अण्णा माडगूळकर (गदिमा) माझे चांगले मित्र होते. ते सिनेमाची कथा लिहिताना छोट्या छोट्या गोष्टींतून प्रसंग फुलवायचे. राज कपूर, व्ही. शांताराम हे माझे आवडते दिग्दर्शक आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींतून प्रसंग फुलवायच्या त्यांच्या कौशल्याचे मला नेहमीच कुतूहल असते. त्यातून मी काहीतरी शिकत राहतो. इंदिरा गांधी यांनी बांगलादेशचा प्रश्न सोडवताना खंबीर भूमिका घेतली. बँकांचे राष्ट्रीयीकरण करताना त्या ठामपणे उभ्या राहिल्या. प्रत्येक वेळी त्यांचे वेगळे रूप पहायला मिळाले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, सॅम माणेकशॉ अशा अनेक बहुआयामी व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या. त्यांच्याकडून मी काही ना काही शिकत गेलो. त्यातूनच माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होत गेला.

 मला असे वाटते, की प्रत्येकाने आयुष्यात काही स्वप्ने बघावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपड करावी. आयुष्य आपोआपच अर्थपूर्ण होईल. स्वप्न म्हणजे ‘ड्रीम’ या शब्दाचे मी माझ्यापुरते एक सूत्र तयार केले आहे. ते असे – डी - डाएट – आहार मध्यम स्वरूपाचा असला पाहिजे. आर – रेस्ट – थोडी तरी विश्रांती हवी. म्हणून मला सिनेमे बघायला आवडतात. तेवढ्या काळापुरते तुमचे मन दुसरीकडे गुंतते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडी तरी विश्रांती, बदल हवाच. ई – एक्सरसाइज – प्रत्येकाने रोज थोडा तरी व्यायाम केलाच पाहिजे. ए – अॅटिट्यूड – मी मुलांच्यात मूल होतो, मोठ्यांच्यात मोठा होतो. त्यामुळे कुठेही वावरताना मला अडचण येत नाही. असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. एम – मेडिसिन – वयोमानानुसार किंवा गरजेनुसार प्रत्येकाला जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा त्याने औषधोपचार घेतले पाहिजेत. त्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. असा हा ‘ड्रीम’ मंत्र मला ऊर्जा देत असतो. 

- तुम्ही अनेक पुस्तके लिहिली आहेत. तुमचा संस्कृतचा व्यासंगही मोठा आहे, बँकिंग क्षेत्रात कारकीर्द करत असताना हा व्यासंग कसा जोपासलात? 

- आजकाल लोक वेळ नाही अशी तक्रार करत असतात; पण अष्टावधान बाळगले तर या सगळ्या अडचणी दूर होतात. हिंदीत आम्हाला एक धडा होता ‘अष्टावधानी पंडित’ असा. तो माणूस एकाचवेळी खेळ खेळायचा, गाण्यातील चुका दाखवायचा, वाचन करणाऱ्याच्या चुका हेरायचा. एक माणूस एकाच वेळी इतकी व्यवधाने सांभाळत असेल, तर आपण का नाही करू शकत? त्यामुळे मी संस्कृतचा अभ्यास केला. संस्कृत वाड्मय हे अभिजात आहे. कालिदास हा माझा आवडता कवी. त्याच्या ‘मेघदूत’चे मी भाषांतर केले. ‘शाकुंतल’ हे माझे आवडते नाटक. तीन–चार संगीतिकाही मी केल्या. त्यांना सुधीर फडके, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले. चाणक्यावर मी ‘आर्य’ ही कादंबरी लिहिली. अर्थात, या सगळ्यात मला माझी पत्नी, मुले यांची चांगली साथ मिळाली. त्या आघाडीवर मला फार लक्ष द्यावे लागले नाही. त्यामुळे मी अनेक गोष्टी करू शकलो. 

- तुमच्या आगामी योजना काय आहेत?

- सहा महिन्यांत माझी ‘आकांक्षा’ ही अलेक्झांडरवरील कांदबरी पूर्ण होईल. त्यानंतर कालिदासावरही कादंबरी लिहिणार आहे. अनेक उपक्रमांमध्ये मी स्वतःला गुंतवून घेतले आहे, त्यामुळे मी सकारात्मक रीतीने आयुष्य व्यतीत करत आहे. 


(डॉ. वसंतराव पटवर्धन आजही शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात नेमके मार्गदर्शन करणारे अभ्यासपूर्ण लेख विविध माध्यमांत नियमितपणे लिहितात. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरही दर रविवारी त्यांचा लेख प्रसिद्ध होतो. त्यांचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख एकत्रितपणे  https://goo.gl/MB2VjRया लिंकवर उपलब्ध आहेत.)

(डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्या विशेष मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link