Next
गंधर्वनगरीची पन्नाशी
BOI
Monday, June 26, 2017 | 10:34 AM
15 1 0
Share this article:

बालगंधर्व अर्थात नारायण श्रीपाद राजहंस यांचा आज जन्मदिन. तसंच, पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला आज, २६ जून २०१७ रोजी सुरुवात होत आहे. हे रंगमंदिर म्हणजे पुण्यातल्या सांस्कृतिक पटावरचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. ‘बालगंधर्व’च्या पाच दशकांचा हा कालखंड म्हणजे साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटना-घडामोडींचा सुवर्णकाळच होय. ‘बालगंधर्व’च्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने, ‘बालगंधर्व’शी निगडित असलेल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘बाइट्स ऑफ इंडिया’ उलगडणार आहे. ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या नावाने ही लेखमाला आजपासून प्रसिद्ध होईल. या सगळ्याचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...
............
प्रत्येक गोष्टीबद्दलचा अभिमान बाळगणं ही ज्या शहरातल्या नागरिकांची खासियत आहे, ते शहर म्हणजे ‘पुणं.’ मग ते सारसबागेतलं सिद्धिविनायकाचं मंदिर असो किंवा प्रभात थिएटर असो, तुळशीबाग असो किंवा अप्पा बळवंत चौक असो, इथल्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक पुणेकराला अभिमान आहे आणि असतो. अर्थातच इथं जन्मलेल्या किंवा पुणे ही ज्यांची कर्मभूमी आहे, अशा नामवंत व्यक्तींबाबतही पुणेकरांना अभिमान असतो. (खरोखरच अभिमान वाटेल अशाच गोष्टींबद्दल पुणेकर अभिमान बाळगतात आणि संबंधितांकडून त्या अभिमानाला ठेच पोहोचेल, असं काही झाल्यास तसं सुनावण्यास मागे-पुढे पाहायचं नाही, हाही पुणेकरांचा गुणविशेष. असो.) 

अशीच अभिमान वाटावा अशी पुण्यातली एक वास्तू आज, २६ जून रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या वास्तूचं नाव बालगंधर्व रंगमंदिर. मुळा-मुळा नदीच्या काठावर, संभाजी उद्यानाच्या जवळ जंगली महाराज रस्त्यावर गेली ५० वर्षं उभी असलेली ही वास्तू म्हणजे पुण्यातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींची साक्षीदार आहे. एखाद्या नाट्यगृहात नाटकं सादर होणं आणि त्यांचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घेणं यात काही नवल नाही; पण त्याहीपलीकडे जाऊन हे नाट्यगृह जेव्हा सर्व प्रकारच्या कलाकारांना आपलं व्यासपीठ उपलब्ध करून देतं, तेव्हा ते अद्वितीय ठरतं. 

ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना आपण त्यांच्या शैलीदार साहित्यासाठी, दर्जेदार नाटकांसाठी आणि गुणग्राही व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखतो. अशी विचारवंत व्यक्तीच्या पुढाकारातून जेव्हा ‘बालगंधर्व’सारखी वास्तू उभी राहते, तेव्हा ‘पुलं’च्या दूरदृष्टीची आणि व्यापक दृष्टिकोनाची आपल्याला कल्पना येते. या लेखमालेच्या निमित्ताने ज्यांच्याशी संपर्क साधला, त्या प्रत्येक मान्यवराने ‘पुलं’च्या या दूरदृष्टीचा उल्लेख केला. त्याचं सर्वांत चांगलं उदाहरण म्हणजे ‘क्राय रूम.’ म्हणजेच कलेसाठी बांधायच्या वास्तूचाही कलात्मकदृष्ट्या आणि कलेचा पुरेपूर आस्वाद रसिकांना घेता येईल, अशा दृष्टीने विचार करणं ही किती महत्त्वाची गोष्टी आहे, याचा अंदाज यावरून येतो. अशा विविध गोष्टींचा विचार करून ‘पुलं’नी या रंगमंदिराच्या बांधकामाची दिशा दिली आणि नामवंत बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांनी त्याची त्याबरहुकूम त्याची उभारणी केली. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं. त्या वेळी ना. ग. गोरे पुणे महापालिकेचे महापौर होते. त्यांनी आणि ‘पुलं’नी उद्घाटनाचा कार्यक्रम चिरस्मरणीय होईल, या दृष्टीनं नियोजन केलं होतं. 

छायाचित्र : बालगंधर्व रंगमंदिराच्या वेबसाइटवरून साभार.ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून ‘पुलं’नी बालगंधर्वांची ‘संगीत स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेशातील आणि पुरुष वेशातील अशी दोन मोठ्या आकारातील तैलचित्रं काढून घेतली. आजही रंगमंदिरात गेल्यानंतर ती पाहायला मिळतात. बालगंधर्वांच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही या तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे.

ज्या बालगंधर्वांच्या नावाने हे रंगमंदिर उभं राहिलं, त्यांच्याच हस्ते त्याची पायाभरणी झाली होती, हे या नाट्यगृहाचं आणखी एक वैशिष्ट्य. बालगंधर्वांचं हे स्मारक जणू गंधर्वनगरीच ठरलं. कारण गायन, वादन, नृत्य, नाट्य, विविध प्रकारच्या कला, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांतल्या नामवंतांनी हे व्यासपीठ गाजवलं. पु. ल. देशपांडे यांची रसाळ भाषणं, वसंतराव देशपांडे यांचं वैशिष्ट्यपूर्ण गाणं आणि मागच्या पिढीतल्या ताकदीच्या नाटककारांची नाटकं जशी इथं रंगली, तशीच सुरेखा पुणेकरांची लावणीही रंगली. साहित्याचं अभिवाचन, नृत्याचं सादरीकरण, वादनाची जुगलबंदी अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम इथं सादर होऊ लागले आणि रसिकांची त्यांना उत्स्फूर्त दादही मिळू लागली. अनेक चित्रकार, व्यंगचित्रकार, छायाचित्रकारांना कलादालनाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळालं. त्यामुळे गंधर्वनगरीची पन्नाशी हा खरोखरच सुवर्णकाळ ठरला आहे.  

अर्थात, महापालिकेनं हे नाट्यगृह आणि त्याचा वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीनं जपला पाहिजे, अशी अपेक्षाही प्रत्येक कलाकारानं व्यक्त केली. कलाकारांचं बुकिंग कॅन्सल करून नाट्यगृह राजकीय कार्यक्रमांसाठी देणं, स्वच्छता नसणं, कलाकारांवर विविध प्रकारची बंधन असणं आणि व्यवस्थापन नेटकं नसणं, याबद्दल प्रत्येकानं खंत व्यक्त केली आणि व्यवस्थापनानं/पालिकेनं व्यवस्थित लक्ष घातल्यास या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असा आशावादही व्यक्त केला.  
.....................
बालगंधर्व रंगमंदिराबद्दलच्या अनेक मान्यवरांनी उलगडलेल्या आठवणी आपण लेखमालेच्या रूपाने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचणार आहात. या रंगमंदिराची पायाभरणी आणि उद्घाटन कार्यक्रम अशा दोन्हींचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या आठवणींपासून त्याची सुरुवात करत आहोत. 
..............
‘राज्यभरात गाजणारं थिएटर’
बालगंधर्व रंगमंदिराची पायाभरणी आणि रंगमंदिराचं उद्घाटन या दोन्हीही कार्यक्रमांचा मी साक्षीदार आहे. मी त्या वेळी कॉलेज करून बातमीदारी करायचो. त्यामुळे मला या कार्यक्रमांना जाता आलं. या रंगमंदिराची पायाभरणी स्वतः बालगंधर्वांच्याच हस्ते झाली होती. पांढऱ्या हाफ चड्डीमध्ये बालगंधर्व पायाभरणीला आले होते. रंगमंदिराची रचना आणि उद्घाटनाचा कार्यक्रम कसा असावा, याचं नियोजन पु. ल. देशपांडे यांनी केलं होतं. वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर अशा त्या वेळच्या ताकदीच्या कलावंतांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाची नांदी म्हटली होती. या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे यांनी केलेलं भाषणही खूप छान झालं होतं. त्यातील चार ओळी माझ्या आजही लक्षात आहेत.

ते म्हणाले होते, ‘इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातली स्त्री म्हणजे झाशीची राणी (पुतळा) आहे. आत स्त्रीच्या वेषातला पुरुष म्हणजे बालगंधर्व आहेत. अशी अर्धनारीनटेश्वराची दोन रूपं ज्या आहेत, तिथं नटेश्वराचं मंदिर उभारलं जातंय, ही फार आनंदाची बाब आहे. अलीकडे नटेश्वर आहे, पलीकडे ओंकारेश्वर (त्या वेळी तिथं स्मशान होतं) आहे. मधून जीवनाची सरिता (मुळा-मुठा नदी) वाहते. आमचे महापौर त्यावर पूल बांधणार आहेत (आत्ताचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल त्या वेळी नव्हता.) हा पूल ओंकारेश्वरकडून नटेश्वराकडे येणारा एकतर्फी असावा, अशी माझी त्यांना विनंती आहे.’

क्राय रूमची सोय, तसंच त्या वेळच्या तुलनेत खूप अत्याधुनिक सुविधा यांमुळे हे रंगमंदिर उजवं ठरलं. अनेक ताकदीचे कलावंत ‘बालगंधर्व’शी पहिल्यापासून निगडित होते. तेव्हा हे नाट्यगृह शहरापासून लांब असल्याने, एवढ्या लांब कोण जाणार असं वाटायचं; पण कलेच्या माध्यमातून लोकांना खेचून आणू, असा विश्वास पु. ल. देशपांडे आणि त्या वेळचे महापालिका आयुक्त स. बा. कुलकर्णी यांना होता. तो खरा ठरला. अत्याधुनिक सोयींनी युक्त असं बालगंधर्व रंगमंदिर फक्त पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारं थिएटर ठरलं. 

- सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ मुलाखतकार

(शब्दांकन : अनिकेत कोनकर)

(या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search