Next
‘मानव व वन्यप्राणी यांचे सहअस्तित्व मान्य’
प्रेस रिलीज
Thursday, March 22, 2018 | 03:27 PM
15 0 0
Share this article:

वन्यजीव संशोधक विद्या अत्रेय
पुणे : ‘एकीकडे वाढती लोकसंख्या असतानाही भारतात वन्यजीवनात भरपूर विविधता टिकून आहे. पण त्यामुळे मानव व वन्यप्राणी यांच्यात अनेक ठिकाणी अडचणींचे व संघर्षाचे प्रसंग येतात. असे असले तरी आजही जंगलांजवळील मानवी प्रदेशात माणसाने वन्यप्राण्यांचे सहअस्तित्व मान्य केले असून अनेक भागात प्राण्यांची काळजीही घेतली जाते. जगंलाजवळील ग्रामीण लोक व शेतकरी हे नाते जपतात,’ असे वैशिष्ट्यपूर्ण निरिक्षण प्रसिद्ध वन्यजीव संशोधक विद्या अत्रेय यांनी नोंदवले. 

वन्यजीव संशोधक विद्या अत्रेय मार्गदर्शन करताना
भारतातील वन्यप्राणी जतन तसेच महाराष्ट्र व देशपातळीवर वन्यजीव धोरणात अत्रेय यांचा सक्रीय सहभाग आहे. डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ अर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील कला, संस्कृती, पर्यावरणशास्त्र व वन्यजीवन नेचर्स क्लबतर्फे भारतातील मानवी व वन्यजीव संवाद या विषयावर अत्रेय बोलत होत्या. बीएनसीएच्या वनजा क्लबतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप आणि प्रा. अस्मिता जोशी यांनी पुढाकार घेतला होता. वन्यजीवन व पर्यावरण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रा. जोशी यांनी सांगितले.

‘लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या आपल्या देशात आजही वन आणि  वन्यप्राणी यांचा वारसा मोठा असला तरी त्यांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेली अभयारण्ये अपुरी आहेत. भारतातील एकंदर जमिनीपैकी केवळ पाच टक्के भूप्रदेश वन्यप्राण्यांसाठी उपलब्ध आहे. हत्ती वा बिबट्यांसारख्या प्राण्यांना सीमा कळत नसल्यामुळे त्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव होतो व त्यांनाच ते खाद्य समजतात. प्राण्यांबाबत आपल्याकडे पुरेशी संवेदनशीलता जोपासली गेली पाहिजे. भारतातील अव्वल इंग्रजी कालखंडात म्हणजे १८७७ ते १९२७ या काळात वीस हजार वन्यप्राण्यांच्या शिकारी झाल्या. या पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांमधील वैविध्याचा वारसा आपण आवर्जून जपला पाहिजे’, यावर अत्रेय यांनी भर दिला.

‘आपल्याकडे सर्वत्र माणसाने स्वत:साठी असणारे प्रदेश, त्यांचे नकाशे आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा केवळ मानवकेंद्री बनवल्यामुळे वन्यप्राण्यांची कुचंबणा होऊन अनेक अपघातांमध्ये त्यांना प्राण गमवावे लागतात किंवा जीव धोक्यात घालावा लागतो. रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग, इलेक्ट्रिक केबल्स व पूल यांना ओलांडून जाणे त्यांना अवघड जाते. अशा ठिकाणी मूलभूत सुविधा उभारताना वन्य प्राण्यांच्या वावराचाही विचार केला गला पाहिजे. अपघातात जखमी झालेल्या वा विहिरीत अडकलेल्या प्राण्यांची सुटका व त्यांचे पुनर्वसनाचे मार्गही अधिक विधायक असायला हवेत. भूपृष्ठ वास्तूरचनेत (लॅण्डस्केप आर्किटेक्चर) पर्यावरणाबरोबरच प्राण्यांसाठीही नियोजन करणे शक्य आहे;तसेच परदेशातील वन्यजीवनाचा विचार करून राबवण्यात आलेल्या संकल्पना इथे जशाच्या तशा राबवणे चुकीचे आहे,’ असेही अत्रेय यांनी स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search