Next
‘हॅम्लेट’ची भूमिका आयुष्यातील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक
अभिनेते सुमित राघवन यांची भावना
BOI
Tuesday, February 05, 2019 | 01:52 PM
15 0 0
Share this story

(डावीकडून) मुग्धा गोडबोले, तुषार दळवी, वामन पंडित, सुनील तावडे, श्रीपाद पद्माकर.

रत्नागिरी :
‘माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम तीन भूमिका निवडायची वेळ आली, तर त्यामध्ये ‘हॅम्लेट’च्या भूमिकेचा नक्की समावेश असेल,’ अशी भावना अभिनेते सुमित राघवन यांनी व्यक्त केली. ‘हॅम्लेट’ नाटकाचे प्रयोग नुकतेच रत्नागिरीत झाले. त्या वेळी या नाटकातील कलाकारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. 

तीन फेब्रुवारी रोजी नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘हॅम्लेट’चे निर्माते श्रीपाद पद्माकर, अभिनेते सुमित राघवन, तुषार दळवी, सुनील तावडे आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांच्याशी कोकणातील नाट्यकर्मी आणि ‘रंगवाचा’ या रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाचे संपादक वामन पंडित यांनी संवाद साधला. ‘हॅम्लेट एक शिवधनुष्य’ हा विषय घेऊन पंडित यांनी कलाकारांना बोलते केले. नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. 

निर्माते श्रीपाद पद्माकर म्हणाले, ‘या नाटकाचा सेट भव्य आहे. २२ कलाकारांसह एकूण ८० जणांचा संच आहे. सेट लावायला तब्बल आठ तास लागतात. अनेक नाट्यगृहांमध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. म्हणून आम्ही आवश्यक त्या सर्व गोष्टी स्वतः घेऊनच जातो. त्यामुळे स्थानिक नाट्यगृहावर आम्ही कोणत्याच प्रकारे अवलंबून राहत नाही. प्रेक्षकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नाट्यानुभव देण्यासाठी हे केले जाते. या सगळ्या भव्यतेमुळेच या नाटकाच्या तिकिटांचे दर जास्त आहेत.’

सुमित राघवन म्हणाले, ‘शेक्सपीअरची भाषा, मानवी मनाचे कंगोरे, अनुवादाची पल्लेदार मराठी भाषा या सगळ्या गोष्टी म्हणजे एक आव्हान होते. त्यामुळे हे नाटक साकारणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. आम्ही यासाठी प्रचंड सराव केला. यात सेट लावायला जसा जास्त वेळ लागतो, त्याप्रमाणेच कलाकारांना मेकअपसाठीही तब्बल दोन-अडीच तास लागतात. अशा नाटकासाठी केवळ कलाकार उत्तम असून चालत नाही, तर उत्तम व्यवस्थापनही लागते. ते ‘जिगीषा’ आणि ‘अष्टविनायक’ यांनी उत्तम पद्धतीने केले आहे. एखादी कविता किंवा कथा आपण पुनःपुन्हा वाचली, तरी त्यातील नवे काही तरी प्रत्येक वेळा गवसत जाते. हे नाटक तर भव्य आहे, त्यामुळे प्रत्येकाला आणि प्रत्येक वेळी त्यातील नव्या गोष्टी उमगत जातात.’

क्लॉडियसची भूमिका साकारणारे तुषार दळवी म्हणाले, ‘यात मी साकारत असलेली भूमिका खलप्रवृत्तीची असली, तरी सुरुवातीपासूनच ती तशी नाही. त्यात वैविध्य असल्याने ती करत असताना मजा आली. हे नाटक कालातीत आहे. त्यातील व्यक्तिरेखाही अशा आहेत, की प्रत्येक ठिकाणच्या प्रेक्षकाला त्यात स्वतःशी, स्वतःच्या भावनांशी साधर्म्य आढळते. त्यामुळे जगभरातील कोणत्याही ठिकाणचा प्रेक्षक त्याच्याशी ‘रिलेट’ करू शकतो. हेच त्या नाटकाचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. आम्ही हे नाटक करताना भाषेवर, संवादफेकीवर आणि सर्वच गोष्टींवर मेहनत घेतली. सुमारे तीन महिने तालीम सुरू होती.’

पोलोनियसची भूमिका करणारे सुनील तावडे म्हणाले, ‘रत्नागिरीजवळचे फणसोप हे माझे आजोळ. त्यामुळे रत्नागिरीत प्रयोग होणे आणि ‘चतुरंग’सारख्या संस्थेने रत्नागिरीत मुलाखतीसाठी बोलावणे हे भाग्य आहे. हॅम्लेट नाटकात काम करणे ही एक प्रकारची कार्यशाळाच होती. चाळीस वर्षांचा अनुभव असला, तरी यात खूप काही नवे शिकता आले. तरुण कलाकारांसोबत काम करताना नवी ऊर्जा मिळाली. त्यासाठी तालमीला सर्वांत आधी पोहोचत होतो.’

गर्ट्रुड राणीची भूमिका करणाऱ्या मुग्धा गोडबोले म्हणाल्या, ‘या नाटकात काम करणे हे शिवधनुष्यच होते. त्यात माझ्या वाट्याला जी भूमिका आलीय, तिच्याबद्दल नाटकभर अनेक संवाद आहेत; मात्र प्रत्यक्षात तिच्या तोंडी असलेले संवाद फार कमी आहेत. त्यामुळे चेहऱ्यावरील हावभावांवरून अनेक गोष्टी दाखवायच्या होत्या. हे निश्चितच आव्हानात्मक आहे. शिवाय, शेक्सपीअरच्या नाटकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कोणत्याच व्यक्तिरेखा संपूर्णपणे चांगल्या किंवा संपूर्णपणे खलनायकी नसतात. त्यामुळे त्यांना एकाच साच्यात बसवता येत नाही. या नाटकात काम करण्याचा अनुभव मी आयुष्यभर विसरू शकत नाही.’

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची पात्रांची निवड, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे दिग्दर्शन, त्यांचा अभ्यास, ते कलाकारांवर घेत असलेली मेहनत अशा गोष्टींबद्दल सर्वच कलाकारांनी त्यांचे भरपूर कौतुक केले आणि त्यांच्यामुळेच हे नाटक भव्य-दिव्य स्वरूपात उत्तम पद्धतीने लोकांपुढे आणता आले असल्याची भावना साऱ्यांनी व्यक्त केली. 

भावना व्यक्त करताना चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर.

‘चतुरंग’चे विद्याधर निमकर यांनी सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ‘चतुरंग’तर्फे आतापर्यंत देण्यात आलेल्या जीवनगौरव पुरस्कारांबद्दलची चित्रफीत कार्यक्रमाच्या शेवटी दाखवण्यात आली. 

(सर्वांच्या मनोगताचे व्हिडिओ सोबत देत आहोत. नाटककार विल्यम शेक्सपीअरबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
AK Farakate About 18 Days ago
Hamlet हे एक साहस आहे. हे या मराठी वल्लीनी लीलया पेललं आहे. ग्रेट! चतुरंग व वामन पंडितांनाही मानले पाहिजे.
0
0

Select Language
Share Link