Next
श्री. ज. जोशी, शाहीर अण्णा भाऊ साठे, हर्मन मेलव्हील
BOI
Tuesday, August 01, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

एक ऑगस्ट हा पुण्याबद्दल आपुलकीनं आणि प्रेमानं लेखन करणारे अस्सल पुणेकर श्री. ज. जोशी, महाराष्ट्राचे लाडके शाहीर अण्णा भाऊ साठे या मराठी आणि ‘मॉबी डिक’ या कादंबरीतून माणूस विरुद्ध व्हेल अशा थरारक लढाईचं चित्रण करणाऱ्या हर्मन मेलव्हील या इंग्लिश कादंबरीकाराचा जन्मदिवस. आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
............
श्री. ज. जोशी
 
एक ऑगस्ट १९१५ रोजी पुण्यात जन्मलेले श्रीकृष्ण जनार्दन जोशी हे लोकप्रिय, सिद्धहस्त लेखक आणि अस्सल पिढीजात पुणेकर! सव्वाशे वर्षांपासून त्यांचं घराणं पुण्यात सदाशिव आणि नारायण पेठेत वास्तव्य करून असलेलं. त्यामुळे आधी वडिलांकडून जुन्या पुण्याच्या गमतीदार हकीकती त्यांनी ऐकल्या होत्या. समाजाचं परिवर्तन आधी वडिलांकडून ऐकून आणि पुढे स्वतः प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे ‘श्रीजं’कडे भरपूर किस्से जमा झाले होते, तशात गोष्टीवेल्हाळपणा वारशानेच चालत आलेला; त्यामुळे ‘श्रीजं’नी तो गोष्टीरूपाने उतरवला नसता तरच नवल!
 
सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात गोविंदराव तळवलकरांनी ‘मटा’साठी, ‘मी पुण्याहून लिहितो की...’ अशी एक लेखमालाच त्यांच्याकडून वर्षभर लिहून घेतली होती. ‘श्रीजं’च्या लहानपणी ‘सिटी पोस्टापलीकडे पुणे नाही आणि पुण्यापलीकडे महाराष्ट्र नाही’ असं म्हटलं जाई. त्यामुळे अंगात पुण्याबद्दलचा जाज्ज्वल्य अभिमान असलेल्या ‘श्रीजं’नी पुण्याबद्दल अत्यंत आपुलकीनं आणि प्रेमानं भरपूर लेखन केलं आहे.

त्यांचं लेखन अत्यंत ताजं आणि टवटवीत असतं. ‘पुण्यात दुमजली बस येते’, ‘हुजूरपागेच्या मुली’, ‘ओंकारेश्वर ओंकारेश्वरी गेले’,’ पीएमटी एक संकीर्तन’, ‘सदाशिव पेठ साहित्यपेठ’ अशांसारखी त्यांच्या लेखांची शीर्षकंही पुणेकरांना जवळची असत. पांढरपेशा समाजामध्ये गेल्या शंभर-दीडशे वर्षांत झालेलं परिवर्तन त्यांच्या बहुतेक कथांमधून त्यांनी अत्यंत लालित्यपूर्ण भाषेत केलं आहे.

आनंदी गोपाळ’ आणि ‘रघुनाथाची बखर’ या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबऱ्या! पुणेरी, भरती ओहोटी, जोशीपुराण, माझ्या साहित्याचा बॅलन्सशीट, श्रीकृष्णकथा भाग एक ते सहा, स्थावर, वृत्तांत, सुचलं...लिहिलं, सुलभा, ऐलमा पैलमा, ओलेता दिवस, सुलभा, सूर्यापोटी, मामाचा वाडा अशी त्यांची ५०हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१३ जानेवारी १९८९ रोजी त्यांचं निधन झालं.
....................

शाहीर अण्णा भाऊ साठे

एक ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावमध्ये जन्मलेल्या तुकाराम उर्फ अण्णा भाऊराव साठे यांचं बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं होतं. भाऊ शिदोबा साठे आणि वालुबाई यांचा मुलगा असलेल्या तुकारामला लहानपणी एकटं राहायला आवडे. गर्दीपासून दूर डोंगरदऱ्या, नद्यांचे काठ, जंगलं, गुहा असं तो एकटाच फिरत असे. त्याला मैदानी खेळांचीही आवड होती. त्याची धाकटी बहीण जाईबाई त्याला ‘अण्णा’ म्हणत असे आणि पुढे तुकाराम हे नाव मागे पडून अण्णा या नावानेच हा मुलगा लोकप्रिय शाहीर म्हणून जगासमोर आला.

लोकगीतं, पोवाडे, लावण्या वगैरे पाठ करून खणखणीत आवाजात इतरांना ऐकवण्याचा छंद अण्णांना लहानपणापासूनच होता. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं स्फूर्तिदायी भाषण ऐकून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिलं. ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी काम सुरू केलं. कम्युनिस्ट मंडळींबरोबर काम केलं. पक्षाच्या सभा, मोर्चे आणि उपस्थित जनसमुदायासमोर पोवाडे, लोकगीतं म्हणणं यामुळे ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, आणि गोवा मुक्तिसंग्रामात जनजागृतीचं प्रचंड काम केलं. तमाशाचं स्वरूप बदलून त्यांनी ‘लोकनाट्य’ नावाखाली नवीन स्वरूपात सादरीकरण करून त्या कलेला आणि कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी ‘लाल बावटा’ या कलापथकाची स्थापन केली होती.
 
‘माझी मैना गावाकडं राह्यली’ ही त्यांची रचना न भूतो अशी गाजली आणि या एका रचनेमुळे त्यांचं नाव सर्वदूर झालं. त्यांनी ३५ कादंबऱ्या, तीन नाटकं, १३ कथासंग्रह, १० पोवाडे असं विपुल लिखाण केलं.

अग्निदिव्य, अहंकार, अमृत, आवडी, बरबाद्या कंजारी, चिरागनगरची भुतं, चित्रा, फकिरा, गजाआड, गुऱ्हाळ, खुळंवाडी, कुरूप, पाझर, रानबोका, रुपा, तारा, आग, आघात, देशभक्त घोटाळे, माझा रशियाचा प्रवास, माझी मुंबई, अकलेची गोष्ट अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 
१८ जुलै १९६९ रोजी त्यांचं निधन झालं.
.....................

हर्मन मेलव्हील

एक ऑगस्ट १८१९ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला हर्मन हा दर्यावर्दी जीवनावर कादंबऱ्या लिहिणारा अमेरिकन कादंबरीकार. त्याचे एक आजोबा ‘बोस्टन टी पार्टी’त भाग घेतलेल्यांपैकी होते. वडील गेल्यावर त्यांच्या कुटुंबावर वाईट परिस्थिती आली होती. त्यामुळे त्याला नोकरी करणं भाग होतं. त्याची सुरुवात ‘केबिन बॉय’ म्हणून झाली. हळूहळू त्याला सागरसफरी आवडू लागल्या. त्याच अनुभवांवर त्याच्या पहिल्या काही कादंबऱ्या लिहून झाल्या.

...पण १८५१ मध्ये त्याने लिहिलेल्या ‘मॉबी डिक’ उर्फ ‘दी व्हेल’ कादंबरीने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. माणसाच्या निसर्गाशी चाललेल्या झुंजीचं एक उत्कंठापूर्ण आणि थरारक वर्णन यात आहे. यातल्या कॅप्टन आहाबला एकच ध्यास आहे तो आपल्यावर हल्ला करणाऱ्या मॉबी डिक या शुभ्र व्हेलची शिकार करण्याचा! त्या रोमांचक पाठलागाचं वर्णन करताना मेलव्हीलने माणसाच्या विजिगिषु वृत्तीचं प्रत्ययकारी दर्शन घडवलं आहे. कॅप्टन आहाबच्या आयुष्यभराच्या ध्येयाच्या पाठपुराव्याला यश येतं का? त्याच्या आणि मॉबी डिकच्या त्या जीवघेण्या पाठलागात कोणाची सरशी होते? ईश्मेल कोण आहे, हे समजून घेण्यासाठी ‘मॉबी डिक’ ही कादंबरी वाचायलाच हवी. या उत्कंठावर्धक कथेवर १९५६ साली जॉन हस्टनने सुंदर सिनेमा बनवला होता, ज्यात कॅप्टन आहाबची भूमिका ग्रेगरी पेकने केली होती.

‘मॉबी डिक’व्यतिरिक्त मेलव्हीलची गाजलेली पुस्तकं म्हणजे – इस्रायल पॉटर, व्हाइट जॅकेट, पिएअ(र), बिली बड, ताय्पी, बार्टलबी दी स्क्रिव्हेनर वगैरे. त्याचे काही कथासंग्रह आणि कविताही प्रसिद्ध आहेत.

२८ सप्टेंबर १८९१ रोजी मेलव्हीलचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युपश्चात शुभ्र व्हेल्सवर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या एका ग्रुपला शुभ्र व्हेलचं एक महाकाय जीवाष्म (Fossil) मिळालं होतं आणि त्यांनी एकमतानं त्या नामशेष प्रजातीचं नामकरण मेलव्हीलच्या नावानं करून टाकलं.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search