Next
संविधान दिनाच्या निमित्ताने...
BOI
Sunday, November 26, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:


जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वांत मोठे लिखित असे संविधान तयार करून, केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला महत्त्वपूर्ण संविधानरूपी अनमोल असा ठेवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. निश्चितच हे संविधान म्हणजे आपल्याला मिळालेले अलौकिक असे अनमोल, दिव्य रत्न आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपले भारतीय संविधान संमत झाले, मात्र त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी सुरू झाली.  या ‘संविधान दिना’च्या निमित्ताने...
.......................................
भारतीय संविधान हे इंग्रजी भाषेत असून हिंदी भाषेतील प्रतही कायदेशिरदृष्ट्या ग्राह्य आहे. जागतिक पातळीवर श्रेष्ठत्व असलेले आपले संविधान म्हणजे तमाम भारतीयांचा अभिमान आहे आणि म्हणूनच आपण ‘अभिमान आम्हाला संविधानाचा... समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्त्वाचा’ असे अभिमानाने म्हणू शकतो.

भारताचे संविधान म्हणजेच भारतीय राज्यघटना. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. आज जवळपास ६८ वर्षांपासून डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या या संविधानाच्या आधारे आपले भारतीय संघराज्य व व्यवस्था सुरळीतपणे चालू आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आणि तद्नंतर म्हणजे २९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान समिती स्थापन झाली. या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष डॉ. एस. सी. मुखर्जी व सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड करण्यात आली. या समितीत प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ.राधाकृष्णनन, के. एम. मुन्शी व डॉ. जयकर यांचा समावेश होता. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केली. या समितीने अखंड मेहनत घेऊन भारतीय संविधानाची निर्मिती केली.

या समितीने घटनेमध्ये आपल्या जन-गण-मन या गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या गीताला राष्ट्रगीताचा सन्मान दिला. तसेच राष्ट्रध्वजाचीही निर्मिती केली. घटनेच्या पहिल्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे होती. पुढे त्यात वाढ झाली. या संविधानाची उद्देशिका अशी आहे, ‘आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६  नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत: प्रत अर्पण करत आहोत.’ यात नमूद केले आहे की आपला देश हा सार्वभौम (Sovereign), समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular) आणि प्रजासत्ताक (Republic) आहे. या उद्देशिकेच्या प्रत्येक शब्दांतून आपणास संविधानाची महती लक्षात येते.

संविधानाची दिव्यता
भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात प्रामुख्याने संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धर्मस्वातंत्र्यांचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संविधानिक उपाययोजनेचा हक्क, विवक्षित कायद्यांचे व्यावृत्ती, त्याचप्रमाणे राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये, संघराज्य, राज्य, त्याची कार्यपद्धती,  न्यायालये, न्यायाधिकरणे, निवडणुका, आणीबाणी, राज्यभाषा याखेरिज संकीर्ण यात उर्वरीत सर्व विषय समाविष्ट होतात. अशा सर्व स्तरांवरील बाबींचा समावेश आहे. भारतीयांना त्याच्या प्रत्येक स्वातंत्र्याचा अथवा जगण्याचा अधिकार, हक्क यांचे स्पष्ट व सखोल मार्गदर्शन या घटनेत आहे. त्यामुळे ही घटना प्रत्येक भारतीयाला आपलीच वाटेल अशी आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम, अधिकार, कर्तव्ये, लोकांचे सार्वभौमत्व आदी यात आहे. २६ जानेवारी १९५० पासून या घटनेनुसारच आपल्या भारत देशाचा राज्यकारभार सुरू झाला. म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो.

डॉ. राजेंद्र प्रसाद१७ डिसेंबर १९४६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेले या संदर्भातील त्यांचे पहिले भाषण अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी अकस्मातपणे डॉ. बाबासाहेबांचे नाव भाषणासाठी पुकारले आणि डॉ. आंबेडकरांनी अमोघ असे भाषण केले. या भाषणाचे वर्णन करताना न. वि. गाडगीळ म्हणाले, ‘बाबासाहेबांचे भाषण त्यांच्या मुत्त्सद्दी व्यक्तिमत्त्वाला शोभणारे होते. इतके कटुतेशिवाय, इतके प्रामाणिक आवाहन करणारे होते, की संपूर्ण सभागृह एकरूप होऊन ते ऐकत होते’. संविधान सभेमध्ये असे प्रभावी भाषण करुन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची महती स्पष्ट केली. एकसंघ भारताच्या उन्नतीची धारणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीमागे होती. 

१० जून १९५० रोजी सिलोन दौऱ्यावरून परत येतांना त्रिवेंद्रम येथे लेजिसलेटिव्ह चेंबरमध्ये त्यांनी एक भाषण केले. त्या भाषणात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे ‘घटनात्मक नितीचे काटेकोरपणे पालन करा.’ या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हावयाची असेल, तर सरकार व जनता या उभयंतांनी घटनेतील काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे आवश्यक आहे. हे संकेत व नीती पुढीलप्रमाणे - सरकार बनविण्याच्या पद्धतीविषयी आदर, कायद्याचे पालन, स्वतंत्र विचार करण्याची सवय व बहुसंख्याकांच्या नियमांचे पालन.’ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरघटना समितीचे अध्यक्ष या नात्याने, भारतीय राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला देऊन जागतिक पातळीवर भारतीय सार्वभौमत्त्वाचे गौरवचिन्ह निर्माण केलेले आहे. केवळ संविधानच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक क्षेत्रातील विचारही तेजस्वी, प्रखर व मौलिक असे आहेत. 

- डॉ. राजू पाटोदकर
मोबाइल : ९८९२१ ०८३६५ 
ई-मेल : patodkar@yahoo.co.in

(पूर्वप्रसिद्धी : www.mahanews.gov.in) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search