Next
‘महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे’
प्रेस रिलीज
Wednesday, April 25, 2018 | 11:38 AM
15 0 0
Share this article:पुणे :
‘महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतील, तर त्या अधिक आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्यास सक्षम होतात, त्यामुळे महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे फार आवश्यक आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी व्यक्त केले.

निमित्त होते ‘पुनेवाली’ या उपक्रमाअंतर्गत लेखिका सुधा मेनन यांनी ताम्हणकर यांच्या घेतलेल्या मुलाखतीचे. ‘ShethePeopleTv’ यांच्यातर्फे येथील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या मुलाखती या उपक्रमात घेण्यात येतात. या अंतर्गत आयोजित दुसऱ्या सत्रात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि कला प्रचारक लिसा पिंगळे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी बोलताना ताम्हणकर म्हणाल्या, ‘आज मागे वळून पाहताना मला नेहमी वाटते की माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी पैसे साठवायला हवे होते. आर्थिक गुंतवणूकीबद्दल मार्गदर्शन करणारे त्यावेळी माझ्याजवळ कोणीच नव्हते. माझी आई मला नेहमी सांगायची की तुझ्या मिळकतीमधून पैसे बाजूला काढून बचत कर; पण नवतारुण्यात आपण आपल्या घरच्यांचे ऐकत नाही, तसेच माझेही झाले. आज त्या गोष्टीचे मला वाईट वाटते आणि म्हणूनच महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी आधी आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवे, असे माझे मत आहे.’        

याच विषयावर बोलताना मोनालिसा कलाग्रामच्या सहयोगी संस्थापिका पिंगळे म्हणाल्या की, ‘कोणतीही गोष्ट करायची असेल, तर आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. वयाच्या २१ व्या वर्षी काय करायचे आहे हे माहीत असतानाही माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता होती. त्यामुळे आत्मविश्वास हा एक महत्त्वाचा भाग आहे.

‘पुणे ५२’, ‘हंटर’ यांसारख्या वेगळ्या चित्रपटांत भूमिका साकारलेल्या ताम्हणकर म्हणाल्या की, ‘ठोकळेबाज प्रतिमा असलेल्या भूमिका करायला मला आवडत नाही. म्हणून मी ‘व्हाईट’ आणि ‘ब्लॅक’ यांपलीकडे ‘ग्रे’ शेडच्या भूमिका निवडल्या. ही निवड मी पूर्ण विचारांती केली असून, एक अभिनेत्री म्हणून मी नेहमी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते.’      

‘प्रत्येक स्त्रीने सर्वांत आधी स्वत:ला ओळखायला हवे. तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे हे तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्यात पुढे जाल. हे करीत असताना अनेक अडथळे येतील; मात्र यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल यावर विश्वास ठेवा,’ असा सल्ला पिंगळे यांनी दिला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search