Next
गायन, वादन आणि नृत्याची सुरेल ‘तालयात्रा’
प्रेस रिलीज
Wednesday, April 10, 2019 | 01:55 PM
15 0 0
Share this article:

नृत्य सादर करताना तालयोगी आश्रमाच्या विद्यार्थिनी

पुणे : भारतीय पारंपरिक वाद्यांच्या जोडीला पाश्चिमात्य वाद्यांची रंगलेली जुगलबंदी... या वादनाला मिळालेली मधुर स्वरांची साथ... स्वरांच्या आणि वादनाच्या तालांमध्ये रंगलेला अनोखा कथ्थक नृत्याविष्कार आणि या प्रवासाला लाभलेली रसिकांची उस्फूर्त दाद, अशा सुरमयी प्रवासाची अनोखी ‘तालयात्रा’ रसिकांनी अनुभवली.

तालयोगी आश्रमाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘तालयात्रा’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे, सुचेता भिडे-चापेकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी तालयोगी आश्रमाचे सचिव श्रीकांत कशाळकर आणि विश्वस्त सुप्रिया बडवे यांना सन्मानित करण्यात आले.

पंडित सुरेश तळवलकरकार्यक्रमाची सुरुवात झपतालाने झाली. त्यातून भगवान शंकराची विविध रूपे पेश करण्यात आली. त्यानंतर राग यमन मधील बंदिश आणि ठुमरी मधील बंदिश तालयोगी गुरू पंडित सुरेश तळवलकर आणि शिष्यांनी सादर करून रसिकांना तालमय अनुभूती दिली. ताल पद्मदीप वर झालेल्या गायन, वादन आणि नृत्याच्या जुगलबंदीवर टाळ्यांचा कडकडाट झाला.

या वेळी बोलताना पंडित तळवलकर म्हणाले, ‘गुरूंनी माझ्यावर जे सांगीतिक संस्कार केले तेच पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्याचा मी प्रयत्न करत आहे. संगीत हे शिकवून होत नाही, तर त्याला संस्काराचीही जोड असावी लागते. सांगीतिक संस्कार घडविणे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. गुरूंच्या प्रयत्नांनी आणि संस्कारांनी शिष्य घडतो. हेच संस्कार गुरु-शिष्य परंपरेला जिवंत ठेवतात. हीच संस्कारांची शिदोरी आयुष्यभर कामाला येते.’

पं. सुरेश तळवलकर व सहकारी वादक

पंडित तळवलकर यांचे शिष्य सावनी तळवलकर, आशय कुलकर्णी यांनी तबलावादन, तर सुजित लोहोर, भागवत चव्हाण, कृष्णा सांळुखे यांचे पखवाजवादन रसिकांना ऐकायला मिळाले. विनय रामदासन यांचे गायन, अनिरुद्ध जोशी यांच्या सितारवादनाने आणि संदीप कुलकर्णी यांच्या बासरीवादनाने रसिकांना वेगळी अनुभूती दिली. अमृता गोगटे, अस्मिता ठाकूर, शीतल लाळगे, ईशा फडके,  मृणालीनी खटावकर, श्रुती आपटे, आयुषी दीक्षित, रजत पवार यांनी नृत्य सादर करताना उपस्थितांची दाद मिळवली. अभिषेक भुरूक, उमेश वारभुवन, ऋतुराज हिंगे आणि ईशान परांजपे यांनी वेस्टर्न पर्कशनवादन केले. तन्मय देवचके, अभिषेक शिनकर (संवादिनी), अनय  गाडगीळ (की-बोर्ड) आणि तेजस माजगावकर (टाळ) यांनीही उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे निवेदन गौरी स्वकुळ यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search