मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग अर्थात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सेंद्रिय कचरा विघटन केंद्रांच्या (ओडब्ल्यूसी) उभारणीला सुरुवात करण्यात आली आहे. महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते शनिवारी, १७ नोव्हेंबर रोजी खालापूर येथे अशा प्रकारच्या पहिल्या केंद्राचे उद्घाटन झाले. तसेच या वेळी एचपीसीएल कंपनीच्या ऑटो केअर सेंटरमध्ये सीएनजी केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले. या वेळी एचपीसीएलचे महाव्यवस्थापक (रिटेल, पश्चिम क्षेत्र) बी. सुंदर बाबू व इतर मान्यवर उपस्थित होते.
द्रुतगती मार्गादरम्यान महामंडळातर्फे सात सेंद्रिय कचरा विघटन केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. ९५ किमी अंतराच्या मुंबई-पुणे या मार्गावर महामंडळातर्फे फुडमॉल,पेट्रोलपंप, ट्रक टर्मिनल अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षात द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. वाहने आणि प्रवाशांची संख्याही वाढत आहे, त्यामुळे या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे द्रुतगती मार्गादरम्यान सात ठिकाणी सेंद्रिय कचरा विघटन केंद्रांची (ओडब्ल्यूसी), तर सहा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची (एसटीपी) उभारणी केली जात आहे. यातील पहिल्या कचरा विघटन केंद्राचे उद्घाटन शनिवारी झाले.

या वेळी बोलताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने कायमच पर्यावरणाला पोषक ठरेल, अशा सुविधांची उभारणी केली आहे. सेंद्रिय कचरा विघटन आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे महामंडळाच्या आजपर्यंतच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे ठरावेत. पुढील वीस वर्षांचा विचार करून या केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. भविष्यातही आम्ही अशाच प्रकारच्या पर्यावरणपूरक सुविधांच्या निर्मितीसाठी कटिबद्ध आहोत.’
सेंद्रिय कचरा विघटन केंद्र म्हणजे काय ?
द्रुतगती मार्गादरम्यान असलेल्या फुडमॉल,पेट्रोलपंप, ट्रक टर्मिनलच्या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत असते. त्यात ओला व सुका अशा दोन्ही प्रकारच्या कचऱ्यांचा समावेश असतो. ओला कचऱ्याचे जैवविघटन करता येऊ शकते; मात्र सुक्या कचऱ्याचे जैवविघटन करता येत नाही. सेंद्रिय कचरा विघटन केंद्रात जैवविघटन होणाऱ्या कचऱ्याचे कम्पोस्ट खतात रुपांतर करता येऊ शकते. सेंद्रिय कचरा विघटन केंद्रात तयार झालेल्या या कम्पोस्ट खतांचा वापर द्रुतगती महामार्गादरम्यान वृक्षलागवडीसाठी होऊ शकतो. तसेच यामुळे द्रुतगती मार्गादरम्यान उघड्यावर कचरा पडून निर्माण होणाऱ्या रोगराईला आळा बसण्यास मदत होईल.