Next
अरुणा ढेरे, मंगला गोडबोले, डॉ. श्री. व्यं. केतकर
BOI
Friday, February 02, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

अत्यंत रसाळ आणि ओघवत्या शैलीत लेखन करणाऱ्या आणि तितक्याच सुंदर बोलणाऱ्या वाचकप्रिय कवयित्री आणि लेखिका डॉ. अरुणा ढेरे; नर्मविनोदी, खुसखुशीत शैलीत लेखन करणाऱ्या मंगला गोडबोले; पहिला मराठी ज्ञानकोश लिहिणारे डॉ. श्रीधर केतकर आणि व्यायाम विषयावर लेखन करणारे गंगाधर पटवर्धन यांचा दोन फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
...
अरुणा रामचंद्र ढेरे

दोन फेब्रुवारी १९५७ रोजी पुण्यात जन्मलेल्या अरुणा रामचंद्र ढेरे या कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, समीक्षा, संशोधनपर लेख असं चौफेर लेखन करणाऱ्या प्रतिभावान लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. पुराणकथा, लोककथा, दंतकथा, रामायण-महाभारतादी ग्रंथ अशा विविध स्रोतांमधून त्यांनी स्त्रीच्या विविध रूपांचा शोध घेऊन अत्यंत सुंदर आणि ओघवत्या शैलीत त्यावर लेखन केलं आहे. त्यांच्या तोंडून अत्यंत रसाळ आणि सुंदर भाषेत त्यांचे विचार ऐकणे हीदेखील वाचकांसाठी पर्वणीच असते. 

संपूर्णपणे पुस्तकांनी भरलेलं घर असल्यामुळे अत्यंत समृद्ध बालपण लाभलेल्या अरुणा ढेरेंना वाचनाची आणि त्यातूनच लेखनाची गोडी लागली आणि वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासूनच त्यांनी हातात लेखणी पकडली.

‘आदिबंध आणि स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबरी’ या विषयासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. पाच राज्य पुरस्कार, ‘मसाप’चे सहा पुरस्कार, बहिणाबाई प्रतिष्ठान, काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. 

प्रेमातून प्रेमाकडे, मैत्रेयी, मामाचं घर, कृष्णकिनारा, नागमंडल, अज्ञात झऱ्यावर रात्री, रूपोत्सव, अंधारातले दिवे, दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य, काळोख आणि पाणी, कवितेच्या वाटेवर, नव्या जुन्याच्या काठावरती, पावसानंतरचं ऊन, प्रकाशाचे गाणे, प्रतिष्ठेचा प्रश्न, शाश्वताची शिदोरी, स्त्री आणि संस्कृती, सुंदर जग हे, त्यांची झेप त्यांचे अवकाश, उंच वाढलेल्या गवताखाली, आठवणींतले अंगण, डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार, जावे जन्माकडे, मनातलं आभाळ, निळ्या पारदर्शक अंधारात, निरंजन, प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, विस्मृतिचित्रे, विवेक आणि विद्रोह, भगव्या वाटा, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(अरुणा ढेरे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.............

मंगला गोडबोले

दोन फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत जन्मलेल्या मंगला गोडबोले या प्रामुख्याने नर्मविनोदी कथालेखनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखिका आहेत. सामाजिक जाणिवेने लिहिणाऱ्या लेखिका अशी त्यांची ओळख आहे.

स्त्रीजीवन, कुटुंबजीवन, नातेसंबंध, भोवतालचं बदलणारं जग यांच्यासंबंधी त्या अत्यंत खुसखुशीत शैलीत लेखन करत असतात. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून, नियतकालिकांमधून, दिवाळी अंकांमधून त्यांचं लेखन नियमितपणे प्रसिद्ध होत असतं. 

त्यांना महाराष्ट्र शासनाचा, तसंच पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. झुळूक, नवी झुळूक, ऋतू हिरवट, आणि मी, कधी बहर कधी शिशिर, कुंपण आणि आकाश, अल्बम, कोपरा, खुणेची जागा, गिरकी, गुंडाबळी, सुखी स्त्रीची साडी, मध्य, सहवास हा सुखाचा, दामले मामा, माई, सुवर्णयोगी दाजी काका गाडगीळ, अमृतसिद्धी : पु. ल. देशपांडे (सहसंपादन), ... पण बोलणार आहे!, सही रे सही, खुणेची जागा, अशी घरं.... अशी माणसं...., अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(मंगला गोडबोले यांचं ‘पुलं’बद्दलचं मनोगत वाचण्यासाठी येथे, तर दिवाळीबद्दलच्या त्यांच्या आठवणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
....................

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर

दोन फेब्रुवारी १८८४ रोजी रायपूरमध्ये जन्मलेले डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर म्हणजे मराठी भाषेत ज्ञानकोश असला पाहिजे असं महत्त्वाकांक्षी स्वप्न पाहून, त्या ध्यासाने प्रचंड काम एकहाती पूर्ण करणारं व्यक्तिमत्त्व!! ते इतिहासकार आणि कादंबरीकार म्हणूनही प्रसिद्ध होते. 

१९३१ सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

ज्ञानकोश - खंड १ ते २२, नि:शस्त्रांचे राजकारण, ब्राह्मणकन्या, गावसासू, सातवाहन पर्व, भारतीय समाजशास्त्र, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.  

दहा एप्रिल १९३७ रोजी त्यांचं निधन झालं.

(श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आणि त्यांचा ज्ञानकोश ऑनलाइन वाचण्यासाठी  येथे क्लिक करा. त्यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
................

गंगाधरराव गणेश पटवर्धन

दोन फेब्रुवारी १८६६ रोजी जन्मलेले गंगाधरराव गणेश पटवर्धन हे विज्ञान आणि व्यायाम या विषयांवर लेखन करणारे लेखक म्हणून प्रसिद्ध होते. 

मल्लविद्या शास्त्र - खंड १ व २, भीमसेनी कुस्ती - भाग १ व २, पुराणे म्हणजे काय?, व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र  अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध होती. 

११ डिसेंबर १९३९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search