Next
‘सच्च्या दिलाचा माणूस’
BOI
Sunday, July 09, 2017 | 09:45 AM
15 1 0
Share this article:

‘अभिनय क्षेत्रात काम करताना वडिलांचा वारसा आणि त्यांनी या क्षेत्रात व्यतीत केलेले भलेबुरे क्षण एखाद्या पुस्तकासारखे सोबत होतेच. ते वेळोवेळी यात दिशा दाखवत राहिले. माझे वडील अत्यंत सच्च्या दिलाचे होते,’ हे म्हणणं आहे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं. ‘वटवृक्षाच्या छायेत’ या सदरात आज ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले या पिता-पुत्राच्या जोडीबद्दल...
.....
‘दूरचित्रवाणीवर दाखविल्या जाणाऱ्या मालिका पाहण्याजोग्या नसतील, त्यांना दर्जा नसेल तर त्यांना नावं कशाला ठेवता? तुमच्या हातात रिमोट असतो ना? बंद करून टाका ना ते! तुम्ही अशा मालिका बघत राहता. त्यामुळे ‘प्रेक्षकांना असंच हवं असतं,’ असं म्हणत निर्माते तशाच मालिका बनवत राहतात. मग यामध्ये विक्री होते म्हणून तसा माल बनविणारे मूर्ख की रिमोट हातात असूनही त्याचा वापर न करणारे प्रेक्षक मूर्ख?’ असा खडा सवाल करणारं हे विधान मध्यंतरी पुण्यात खूप गाजलं. आपली मतं परखडपणे मांडणारे विचारवंत नाट्यधर्मी अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात एका मीडिया इन्स्टिट्यूटचं उद्घाटन केल्यानंतरच्या भाषणातलं हे विधान आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयानं, गौरवर्णी देखणेपणानं रसिकांच्या मनात स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलेले, आपल्या घाऱ्या डोळ्यांनी थेट रसिकांच्या मनाचा वेध घेणारे प्रतिभावंत अभिनेते म्हणून गोखले गेली ४०-४५ वर्षं उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत; पण त्याचबरोबर आजची रंगभूमी, चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमं याविषयी सखोलपणे चिंतन करणारे आणि आपली खरी मतं अत्यंत परखडपणे मांडणारे डोळस विचारवंत म्हणून त्यांनी निर्माण केलेली चौकटीबाहेरची प्रतिमाही आवर्जून दखल घ्यावी अशीच आहे. 

फोटो : http://wiki.phalkefactory.netएका तरुण, उत्साही अभिनेत्यापासून विचारवंत अभिनेत्यापर्यंतची त्यांची वाटचाल निश्चितच लक्षणीय असणार. या वाटचालीत चढउतारही आले असतील. अशा वेळी ही वाटचाल यशस्वी व्हावी म्हणून त्यांनी काय केलं; आजी कमलाबाई गोखले, वडील चंद्रकांत गोखले असा अभिनयाचा खणखणीत वारसा सोबत घेऊन नाट्य-चित्रपटसृष्टीत प्रवेशताना त्यांनी स्वतंत्रपणे विचार केला होता का आणि वडील चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याचा पुत्र म्हणून हे सगळं करताना कधी दडपण जाणवलं का, असे कितीतरी प्रश्न त्यांच्याशी बोलताना मनात डोकावत होते. त्यामुळे ‘या क्षेत्रात प्रवेशताना मनात काय विचार होता,’ असं विचारल्यावर गोखले म्हणाले, ‘अभिनयाची परंपरा पाठीशी होती. तरुणपणी या क्षेत्रात आलो; पण परंपरेला जपण्यासाठी म्हणून अजिबात नाही; पण अभिनयाची आवड होती. लहानपणापासून अभिनय बघत, करत आलो होतो. सगळ्या भावंडांमधला वडिलांचा ज्येष्ठ मुलगा होतो. त्या वेळी घराला अर्थार्जनाची गरज होती. हा उपलब्ध पर्याय होता, म्हणून तो स्वीकारला. बाकी माझ्यासाठी अभिनय क्षेत्रातला प्रवेश आणि माझी परंपरा याचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही. त्यानंतरही गरज म्हणून जे समोर आले ते ते करत राहिलो, पण मनापासून!’
 
आहे तेवढ्यावर समाधान मानून शांत बसणं किंवा स्वत:वर खूश होऊन स्वत:ला ‘ग्रेट’ समजत जगणं हा गोखल्यांचा स्वभाव नाही. सतत नव्याचा शोध घेणं, आहे ते अधिक चांगलं कसं होईल याचा विचार करणं, त्याला कृतीची जोड देणं हा त्यांचा ध्यास आहे. त्यामुळेच अभिनयक्षेत्रात प्रवेशल्यानंतरही आपलं वाचन, चांगले देशी-विदेशी चित्रपट पाहणं. त्याविषयी तज्ज्ञांशी चर्चा करणं, त्याचं स्वतःच्या पद्धतीनं विश्लेषण करणं या बाबी त्यांच्या जीवनात महत्त्वाच्या राहिल्या. त्यांचा अभिनय फुलण्यासाठी या बाबींचा खूप उपयोग झाला, असं ते आवर्जून सांगतात. हे सगळं करताना वडिलांचा वारसा आणि त्यांनी या क्षेत्रात व्यतीत केलेले भलेबुरे क्षण एखाद्या पुस्तकासारखे सोबत होतेच. ते वेळोवेळी यात दिशा दाखवत राहिले, असं गोखल्यांचं म्हणणं! 

फोटो : http://www.vikramgokhle.com

विक्रम गोखले म्हणाले, ‘मी लहान होतो, तेव्हा बाबांचा अभिनय फार बहरला होता. नाटकं, चित्रपट सगळं चालू असायचं; पण त्यामुळे त्यांचा सहवास फार कमी मिळाला. अनेकदा ते दौऱ्यावर असायचे; पण त्यांचं आयुष्य हाच एक आदर्श होता. अत्यंत स्वच्छ, पारदर्शी, सच्च्या दिलाचा माणूस! कधी स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतणार नाही. स्वत:च्या कामाशी अत्यंत प्रामाणिक! जे करणार ते जीव ओतून, शंभर टक्के निष्ठेनं! त्यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका लक्षणीय ठरली. वास्तव जीवनात सामेाऱ्या आलेल्या अडचणींसाठी त्यांनी कधी कुणाला दोष दिला नाही. आयुष्य जसं समोर आलं, तसं ते स्वीकारत गेले. त्यांच्या या सगळ्या वाटचालीचा मनावर कळत-नकळत परिणाम झाला. आजही कुठलंही काम करतो ते जीव ओतूनच करतो. माझ्याजवळ जे सर्वोत्तम आहे तेच देण्याचा कायम प्रयत्न असतो. बाबांकडून दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. एक म्हणजे ‘ट्राय टू बी जेन्युइन.’ मनाचा सच्चेपणा जपा. सच्चेपणानं जगा आणि स्वत:ची संवेदनशीलता जपा, ही दुसरी गोष्ट. ‘मला काय त्याचं’ असं म्हणण्याचा त्रयस्थपणा, निबरपणा स्वत:मध्ये येऊ न देणं खूप कठीण, पण महत्त्वाचं असतं,’ 

या सगळ्या गोष्टी जपत स्वत:चा वास्तववादी दृष्टिकोन सांभाळणं ही तारेवरची कसरत गोखल्यांना इतक्या वर्षांच्या प्रयत्नानं जमून गेलीय. अर्थात त्यासाठी टक्केटोणपे खाणं त्यांनाही चुकलेलं नाहीच. गोखले म्हणाले, ‘बाबांच्या जीवनातून काही गोष्टी शिकलो. त्या आवर्जून अंगीकारल्या हे जितकं खरं, तितकंच काही गोष्टी मुद्दाम स्वीकारल्या नाहीत, बाजूला ठेवल्या हेही खरं! बाबा स्वभावानं खूप शांत, गरीब, समंजस होते. अभिनय हा त्यांचा व्यवसाय होता, तरी फक्त पैशासाठी काम करण्याची धंदेवाईक वृत्ती त्यांच्यात नव्हती. त्यामुळेच अनेक लेाकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. ठरलेले पैसेसुद्धा न देऊन त्यांची फसवणूक केली. त्यामुळेच माझ्या आजवरच्या वाटचालीत मी एक पथ्य कायम पाळलं, ज्यांची योग्यता नाही अशा लोकांशी फार चांगलं वागण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही. माझ्या व्यावसायिक बाजूवर त्याचा कधीही परिणाम होऊ दिला नाही आणि कुठल्याही माणसाची योग्यता त्याचा सर्वांगीण विचार करून माझ्यापुरती तरी अर्थात मीच ठरवतो.’
 
अभिनयक्षेत्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार करताना काही गोष्टींबाबत गोखल्यांनी काटेकोर राहणं हे स्वाभाविकच होतं. बाबांच्या वाट्याला आलेल्या काही अनुभवांनीच त्यांना हे शहाणपण शिकवलं होतं; पण त्याचबरोबर स्वत:च्या आयुष्याचा स्वत:च्या पद्धतीनं विचार करणाऱ्या गोखल्यांनी या बाबतीत काही विचार केलेला असणं हेही गृहीतच होतं. गोखले म्हणाले, ‘अभिनय क्षेत्रात थोडंसं स्थिरावायला लागल्यावर मी अर्थातच या क्षेत्राच्या दोन विभिन्न अंगांचा अभ्यास आणि विचार करायला सुरुवात केली. एक म्हणजे कलेची बाजू आणि दुसरी आर्थिक बाजू. त्याचा अभ्यास केल्यावर हे स्पष्टपणे लक्षात आलं, की फक्त अभिनय क्षेत्रावर आपला उदरनिर्वाह करणं कठीण आहे. त्यामुळे अर्थार्जनासाठी दुसरंही काही केलं पाहिजे असं तीव्रतेनं वाटायला लागलं आणि मी दुसऱ्या व्यवसायातही पदार्पण केलं. हे सगळं सहजासहजी नाही झालं, खूप अडचणी आल्या, कटकटी झाल्या. सात-साडेसात वर्षं अखंड संघर्ष सुरू होता, त्रास झाला; पण या काळात आयुष्यानं खूप काही शिकवलं. त्यामुळे अर्थातच आतून घट्ट होत गेलो.’ इतका व्यावहारिक विचार स्वच्छपणे करणारे गोखले आज एका कंपनीचे संचालक आहेत आणि या व्यवसायाचं अर्थकारणही यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. 

वडिलांच्या अभिनयसामर्थ्याचा गोखल्यांना सार्थ अभिमान आहे. ते म्हणतात, ‘बाबा, वॉज ए जाएंट अॅक्टर. ते फक्त स्वत:चं प्रदर्शन करू शकले नाहीत. तो त्यांचा स्वभावच नव्हता. त्यामुळे लोकांनी इतर काल-परवा आलेल्या नटांसारखा त्यांचा उदोउदो केला नाही. अन्यथा या मायानगरीतही व्रतस्थपणे वावरणारा तो आदर्श माणूस होता. ‘स्वत:भोवती ‘ऑरा’ घेऊन वावरणं बाबांना जमलं नाही,’ असं सांगून गोखल्यांनी आपल्या पूर्वस्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘पस्तीस वर्षांपूर्वी मी बाबांबरोबर ‘बॅरिस्टर’ केलं १९७७-७८मध्ये. मी त्या नाटकाचा दिग्दर्शक होतो. बाबा समोर आहेत म्हणून ताण वगैरे नव्हता; पण मी माझ्या पद्धतीनं नाटक केलं होतं आणि प्रयोग संपल्यावर बाबांनी आत येऊन कडकडून मिठी मारली नि म्हणाले, ‘तू चांगला नट आहेस हे ठाऊक होतं; पण इतका मोठा, ताकदीचा नट आहेस हे माहीत नव्हतं.’ त्यांच्या डबडबल्या डोळ्यांनी त्यांना आणखी काय म्हणायचं होतं ते माझ्यापर्यंत आपोआप पोहोचलं.’ 

गोखल्यांनी अभिनेता म्हणून जसं प्रयासानं नाव मिळवलं, तसंच तितकीच प्रयत्नपूर्वक घरातली, कौटुंबिक जबाबदारीही सांभाळली. घरातल्या सगळ्यांचं आयुष्य नीट मार्गी लावताना, स्थिरस्थावर करतानाच ते मुलगा, वडील, पती म्हणूनही तितकेच ताकदीचे ठरले. बाबांचे मित्र होऊन समजून घेतानाच त्यांच्यावर वृद्धपणी पित्यासारखं प्रेमही केलं. त्यांना जिवापाड सांभाळलं. गोखले म्हणाले, ‘बाबांना हा उत्कर्ष बघून समाधान वाटायचं. ‘आयुष्यात भरून पावलो.’ म्हणायचे. एकदा आजारी असताना जवळ बोलावलं. डोक्यावरून हात फिरवला. म्हणाले, ‘खूप केलंस रे. बरंच काही दिलंस बापाला. सगळ्यांचा विचार करतोस, कुठं कमी पडला नाहीस. परमेश्वराजवळ आता इतकंच मागणं आहे, पुन्हा कधी जन्म मिळाला तर तो याच घरात मिळावा, नट म्हणूनच! पण त्या वेळी माझ्या पोटी येऊ नकोस. मला तुझ्या पोटी येण्याचं भाग्य मिळू दे. माझे वडील म्हणून भेट पुढल्या जन्मी!’ बस्स! बाबांचे ते शब्द हे माझ्यासाठी आयुष्यभरातलं सर्वांत मोठं बक्षीस आहे नि सर्टिफिकेटही! आता आयुष्यात आणखी काही मिळालं नाही तरी चालेल. धन्य झालो मी!’ परखड सडेतोड गोखल्यांचा स्वर कातर झालेला असतो. डोळ्यांत न लपेलसं पाणी तरळत असतं. माझ्यासमोर ‘जेन्युइन’ गोखले बसलेले असतात...!

- स्वाती महाळंक
संपर्क : ८८८८१ ०२२०७

(लेखिका पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आहेत.)
(‘वटवृक्षाच्या छायेत’  ही लेखमाला दर रविवारी प्रसिद्ध होते.)

(पूर्वप्रसिद्धी : समाज प्रतिबिंब दिवाळी अंक २०११.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit Suresh Salunke About 62 Days ago
Thanks again for your Article
0
0
Wishwas Abhyankar About
अप्रतिम! फारच छान! सगळी रत्न पुन्हा अवतरावीत हीच इच्छा! 🙏
1
0

Select Language
Share Link
 
Search