Next
२७ वर्षांची अंकिती झाली ‘युनिकॉर्न सीईओ’
पहिली भारतीय महिला; चार वर्षांत झीलिंगो कंपनीचे मूल्य नेले ९७ कोटी डॉलर्सवर
BOI
Wednesday, February 13, 2019 | 05:01 PM
15 0 0
Share this article:

झीलिंगो कंपनीची सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिती बोस व कंपनीचे सहसंस्थापक ध्रुव कपूर

बेंगळुरू : अवघ्या चार वर्षांच्या काळात आपल्या झीलिंगो कंपनीला ‘युनिकॉर्न’चा दर्जा मिळवण्याच्या अगदी जवळ नेणारी अंकिती बोस ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. झीलिंगो या कंपनीची सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अवघ्या २७ वर्षांच्या अंकितीने केवळ चार वर्षांत तिच्या कंपनीला ९७० दशलक्ष डॉलर्सचे मूल्य प्राप्त करून दिले आहे. एक अब्ज डॉलर्सचे मूल्य असलेल्या कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा दिला जातो. यापासून झीलिंगो काही पावलेच मागे आहे.  

‘पिचबुक’ने गेल्या वर्षी मे महिन्यात जाहीर केलेल्या अहवालानुसार, जागतिक पातळीवरील स्टार्ट-अपच्या महिला संस्थापक अत्यंत मोजक्याच असून, जवळपास एक अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्य असलेल्या २३९ कंपन्यांमध्ये केवळ २३ कंपन्यांच्या सहसंस्थापक महिला आहेत.  

या कामगिरीने जगात भारताचे नाव उंचावणारी अंकिती मुंबईची असून, वयाच्या २३व्या वर्षी तिने २४ वर्षांच्या ध्रुव कपूरच्या साहाय्याने आग्नेय आशियात झीलिंगो या फॅशन ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली. ध्रुव कपूर ‘आयआयटी, गुवाहाटी’चा विद्यार्थी आहे. थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपिन्समध्ये झीलिंगो हा अत्यंत लोकप्रिय ऑनलाइन फॅशन प्लॅटफॉर्म आहे. 

झीलिंगो कंपनीचे मुख्यालय सिंगापूरमध्ये असून, कंपनीच्या तंत्रज्ञां टीम बेंगळुरूमधून काम करते. ध्रुव कपूर १०० जणांच्या तुकडीसह कंपनीच्या तंत्रज्ञान सेवांचे काम पाहतात. झीलिंगो ही भारतीय व्यावसायिकांडून चालवल्या जाणाऱ्या यशस्वी कंपन्यांपैकी एक बनली आहे. कंपनीने नुकतेच सेक्विया कॅपिटल, सिंगापूरची टीमसेक आणि जर्मनीच्या बुर्डा प्रिन्सिपल इन्व्हेस्टमेंट्स यांच्याकडून मिळालेल्या २२६ दशलक्ष डॉलर्ससह अन्य गुंतवणूकदार कंपन्यांकडून मिळून एकूण ३०६ दशलक्ष डॉलर्सचे भांडवल मिळवले आहे. 

लहान व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसाय वाढवण्यास मदत केली, तर मोठ्या ब्रँडशीही ते स्पर्धा करू शकतात, हे लक्षात आल्याने २०१६मध्ये अंकितीने या व्यापाऱ्यांना वाहतूक सेवा, कर्ज पुरवठा, विमा आदी सेवा देण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली. आज हजारो व्यापारी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. कंपनीने ३१ मार्च २०१७ अखेर १.८ दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवले आहे, तर मार्च २०१८अखेर कंपनीने उत्पन्नात १२ पट वाढ नोंदवली आहे. 
 
अंकितीने २०१२मध्ये मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि गणित विषयातील पदवी घेतली असून, काही काळ ती मुंबईत मॅकेन्झी कंपनीत काम करत होती. बँकेतील एका अनुभवानंतर तिने ऑनलाइन बाजारपेठेत उतरायचे ठरवले. त्यासाठी भांडवल मिळवण्याच्या प्रयत्नात असतानाच २०१४मध्ये तिची भेट बेंगळुरूमध्ये किवी गेमिंग स्टुडिओ कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत असलेल्या ध्रुव कपूरशी झाली. त्या दोघांनी फॅशन क्षेत्रातील ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार केला. भारतात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, लाइमरोड, वूनिक अशा अनेक कंपन्या कार्यरत होत्या. त्यामुळे भारताऐवजी दुसऱ्या देशात हा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. 


अंकिती सुट्टीमध्ये बँकॉकला गेली होती, तेव्हा तिथल्या लोकांना फॅशनमध्ये रस असला, तरी असा ऑनलाइन प्लॅटफॉर्म तिथे नाही, हे तिच्या लक्षात आले होते. आणखी अभ्यास केल्यानंतर आग्नेय आशियात या क्षेत्रात चांगली संधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या भागात त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले आणि २०१५ मध्ये ‘झीलिंगो डॉट कॉम’ अस्तित्वात आले. थायलंड, कंबोडिया येथे सुरुवात केलेल्या या कंपनीची आत आठ देशांमध्ये कार्यालये असून, ४०० कर्मचारी काम करतात. लवकरच ऑस्ट्रेलियामध्ये आपली सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. 

‘आजही महिलांना उद्योजकांना व्यवसायात उतरणे खूप कठीण असते,’ असे अंकिती म्हणते. ‘गेल्या वर्षी मास्टरकार्डने जाहीर केलेल्या महिला उद्योजकांच्या ५७ देशांच्या यादीत आपला देश ५२व्या स्थानावर होता. इराण, सौदी अरेबिया, अल्जेरिया, इजिप्त आणि बांगलादेश या देशांपेक्षा आपण थोडेसेच पुढे आहोत. स्टार्ट-अपला अनुकूल वातावरणाच्या बाबतीत अमेरिका पहिल्या पाच देशांमध्ये, तर चीन आघाडीच्या तीस देशांमध्ये आहे. ‘नॅसकॉम’ने केलेल्या एका अभ्यासानुसार, २०१८मध्ये भारतात महिला उद्योजकांचे प्रमाण १४ टक्के आहे. त्या आधीच्या दोन वर्षांत हे प्रमाण अनुक्रमे १० आणि ११ टक्के होते,’ याकडे अंकितीने लक्ष वेधले. 

तिच्या वाटचालीत तिला अनेक पुरुषांचे सहकार्य लाभले; मात्र या क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढले तर गोष्टी आणखी सोप्या होतील, असे तिला वाटते. आग्नेय आशियात मोठ्या प्रमाणात महिला काम करतात. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते, असेही अंकितीने नमूद केले. 

‘तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे लोक, सिंगापूरमधील फॅशन क्षेत्रातील तज्ज्ञ ते इंडोनेशियातील पारंपरिक मुस्लिम व्यापारी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांशी संपर्क आल्याने आणि काम करताना बारकाईने निरीक्षण केल्याने व्यवसाय वाढवताना खूप फायदा झाला,’ असेही अंकितीने सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search