Next
प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज
अलौकिक बुद्धिमत्ता असलेले विज्ञाननिष्ठ संत
BOI
Sunday, April 21, 2019 | 12:45 PM
15 1 1
Share this article:

दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही गुलाबराव महाराजांना वेदान्त तत्त्वज्ञान आणि भौतिक व आध्यात्मिक शास्त्रांचे सखोल ज्ञान होते. म्हणूनच त्यांना ‘प्रज्ञाचक्षू मधुराद्वैताचार्य’ म्हटले जाई. अनेक विषयांवर त्यांनी सखोल साहित्यनिर्मिती केली. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत अलौकिक बुद्धिमत्ता असलेले विज्ञाननिष्ठ संत अर्थात प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांबद्दल...
.............
अक्कलकोटचे स्वामी समर्थ सन १८७८मध्ये समाधिस्त झाले. त्यांच्या समकालीन असे अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले. शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, पुण्यातील शंकर महाराज हे त्यातले प्रमुख आणि प्रसिद्ध सत्पुरुष. त्याच कालावधीत अध्यात्मातील आणखी एक अधिकारी व्यक्ती होऊन गेली - संत गुलाबराव महाराज. ते स्वत:ला ज्ञानेश्वरकन्या मानत आणि मधुराभक्तीने भगवान श्रीकृष्णाची उपासना करीत. अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अफाट लेखनकार्य केले. ते केवळ नऊ महिन्यांचे असताना, चुकीचे औषध घातल्याने त्यांना अंधत्व आले; परंतु आपल्या विलक्षण प्रतिभेच्या द्वारे ते प्रज्ञाचक्षू संत ठरले. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही विषयांत त्यांनी मूलगामी संशोधनपर ग्रंथ लिहिले. त्यांची जीवनगाथा अभ्यासनीय आहे.

गुलाबराव महाराजांचा जन्म सहा जुलै १८८१ रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात, माधान या गावी शेतकरी कुटुंबात झाला. आई आलोकाबाई आणि वडील गोंडुजी मोहोड. ते चार वर्षांचे असताना आईचे निधन झाल्यामुळे आजोळी, लोणी टाकळी या गावात त्यांचे बालपण गेले. त्यांना १९व्या वर्षी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताच्या द्वारे मंत्रदीक्षा दिली. संत ज्ञानेश्वर हेच त्यांचे गुरू आणि आई बनले. त्या वेळी त्यांना जे ‘माऊलींचे’ दर्शन घडले त्याचे वर्णन महाराजांनी स्वत: केले आणि त्यानुसार चित्रकाराने ज्ञानेश्वरांचे पहिले चित्र रेखाटले. तेच पुढे सर्वत्र रूढ झाले. आळंदीला समाधिस्थळीसुद्धा आजही तोच फोटो लावलेला दिसतो. दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही गुलाबराव महाराजांना वेदान्त तत्त्वज्ञान आणि भौतिक व आध्यात्मिक शास्त्रांचे सखोल ज्ञान होते. म्हणूनच त्यांना ‘प्रज्ञाचक्षू मधुराद्वैताचार्य’ म्हटले जाई. जगातील कोणत्याही भाषेतील कुठल्याही विषयाचे पुस्तक हातात घेतले, की त्यातील सर्व मजकूर त्यांना सार्थ कळत असे. बाह्य डोळ्यांची गरज न भासता ‘डोळियांचे डोळे’ ज्ञान ग्रहण करीत.

नवविधा भक्तीमध्ये ‘सख्य’ हा भक्तीचा आठवा प्रकार आहे. (श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन). ‘भगवंत हाच माझा साथी, मित्र, बंधू आहे,’ या भावनेने त्याची भक्ती करणे, हीच सख्य भक्ती किंवा मधुराभक्ती. गुलाबराव महाराज स्वत:ला गोपी समजून श्रीकृष्णाची एकनिष्ठेने भक्ती करत. काही वेळाने साडी नेसूनही बसत. अद्वैतात दृश्य-अदृश्य असे दैवत नसते. ब्रह्म किवा परमात्मा हेच लक्ष्य असते. जेव्हा पिंड (व्यक्ती) ब्रह्मांडाचे (परमात्म्याचे) ऐक्य होते, तेव्हा बघणारा कोण, ऐकणारा किंवा वास घेणारा कोण, बोलणारा किंवा विचार करणारा कोण उरतो? कोणी कोणाला जाणून घ्यायचे? एक ब्रह्मतत्त्व तेवढेच उरते. आपल्याला जगत म्हणून जे काही दिसते, ते भासरूप अर्थात माया (मिथ्या) असते. हेच अद्वैत/वेदान्त तत्त्वज्ञान आहे. मधुराभक्तीत देव आणि भक्त असे द्वैत आहे. अर्थात ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. गुलाबराव महाराजांना पूर्वजन्मांतील उपासनेमुळेच ती प्राप्त झाली. आपल्या शिष्यांना त्यांनी ही ज्ञानोत्तर भक्तीच शिकवली.

सन १८९६मध्ये, गणाजी भुयार यांची कन्या मनकर्णिका हिच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर लगेच १६व्या वर्षीच त्यांनी तत्त्वज्ञानपर निबंध आणि काव्य लिहिण्यास सुरुवात केली. जवळपासची गावे आणि शहरात जाऊन लोकांशी धर्माविषयक चर्चा करणे, हा त्यांचा आवडीचा नित्यक्रम झाला. सन १९०१ या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. गुलाबराव महाराज त्यांचेच शिष्य झाले. १९०५ साली त्यांनी भगवान श्रीकृष्णाशी लग्न केले. (श्रीकृष्ण हा एकमेव पुरुष आणि बाकी स्त्रिया - गोपी - असा एक विचार प्रचलित होता.)

संत गुलाबराव महाराज भक्तिधाम

२१व्या वर्षी त्यांनी डार्विन व स्पेन्सरच्या सिद्धांतांवर भाष्य लिहिले. योग, ज्ञान आणि भक्ती या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. वेद-उपनिषदांचे सुलभ विवरण केले. विशेष म्हणजे ‘मानस आयुर्वेद’ अर्थात आयुर्वेदाचा मानसशास्त्रीय अभ्यास प्रसिद्ध केला. मोक्ष वा ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा असलेल्या लोकांना (मुमुक्षु) त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले. एक अंध व्यक्ती इतके श्रेष्ठ प्रतीचे लेखन आणि प्रवचने करू शकते, हे पाहून उच्चशिक्षित, विद्वान लोकही थक्क होत. इतका अभ्यास त्यांनी कधी आणि कसा केला असेल? संस्कृत श्लोकांचे गूढ अर्थ त्यांना कोणी सांगितले? कुणाही संताने एवढा शास्त्रार्थ कधीच प्रतिपादला नाही. त्यांनी एकूण सुमारे १३५ पुस्तके लिहिली. त्यांची पृष्ठसंख्या सहा हजार भरेल. २५ हजार श्लोकांचे काव्य लिहून झाले. लहानपणापासून ते वारंवार समाधी अवस्थेत जात असत. काही वेळा त्यांचा श्वास पूर्ण थांबलेला असे. अवघ्या दहाव्या वर्षी त्यांना वेदशास्त्रांचे ज्ञान झाले होते. एखादा ग्रंथ मित्रांकडून वाचून घेतला, की तो तात्काळ पाठ होत असे, इतकी त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. कित्येक विद्वान-पंडितांना त्यांनी शास्त्रचर्चेत हरवले होते. त्यांचे अनेक शिष्य होते. त्यातले प्रमुख म्हणजे श्री. बाबाजी महाराज पंडित (मृत्यू १९६४). त्यांनी ज्ञानेश्वरीवर ‘भावार्थ दीपिका’ हे भाष्य लिहिले. ते गोरखपूरच्या गीता प्रेसने प्रसिद्ध केले आहे. गुलाबराव महाराजांचे बहुतेक शिष्य अधिकारपदाला जाऊन पोहोचले.

आर्य लोक बाहेरून भारतात आले, हे लोकमान्य टिळकांसह अनेक पाश्चात्य अभ्यासकांचे मत त्यांना मान्य नव्हते. आज तो सिद्धांत मागे पडला असून, आर्य इथलेच होते, हे मान्य झाले आहे. प्राचीन ग्रंथांमधील अणुविज्ञान, गणित, इलेक्ट्रॉन्स, गती, प्रकाश, विमानविद्या, इत्यादी विषयांचे संदर्भ महाराजांनी दाखवून दिले. शास्त्रज्ञांनी संस्कृत पंडितांची मदत घेऊन संशोधन केल्यास आपले प्राचीन भौतिक ज्ञान पुन्हा प्रकट होईल, असे साधार विवेचन त्यांनी केले. त्या दृष्टीने ‘न्यायशास्त्र’ अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या, पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने असा अभ्यास सुरू झालेला आहे. ‘आमच्या ग्रंथांमध्ये सर्व प्रकारचे ज्ञान भरलेले आहे. भारत अण्वस्त्र, विमाने यांच्यासह समृद्ध होता,’ अशा विधानांची थट्टा केली जाते; परंतु अभ्यास न करता त्याचे खंडन करणे हेसुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनात बसत नाही. गुलाबराव महाराजांचा मृत्यू २० सप्टेंबर १९१५ रोजी झाला. माधान (चांदूरबाजार) येथे त्यांचे समाधिमंदिर आहे. ‘माझे ग्रंथ सांभाळून ठेवा. मी पुन्हा येईन,’ असे ते म्हणत.

त्यांच्या लेखनाची व्याप्ती फार मोठी होती. चरित्र, व्याकरण, न्याय, दर्शन, कोश, सूत्रग्रंथ, निबंध, प्रकरण, भाष्य, पत्रे, प्रश्नोत्तरे, आख्यान, आयुर्वेद, नाटक, गीत-स्तोत्र, संगीत इत्यादी विषयांवर त्यांनी सखोल साहित्यनिर्मिती केली. संतमहात्मे आणि विद्वानांच्या ग्रंथांचे सार सामान्य जनांसाठी काढून दिले. मराठी, हिंदी आणि संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची गाजलेली पुस्तके म्हणजे धर्म-समन्वय, प्रेमनिकुंज, अलौकिक, व्याख्याने, योगप्रभाव, संप्रदाय सुरतरु, साधुबोध इत्यादी इत्यादी. महाराजांवरही अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांच्या स्वत:च्या संग्रहात दोन हजारांहून अधिक ग्रंथ होते. ते सर्व सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यांचा शिष्यपरिवार ज्ञानाची ही परंपरा पुढे चालवत आहे.

एक नेत्रविहीन व्यक्ती अज्ञानाने अंध असलेल्या लाखो जनांना प्रकाश देऊन गेली. अशा या संतश्रेष्ठाला शत-शत प्रणाम!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

 
15 1 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search