Next
‘अध्यापकांनी उद्योगजगताच्या गरजा समजून घेणे गरजेचे’
प्रेस रिलीज
Monday, October 09, 2017 | 03:56 PM
15 0 0
Share this article:

कार्यशाळेत बोलताना  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर,  एनआयपीएम,पुणेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी,  ‘भारत फोर्ज’चे मनुष्यबळ विभागाचे संचालक  डॉ. एस. व्ही. भावे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य  संजय धांडे
पुणे  :  ‘व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या अध्यापकांनी उद्योगजगताच्या बदलत्या गरजा, झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान या बाबी स्वतः प्रत्यक्ष समजून घेऊन त्यानुसार आपापल्या अध्यापनशैलीत बदल करणे गरजेचे आहे’, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर यांनी व्यक्त केले. 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएमच्या पुणे विभागाच्यावतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, ‘मनुष्यबळ व्यवस्थापनाचे अध्यापन करताना क्रमिक अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष उद्योगजगतात मनुष्यबळ व्यवस्थापन विभाग कशाप्रकारे कार्यरत असतो, त्याची कार्यशैली, त्यांच्यापुढील आव्हाने काय असतात हे समजून घेण्यासाठी अध्यापकांनी उद्योगजगताशी  प्रत्यक्ष संपर्क साधून समजून घेतल्यास व त्यानुसार अध्यापनात बदल केल्यास निश्चितच उद्योगजगताला  नेमके ज्या प्रकारच्या व्यवस्थापकांची गरज आहे  असे व्यवस्थापक विद्यार्थ्यामधून पुढे येतील यात शंका नाही’.
 
एनआयपीएमसारख्या उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या देशव्यापी संघटनेने यासाठी पुढाकार घेऊन अध्यापक आणि उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापक यांच्यातील प्रत्यक्ष व थेट संवाद वाढावा यासाठी आयोजित केलेली 'एकदिवसीय कार्यशाळा' हा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम असल्याचेही कुलगुरूंनी नमूद केले. 

‘या कार्यशाळेत उद्योगक्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापकांची अनुभवी व मार्गदर्शनपर व्याख्याने तसेच प्रत्यक्ष औद्योगिक कंपन्यांना भेट हे नियोजन  अतिशय अनुकरणीय असून व्यवस्थापनशास्त्र शाखेसोबतच अन्य विद्याशाखांसाठीसुद्धा असा कार्यक्रम राबविता येईल का, याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करू’, असेही कुलगुरूंनी सांगितले.

 या वेळी  विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य पद्मश्री संजय धांडे म्हणाले,‘दिवसेंदिवस विद्यापीठांचा अभ्यासक्रम व उद्योगजगताच्या गरजा यांच्यामधील दरी वाढत असून उद्योगजगातील वास्तविक घटकांचा विद्यापीठानी  आपल्या  अभ्यासक्रमात समावेश करायला हवा, जेणेकरून विद्यापीठांतून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या  युवक-युवतींना आधीच उद्योगजगताची ओळख झाल्याने उद्योगांच्या मागणीनुसार विद्यार्थी स्वतःला तयार करतील आणि पर्यायाने रोजगारक्षम विद्यार्थ्याची संख्या वाढवण्यास मदत होईल. 

यावेळी भारत फोर्ज कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे संचालक  डॉ. एस. व्ही. भावे  यांनी कार्यशाळेची  भूमिका विशद केली. एनआयपीएम,पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी म्हणाले,  महाविद्यालयात एनआयपीएमच्या सहकार्याने स्वतंत्र विद्यार्थी विभाग स्थापन करावा. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच उद्योग क्षेत्रातील गरजा समजून घेता येतील व त्यादृष्टीने स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करता येतील’. 
 
या कार्यशाळेत केहिन फाय लि.चे कार्यकारी संचालक सुधीर गोगटे, मनुष्यबळ व्यवस्थापक सल्लागार  कुलदीप जोशी,  भारत फोर्ज कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे संचालक  डॉ. एस. व्ही. भावे,   थरमॅक्स इंडिया लि.च्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष शरद गांगल, लिअर कॉर्पोरेशन कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे संचालक समीर कुकडे या मान्यवरांची व्याख्याने झाली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल राव यांनी तर आभार प्रदर्शन एनआयपीएम पुणे विभागाचे उपाध्यक्ष कॅप्टन डॉ. सी.एम. चितळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पवन शर्मा, अमला करंदीकर,  आशा महाजन, मुक्ता केसकर, निसार खान, सचिन कुंभारकर, अभिजित चव्हाण आदींनी विशेष सहकार्य केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search