Next
‘माती, गवत, पीकनियोजनावर काम केल्यासच दुष्काळाला हरवणे शक्य’
पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सोलापुरातील सुर्डी गाव प्रथम
BOI
Tuesday, August 13, 2019 | 05:34 PM
15 0 0
Share this article:

प्रथम क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी या गावाने मिळविला.

पुणे :
‘पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने पाणलोट क्षेत्रात मोठे काम झाले आहे आणि लोकांमध्ये जागृती झाली आहे; मात्र त्यासोबतच आता माती, गवत आणि पीक नियोजनावर काम करावे लागणार आहे. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी पुण्यात केले.

‘वॉटर कप स्पर्धा २०१९’च्या तालुका व राज्यस्तरीय पारितोषिकांचे वितरण ११ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाले. त्या वेळी खान बोलत होते. या कार्यक्रमाला चित्रपट व क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंतांची उपस्थिती होती. रिलायन्स फाउंडेशनचे सचिन मर्डीकर, एच. टी. पारेख फाउंडेशनच्या झिया लाल, पिरामल फाउंडेशनचे आर. चंद्रशेखर, टाटा ट्रस्ट्सचे पवित्रकुमार आणि बजाज फाउंडेशनचे अरविंद जोशी आदी मान्यवरांचा प्रमुख अतिथींमध्ये समावेश होता.

‘या स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे नसून, पाणलोटाचे महत्त्व गावागावांत पोहोचले पाहिजे,’ हे अधोरेखित करून आमीर खान म्हणाले, ‘स्पर्धेत भाग घेणारी सर्व गावे आमच्या दृष्टीने विजेतीच आहेत. दुष्काळाला आपण अजून हरवलेले नाही. आपण गाफील राहिलो, तर दुष्काळ परत येऊ शकतो; मात्र हा मार्ग सोपा नाही. पाणलोट कामासोबतच माती, गवत आणि पीक नियोजनावर काम करावे लागेल. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू.’

‘राज्यात व देशात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा विचार करून आम्ही हा कार्यक्रम साधेपणाने करण्याचा निर्णय केला,’ असे किरण राव यांनी सांगितले.

यंदाची स्पर्धा अत्यंत कठीण वातावरणात झाल्याचे पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ म्हणाले. ‘यंदाचे स्पर्धेचे चौथे वर्ष होते; मात्र आजपर्यंत एवढी खडतर परिस्थिती कधीही नव्हती. स्पर्धा घ्यावी की नाही अशी शंका यायला लागली होती. कारण गेल्या वर्षी पाऊस कमी झाला होता आणि स्पर्धेच्या काळातच निवडणुका आल्या. तरीही यंदा ४७२६ गावांनी प्रशिक्षण घेतले आणि त्यातील ४१५४ गावांनी प्रत्यक्ष स्पर्धेत सहभाग घेतला. या गावांनी दाखवून दिले, की त्यांच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. वॉटर कपच्या माध्यमातून गावागावांमध्ये सामाजिक भांडवल तयार होत आहे. हे सामाजिक भांडवल आपण भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी वापरू या,’ असे भटकळ यांनी सांगितले.

स्पर्धेच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या स्पर्धेत या वर्षी खूप चांगले काम झाले. गावागावांमध्ये विजेते ठरविणे हे अवघड काम होते; मात्र यातून हे जाणवले, की आता पीक पद्धत बदलायला हवी, अन्यथा भविष्यात पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. आता बारमाही पाणी शक्य नाही. त्यामुळे आपण आठमाही पाण्याची पद्धत अंगीकारायला हवी. बाजारपेठेवर आधारित पिकांची पद्धत बदलायला हवी. अन्यथा पुढील १० वर्षांत भारत उद्ध्वस्त होईल. डीजे व पुतळ्यांमध्ये गुंतलेल्या तरुणाईला पानी फाउंडेशनच्या परिवारात सामील करून घ्यायला हवे.’ 

‘पाण्याचा ताळेबंद ही संकल्पना पानी फाउंडेशनमुळे पुढे गेली,’ या शब्दांत त्यांनी पानी फाउंडेशनचे कौतुक केले.

नदीजोड प्रकल्पाला गती देणार : मुख्यमंत्री
राज्यातील पूर परिस्थितीमुळे व्यग्र असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, ‘आज महाराष्ट्रात पुराची स्थिती असली, तरी दुष्काळमुक्तीचा प्रवास सुरूच ठेवावा लागेल. त्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचे नियोजन सरकारने केले आहे.’

पिंपरी जलसेन

‘एकीकडे दुष्काळाला हटविण्यासाठी काम करणाऱ्या जलयोद्ध्यांचा व जलमित्रांचा सत्कार होत असताना अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे दु:ख आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील अनेक भागांत हीच परिस्थिती आहे. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करू,’ असेही फडणवीस यांनी नमूद केले.

आनोरे

सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी गाव प्रथम
पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यंदा सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी (ता. बार्शी) या गावाने बाजी मारली आणि ७५ लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळविले. रोख रकमेसह करंडक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपरी जलसेन (ता. पारनेर) आणि सातारा जिल्ह्यातील शिंदी खुर्द (ता. माण) या गावांनी दुसरा क्रमांक मिळविला. त्यांना संयुक्तपणे ५० लाख रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील आनोरे (ता. अमळनेर), वाशिम जिल्ह्यातील बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळपीर) आणि बीड जिल्ह्यातील देवऱ्याची वाडी (ता. बीड) या गावांना तिसरे पारितोषिक मिळाले. संयुक्तपणे ४० लाख रुपये व प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. (विजेत्यांची संपूर्ण यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

यंदाच्या स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांतील ४७०६ गावे सहभागी झाली होती. त्यात २५ हजारांहून अधिक प्रशिक्षित गावकरी सहभागी झाले होते. स्पर्धेच्या कालावधीत दररोज सरासरी पावणेदोन लाख जणांनी श्रमदान केले. त्यातून २३ हजार २१३ कोटी लिटर एवढे पाणी साठवता येऊ शकेल, अशा पाणलोट क्षेत्रातील रचना करण्यात आल्या.  
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 12 Days ago
These activities will certainly make it more easy to live through the hardships .
1
0

Select Language
Share Link
 
Search