Next
नवी दिल्ली ते लंडन : मदर्स ऑन व्हील्स
मातृत्व आणि कुटुंबव्यवस्थेच्या अभ्यासासाठी चौघींचा कारने २२ देशांत प्रवास
BOI
Friday, March 08, 2019 | 04:15 PM
15 0 0
Share this article:

आई व मूल यांच्यातले भावनिक संबंध, कुटुंबव्यवस्था यांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या सीए शीतल वैद्य-देशपांडे, विमा सल्लागार उर्मिला जोशी, दिल्लीच्या निवृत्त मुख्याध्यापिका माधुरी सहस्रबुद्धे आणि ग्वाल्हेरच्या निवृत्त शिक्षिका माधवी सिंग यांनी आपल्या कारने मध्य आशिया आणि युरोपमधल्या २२ देशांची सफर केली. नवी दिल्लीपासून लंडनपर्यंतच्या या खास मोहिमेचं नाव होतं ‘मदर्स ऑन व्हील्स.’ या धाडसी मोहिमेबद्दलचा हा लेख... आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त... 
.......
‘आम्ही चीनमधून कझाकस्तानात प्रवेश केला. गाडीत इंधन भरायचं होतं. पेट्रोल पंपावर विचारलं, तर कळलं की तिथं रोख चलन देऊनच पेट्रोल मिळणार होतं. आमच्यासमोर प्रश्नच उभा राहिला. आम्हाला कझाकी भाषा येत नव्हती. आमच्याकडे अमेरिकी डॉलर होते; पण ते तिथं चालणार नव्हते आणि त्याचं कझाकी चलनात रूपांतर करणं शक्यच नव्हतं. तरीही आम्ही आमचा प्रश्न इंग्रजीत सांगण्याचा प्रयत्न केला. एका शेतकरी तरुणाला थोडं इंग्रजी कळत होतं त्यामुळे त्यानं आमची अडचण समजून घेऊन आम्हाला डॉलरच्या बदल्यात कझाकी चलन दिलं आणि आमचा प्रश्न सुटला. आमच्या मनात आलं, अगदी देवासारखा धावून आला तो तरुण आमच्या मदतीला. पुढं दुपारच्या वेळी तो तरुण आम्हाला पुन्हा भेटला. त्यानं सफरचंदांनी भरलेली एक पिशवी आम्हाला आणून दिली. चार बायका काहीतरी वेगळं करायला निघाल्यात, याची जाणीव म्हणून ती मदत केली असावी. आम्ही त्याला आमच्या राहण्याच्या ठिकाणाचा पत्ता विचारला तर तो चक्क २०० किलोमीटरपर्यंत आम्हाला रस्ता दाखवायला आला. त्याच्या गाडीच्या ब्लिंकरचा माग घेत आम्ही आलो होतो. आमच्या हॉटेलच्या पार्किंगपर्यंत तो आला. आम्ही गाडी पार्क करायला गेलो. परतलो, तर तो तरुण निघून गेला होता....’ नुकताच कारने २२ देशांचा प्रवास करून आलेल्या शीतल वैद्य-देशपांडे आपला अनुभव सांगत होत्या.

पिसाचा झुकता मनोरा

आई व मूल यांच्यातले भावनिक संबंध, कुटुंबव्यवस्था यांचा अभ्यास करण्यासाठी पुण्याच्या सीए शीतल वैद्य-देशपांडे, विमा सल्लागार उर्मिला जोशी, दिल्लीच्या निवृत्त मुख्याध्यापिका माधुरी सहस्रबुद्धे आणि ग्वाल्हेरच्या निवृत्त शिक्षिका माधवी सिंग यांनी एक अनोखा उपक्रम राबवला होता. आपल्या ह्युंडाई आय-२० या कारने त्यांनी मध्य आशिया आणि युरोपमधील २२ देशांची सफर केली आणि त्यांच्या विषयाशी संबंधित लोकांच्या भेटी घेतल्या, संवाद साधला. त्याच उपक्रमातला हा कझाकस्तानातील अनुभव.

तुर्कमेनिस्तान

माधुरी सहस्रबुद्धे यांच्या फाउंडेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट इन अकॅडमिक फिल्ड (एफएचडीआयएएफ) या सेक्शन एट कंपनीशी इतर तिघीही संलग्न आहेत. कारने प्रवास करून भारतीय संस्कृतीतल्या मातृत्व आणि कुटुंबव्यवस्था या महत्त्वाच्या विषयांवर इतर देशांतल्या सामान्यांशी संवाद साधायची मूळ कल्पना माधुरी यांचीच. या एक्स्पिडिशनला नाव दिलं होतं ‘मदर्स ऑन व्हील्स’ आणि त्याचा मोटो होता ‘आउट टू हील दी वर्ल्ड.’

सुषमा स्वराज यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखविला.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सर्वांच्या कल्पनेला उचलून धरलं आणि त्यांना परराष्ट्र खात्याच्या वतीनं सर्व मदत केली. त्याचबरोबर भारतीय महिलांच्या धाडसाला सुरक्षाकवच असावं म्हणून उपक्रम सुरू असताना त्याची प्रसिद्धी न करण्याचा सल्लाही दिला. दिल्लीत सुषमा स्वराज यांनीच १० सप्टेंबर २०१८ रोजी या साहसी मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर नेपाळ, चीन, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, अझरबैजान, जॉर्जिया, तुर्की, बल्गेरिया, सर्बिया, क्रोएशिया, इटली, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स, फ्रान्समार्गे लंडन या मार्गाने ही मोहीम १५ नोव्हेंबर २०१८ रोजी पूर्णत्वास गेली. ६४ दिवसांच्या या प्रवासात या भारतीय मातांनी २३ हजार ८०० किलोमीटरचं अंतर कारने कापून २२ देशांतल्या ३२ शहरांत ३७ ठिकाणी बैठका घेतल्या. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनीही या मोहिमेला आशीर्वाद दिले होते. त्यामुळे जागोजागी त्यांच्या अनुयायांनीही या मोहिमेला खूप मदत केली.

मोहिमेचा मार्ग

माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘आम्ही चौघीही आई असल्यामुळे मातृत्वाची जागतिक परिभाषा कशी असेल आणि इतर देशांत कुटुंबव्यवस्था कशी असेल याबाबत मनात कुतूहल होतं. अर्थात, त्याबद्दल माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होतीच; पण याबद्दल प्रत्यक्ष अभ्यास करावा अशी इच्छा प्रबळ झाली आणि दोन वर्षं आम्ही केलेल्या तयारीला अखेर मूर्त रूप आलं. सुषमाजी, रविशंकरजी, आमच्या चौघींचे कुटुंबीय आणि विविध देशांच्या दूतावासांतले मदत करणारे अधिकारी या सगळ्यांच्या सहकार्याने आमची ही मोहीम फत्तेही झाली. जगभर मातृत्वाची भावना एकच असली, तरीही देश आणि संस्कृतीनुसार आई आणि मुलांच्या संबंधांमध्ये खूप मोठे वैविध्य दिसलं. काही ठिकाणी देशातल्या आर्थिक, सामजिक परिस्थितीमुळे, तर काही ठिकाणी अतिस्वातंत्र्यामुळे या संबंधांत अंतर निर्माण झाल्याचं दिसून आलं. या सगळ्याच्या वर होती ती आईची माया; ती मात्र कुठेही तसूभरही वेगळी जाणवली नाही. प्रत्येक आईचं मुलावर असलेलं निरतिशय, निरपेक्ष प्रेम आणि मुलाच्या चांगल्यासाठी सुरू असलेली तगमग हे सार्वकालिक सत्य असल्याचं आम्हाला जाणवलं.’

श्री श्री रविशंकर यांची जर्मनीत भेट

या चौघींनी प्रत्येक ठिकाणी स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी बैठका आयोजित केल्या. त्यामध्ये तिथल्या विविध स्तरांतल्या, विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला, मुलं, काही ठिकाणी पुरुषही त्यांना भेटले. भारतातले आई व मुलांतले नाते आणि आपली कुटुंबव्यवस्था याबाबत यांनी माहिती दिली, तर तिथल्या लोकांनी त्यांची परिस्थिती, भावना आणि अडचणी मांडल्या.  

उझबेकिस्तानमध्ये स्वागत

त्याबद्दल शीतल म्हणाल्या, ‘या देशांबद्दल आम्ही आधी अभ्यास केला होता. तिथली संस्कृती, राहणीमान यांबद्दल वाचन केलं होतं. त्यामुळे मध्य आशियातल्या देशांमध्ये थोडं भीतीचं वातावरण सार्वजनिक जीवनातही जाणवेल अशी अपेक्षा होती; पण तिथे आमचा अपेक्षाभंग झाला. मध्य आशियातल्या बहुतांश देशांत शेतमजुरी, पेट्रोल पंपापासून ते राजदूतावासातही महिला काम करताना दिसल्या आणि आनंद झाला. या देशांत महिलांना स्वातंत्र्य कमी आहे आणि त्यांना सांस्कृतिक बंधनंही पाळावीच लागतात. इथल्या कुटंबव्यवस्थेवर भारतीय व्यवस्थेची छाप दिसून आली. महिला कुटुंब चालवण्यासाठी नोकऱ्या करताना दिसल्या; पण लग्नानंतर आपल्याप्रमाणे नवरा, मुलं एकत्र कुटुंब म्हणून राहतील, असं नाही. अनेकांचे नवरे बायकांना सोडून जातात. एकाकी आयांचं प्रमाण मोठं आहे. आम्ही ज्या रस्त्यानं गेलो, तो पूर्वी व्यापारी मार्ग होता. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या खुणाही दिसल्या. अझरबैजानमध्ये ज्वाला मंदिर आहे. त्याच्या मध्यभागी एक ज्वाला कायम तेवत असते. त्याच्या बाजूला असलेल्या प्रदर्शनामध्ये तिथे सापडलेले संस्कृत शिलालेख वाचायला मिळाले. या देशांतली सद्यस्थिती पाहता भारत सरकारनं गेल्या पाच वर्षांत सुरू केलेल्या योगाच्या प्रसिद्धीला इथे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामान्य लोकांमध्ये योग आणि भारतीय कुटुंबव्यवस्थेबद्दल आकर्षण आहे.’  

लंडनमधील दूतावास

चीन, तुर्की वगळता बहुतेक देशांच्या दूतावासात जाण्याची संधी या महिलांना मिळाली. त्यामुळे राजदूत, तिथले अधिकारी यांच्याशी संवाद झाला. सगळ्याच देशांमध्ये दूतावासाकडून भारतीय संस्कृती, योग यांचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं या संवादातून लक्षात आलं. मध्य आशियातून युरोपमध्ये गेल्यावर समाजाचं वेगळंच रूप या महिलांनी अनुभवलं. त्याबाबत माधुरी म्हणाल्या, ‘युरोपात वैज्ञानिक प्रगतीमुळे व्यक्तिस्वातंत्र्याला अफाट महत्त्व आहे. त्यामुळे इथं समाजाचं एक वेगळंच रूप आम्हाला दिसलं. १६व्या वर्षी मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी घर सोडायचं ही तिथली रीत जगजाहीर आहे. त्याचा स्वावलंबन म्हणून फायदा असला, तरीही नंतर तोटा होतो, असं तिथल्याच काही ज्येष्ठांनी बोलून दाखवलं. लग्नव्यवस्था कोलमडून गेली आहे, ‘इंडिव्हिज्युअलिझम’मुळे कुटुंब, कौटुंबिक जबाबदाऱ्या या गोष्टी अस्तित्वातच नाहीत. ज्येष्ठांची तर भयाण अवस्था आहे. यशस्वी होण्याच्या सामाजिक कल्पना पक्क्या आहेत. त्यामुळे १६व्या वर्षी घर सोडून बाहेर पडलेला मुलगा किंवा मुलगी २७व्या वर्षी आई-वडिलांकडे आला/आली, तर ते अपयशी झाले, असं समाज मानतो. त्यामुळे दोघांचीही कुचंबणा होते; पण या जनरीतीपुढे कुणाचेच काही चालत नाही. आई-वडिलांचा सांभाळ करणं, कुटुंब म्हणून जबाबदाऱ्या पार पाडणं या पद्धती नसल्यामुळे स्वातंत्र्याचं स्वैराचारात रूपांतर झालं आहे. त्याचे परिणाम तिथल्या ज्येष्ठांना जाणवत असून, आपणच कौटुंबिक भावना जोपासू शकलो नाही, याची खंतही त्यांना वाटते. त्यामुळे त्यांनाही भारतीय कुटुंबव्यवस्थेचं अप्रूप आहे.’ 

जर्मनी

या मोहिमेचं एकूण फलित काय, याबद्दल शीतल म्हणाल्या, ‘भारतीय संस्कृतीचा भाग असलेली कुटुंबव्यवस्था आणि योग यांचा प्रसार करण्यासाठी या २२ देशांत खूप वाव आहे. तिथल्या लोकांनी या विषयांवर कौन्सिलिंग सत्र, मार्गदर्शन करण्याची अपेक्षाही व्यक्त केली. एकूणातच या साहसी मोहिमेतून काही गोष्टी ध्यानात आल्या. आई व मूल यांच्यातील आपुलकी, प्रेम हे भावनिक संबंध जगभर सारखेच असले, तरीही त्याला देश-काल-परिस्थितीनुसार वेगवेगळे कंगोरे आहेत. कौटुंबिक व्यवस्था आणि त्यामुळे असलेला सामाजिक सौहार्द या बाबतीत भारत खरोखरच खूप श्रीमंत आहे. त्यामुळे मध्य आशिया आणि युरोपीय देशांतूनही भारताकडे आशेनं पाहिलं जात आहे.’

निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गौरव

ही साहसी मोहीम लंडनमध्ये पूर्ण केल्यानंतर भारतात परतलेल्या या साहसी मातांकडून त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी सुषमा स्वराजही उत्सुक होत्या. सुषमाजींनी त्यांचे अनुभव ऐकून या महिलांचा गौरवही केला. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडूनही या महिलांचं कौतुक झालं. त्यांच्या या मोहिमेबद्दल त्यांचं अभिनंदन! 

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(शीतल वैद्य-देशपांडे यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. महिला दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील विशेष लेख/बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Manoj M Masurkar About 128 Days ago
Good and Courageous Initiative.
0
0

Select Language
Share Link
 
Search