Next
‘स्लमडॉग सीए’च्या जिद्दीची गोष्ट
BOI
Thursday, August 02, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

अभिजित थोरातझोपडपट्टीत राहून, समाजाची उपेक्षा आणि तिरस्कार झेलून, अनेक हालअपेष्टांना तोंड देत, परिस्थितीशी दोन हात करत एक निरागस मुलगा एका ध्येयानं झपाटतो... सीए होतो आणि आपल्या प्रतिकूल वाटेवरचा संघर्ष इतरांना करायला लागू नये, म्हणून त्यांना मदतीचा हात पुढे करतो, त्याची ही गोष्ट!... ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात आज जाणून घेऊ या अभिजित थोरात या तरुणाची प्रेरणादायी कहाणी...
.............
‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा अनिल कपूर आणि देव पटेल यांच्या भूमिका असलेला चित्रपट खूपच गाजला. त्यातलं ए. आर. रेहमानचं ‘जय हो’ हे गाणं अनेकांच्या मोबाइलची रिंगटोन म्हणून किंवा ‘हॅलो ट्यून’ म्हणून वाजत राहिलं. या चित्रपटात ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या झगमगत्या शोमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि चहाच्या दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाचा नंबर लागतो आणि अनिल कपूर (अमिताभ बच्चनप्रमाणेच) या तरुणाला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. त्यांना योग्य उत्तरं देऊन हा तरुण प्रत्येक टप्प्यावरची बक्षिसं जिंकत जातो. सगळ्या जगाचं लक्ष या ‘शो’कडे लागतं. जिथे तिथे चर्चा झडू लागतात. लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. या ‘शो’च्या वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना या तरुणाला त्याचा भूतकाळ आठवत राहतो. यातूनच त्याच्या प्रवासाची, त्याच्या बकाल जगण्याची कहाणी आपल्यासमोर उलगडत राहते. मुंबईमधलं आणखी एक भीषण जग समोर येतं. त्यात राहणाऱ्या लोकांचं किडा-मुंगीसारखं जगणं आपल्याला असह्य होतं...या चित्रपटातले अनेक प्रसंग बघवत नाहीत. सुरक्षित कोषात जगणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्या लोकांच्या वाट्याला अशा जगण्यातला एक दिवस जरी आला, तरी आपण ते जीवन जगू शकणार नाही इतकं सगळं असहाय आणि विदारक!
अभिजित थोरातच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या स्लमडॉग सीए या पुस्तकाचे अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

जेव्हा माझ्या हातात ‘स्लमडॉग सीए’ हे सुरेखशा मुखपृष्ठाचं आणि मनोज अंबिके असं लेखकाचं नाव असलेलं पुस्तक पडलं, तेव्हा ‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा चित्रपट पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांसमोरून झर्रकन सरकून गेला. ‘स्लमडॉग मिलेनिअर’आणि ‘स्लमडॉग सीए’ यात नक्कीच काहीतरी साम्य असणार होतं. ‘स्लमडॉग सीए’ ही कपोलकल्पित कादंबरी नव्हती, तर ती एक सत्यघटना होती आणि या सत्यघटनेतल्या प्रवाशाला मी भेटणार होते. या ‘स्लमडॉग सीए’च्या नायकाचं नाव होतं अभिजित थोरात! मला वाचायची होती या तरुणाच्या जिद्दीची, संघर्षाची आणि प्रयत्नांची गोष्ट! झोपडपट्टीत राहून, समाजाची उपेक्षा आणि तिरस्कार झेलून, अनेक हालअपेष्टांना तोंड देत, परिस्थितीशी दोन हात करत एक निरागस मुलगा एका ध्येयानं झपाटतो आणि ते ध्येय तर साध्य करतोच; पण आपल्या प्रतिकूल वाटेवरचा संघर्ष इतरांना करायला लागू नये, म्हणून त्यांना मदतीचा हात पुढे करतो त्याची ही गोष्ट!

अभिजितची मुलाखत घेताना लेखिका दीपा देशमुख

मुलाचा जन्म होण्याआधीच या मुलाचा पिता आपली जबाबदारी झटकून, न सांगता निघून गेल्यावर त्या स्त्रीच्या वाट्याला ज्या हालअपेष्टा आणि हतबलता यावी, ते सगळं या मुलाच्या आईच्या वाट्याला आलं; मात्र धीर न सोडता, आपल्या पोटातल्या मुलाला पोटातच न मारता या स्त्रीनं त्याला जन्म द्यायचं ठरवलं. लोकांच्या घरी कामं करून या मातेनं या मुलाला जन्म दिला. त्याचंच नाव अभिजित! अभिजितच्या जन्मानंतर परिस्थिती जास्तच बिकट झाली. इतक्या लहान बाळाला घेऊन कामाला जाता येत नाही आणि त्याला कुठे ठेवताही येत नाही. अशा वेळी शेजारी राहणारी अपत्य नसलेली एक स्त्री मदतीसाठी धावून आली आणि तिनं अभिजितच्या आईसमोर ‘हा मुलगा मला दे, मी त्याचा चांगला सांभाळ करीन,’ असा प्रस्ताव ठेवला. तशाही परिस्थितीत आपल्या मुलाचं ओझं न समजता अभिजितच्या आईनं या प्रस्तावाला नकार दिला आणि अभिजितसह जसं जमेल तसं जगायचा निर्णय घेतला. अभिजितच्या आईची मैत्रीण नगरजवळच्या शिरूर गावात राहत होती, तिला सगळी परिस्थिती समजताच, तिनं आपल्या मैत्रिणीला मुंबईचं धकाधकीचं जगणं सोडून शिरूरला यावं असा सल्ला दिला. आपल्या मैत्रिणीचं ऐकून अभिजितची आई आपल्या लहानग्या मुलासह शिरूरला पोहोचली. इथं आल्यावर कष्टकऱ्यांची वस्ती असलेल्या कामाठीपुरा या भागात तिच्या मैत्रिणीनं तिला एक खोली मिळवून दिली. या मैत्रिणीनं आणि तिच्या नवऱ्यानं तिला एक शिलाई मशीन उपलब्ध करून दिलं. मैत्रिणीनं शिलाईकाम शिकवलं आणि अभिजितची आई लोकांचे कपडे शिवून देऊन आपला उदरनिर्वाह भागवू लागली. बघता बघता अभिजित शाळेत जाण्याच्या वयात जाऊन पोहोचला. तो या झोपडपट्टीतल्या मुलांबरोबरच राहत होता, तिथलीच मुलं त्याचे मित्र बनली होती. या भागात राहणाऱ्या अनेक लोकांचं जगणं गुन्हेगारीच्या आणि व्यसनांच्या विळख्यात सापडलेलं होतं. असं असतानाही अभिजितच्या आईनं आपल्या मुलावर फक्त चांगल्या गोष्टींचे संस्कार केले होते. आईचं प्रेम आणि तिचे संस्कार यामुळे अभिजितवर या वातावरणाच्या गढूळपणाचा जराही परिणाम झाला नाही. त्याच्या कानावर अनेक शिव्या पडल्या; पण तोंडावाटे एकही शिवी कधी बाहेर पडली नाही. आसपासची केवळ मोठी माणसंच नव्हे, तर अगदी लहान वयातली मुलंदेखील विड्या ओढायची; पण अभिजितला कधीही त्याबद्दलच्या कुतुहलानं आकर्षित केलं नाही.अभिजितच्या आईनं त्याला सरकारी शाळेत दाखल केलं. इतर मुलांसारखं छानसं दप्तर नाही, पायात बूट किंवा मोजे नाहीत, हातात रंगीबेरंगी वॉटरबॅग नाही किंवा शाळेत बोटाला धरून पोहोचवणारी आई बरोबर नाही... अशा परिस्थितीत आईनं शिवलेली पिशवी घेऊन अभिजित शाळेत जायला लागला. त्याला शाळा आवडली; मात्र याच वेळी, याच वयात त्याला आईच्या कामाला हातभारही लावावा लागला. लहान वयापासून कधी पतंग विक, तर कधी लग्नसमारंभात भांडी घास, कधी कुठल्या दुकानात साफसफाईचं काम कर, तर कधी चहाच्या टपरीवरून चहा आणून दे, अशी अनेक कामं अभिजित करत राहिला. ही कामं करताना कुठलंही काम हलकं किंवा मोठं नसतं हे सत्य त्याला उमगलं. त्यामुळेच कुठल्या कामाची लाजही त्यानं कधी बाळगली नाही. प्रत्येक वर्षी फी भरायची असो वा वह्या पुस्तकं घ्यायची असतो... अभिजित आणि त्याच्या आईला बिकट परिस्थतीशी सामना करावा लागे आणि तरीही न डगमगता दोघंही पुढे जात राहिले. शिकून डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनीअर व्हायचं, या दोनच गोष्टी अभिजित आणि त्याच्या आईला ठाऊक होत्या. त्यामुळे अभिजितनंही इंजिनीअर व्हायचं ठरवलं; मात्र आर्थिक परिस्थितीनं पूर्णपणे पाठ फिरवली होती. इंजिनीअर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही ही गोष्ट अभिजितच्या लक्षात आली. अशा वेळी त्याचे राठोड नावाचे शिक्षक त्याला धीर देऊन म्हणाले, ‘अभिजित, इंजिनीअर होणं म्हणजेच सर्व काही नाही. आणखी खूप मोठं कार्यक्षेत्र आहे. तू सीए हो. अरे सीए झाल्यावर तू असे चार इंजिनीअर खिशात घेऊन फिरशील.’ सीए म्हणजे काय, हे प्रकरण कशाशी खातात, त्यासाठी काय करावं लागतं याची अभिजितला शून्य माहिती होती; पण आपले शिक्षक आपल्या भल्यासाठीच हा सल्ला देताहेत हा विश्वास अभिजितला होता. त्यामुळे त्यानं आता माहीत नसलेल्या वाटेवरून चालण्याच्या निर्णय घेतला. आता शिक्षण आणि अर्थार्जन अशा दोन्हीही गोष्टींची कसरत करत अभिजितचा एक एक दिवस पुढे पळत होता. सीए होण्यासाठी पुण्यात पोहोचणं गरजेचं होतं. अभिजित पुण्यात पोहोचताच पुन्हा नव्या संघर्षांची वाट त्याच्यासाठी तयारच होती. अभिजितचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं, पुण्यात येताक्षणी इंग्रजीशी सामना करावा लागला. तसंच राहण्याच्या सोयीपासून ते क्लासची फी भरण्यापर्यंतच्या विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांची निकड या गोष्टी त्याला सतावत होत्या; पण प्रयत्नांची कास धरून चालणाऱ्या माणसाला या वाटेवरही काही चांगली माणसं भेटतात, तशी अभिजितलाही ती भेटली. कोणी त्याच्या राहण्याची सोय केली, तर कोणी क्लासला लागणाऱ्या फीची! अभिजित या काळात इंग्रजी डिक्शनरी घेऊन बसायचा आणि एक एक शब्द समजावून घेत त्यानं आपला अभ्यास सुरू केला. सीए होणं ही गोष्ट तितकीशी सोपी नव्हती. एक खूप मोठं आव्हान त्याला पेलायचं होतं. अनेकदा सगळं सोडून हार मानून परत जायला हवं, असंही मन म्हणालं; पण अभिजितनं या मनाला गप्प बसवलं आणि आपलं ध्येय गाठायचंच असं मनाशी पक्कं केलं. अखेर अभिजित सीए झाला. अभिजितचा पुढला प्रवास मात्र खूप सुखकर असणार होता. त्याला पुण्यातल्या निखिल कन्स्ट्रक्शन्स या नामांकित फर्ममध्ये सीएफओ या पदावरची नोकरी मिळाली. चांगला पगार मिळाला. आज अभिजितकडे पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःचं घर आहे, गाडी आहे, मनासारखी छानशी बायको आहे. असं सगळं असतानाही आपल्या वैयक्तिक सुखाचा आनंद लुटण्यात अभिजित दंग झाला नाही. त्याच्या मनातला अस्वस्थ तरुण सतत जागाच असतो. आपला प्रवास शक्य झाला; पण आपल्यासारखे अनेक जण इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, याची जाणीव त्याला होती. मग त्यानं ‘नादान परिंदे’ या नावानं एक संस्था स्थापन केली. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेऊ पाहणारे, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करणारे युवक त्याला आजूबाजूला दिसत राहिले. या सगळ्यांना मदतीचा हात देणं, त्यांच्या प्रवासात त्यांचं पालकत्व घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं अशा गोष्टी करायच्या अभिजितनं ठरवल्या. आता भौतिक गोष्टींचा हव्यास न धरता आपल्या मिळकतीचा काही हिस्सा याच कामासाठी खर्च करायचं, अभिजितनं ठरवलं. आज अभिजित सीए करू इच्छिणाऱ्या गरीब आणि होतकरू युवकांना त्यांच्या राहण्याच्या सोयीपासून ते त्यांना हव्या असणाऱ्या शैक्षणिक साधनांपर्यंतच्या सुविधा पुरवतो. फक्त ‘सीए’च नाही, तर कुठलंही शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी तो उभा राहतो. मला काही चांगली माणसं भेटली, म्हणून मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. तेव्हा मला त्या लोकांचं ऋण चुकतं करण्यासाठी त्यांच्यासारखंच बनून चालत राहिलं पाहिजे, ही गोष्ट अभिजितनं ठरवली. त्यामुळे ‘नादान परिंदे’ या संस्थेच्या माध्यमातून तो कुठलाही गाजावाजा न करता अनेक कामं करत असतो. त्याच्या कामात त्याची पत्नी प्रांजल हिचीही साथ त्याला असते. आज अनेक शाळांना, शिक्षणाची आणि वाचनाची आवड असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अभिजित भेटत राहतो आणि त्यांना चांगली पुस्तकं उपलब्ध करून देतो. 

स्लमडॉग सीए या पुस्तकाच्या प्रकाशनाला लोकांनी मोठी गर्दी केली होती.

एके दिवशी अभिजितची ही गोष्ट पुण्यातल्या ‘मायमिरर पब्लिशिंग’चे तरुण तडफदार इंजिनीअर असलेले प्रकाशक मनोज अंबिके यांच्या कानावर पडली आणि ते खूपच प्रभावित झाले. ‘तुझा संघर्ष लोकांसमोर आला पाहिजे. तो वाचून नैराश्याकडे झुकणारे अनेक तरुण वाचतील आणि त्यांना तुझ्या प्रवासातून प्रेरणा मिळेल,’ असं त्यांनी अभिजितला सांगून त्याच्या वाटचालीवर पुस्तक काढण्यासाठी त्याला तयार केलं. संवेदनशील मन असलेल्या मनोज अंबिके यांनी ‘स्लमडॉग सीए’ या पुस्तकातून अतिशय सुरेखरीत्या अभिजितचा प्रवास उलगडला. 

मनोज अंबिके यांची व्यक्तिमत्त्व विकासावरची यशाचा मार्ग दाखवणारी अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली असून, विठ्ठल कामत यांच्या आयुष्याचा वेध घेणारं पुस्तक असो वा अब्दुल कलाम यांचं चरित्र, ही सर्वच पुस्तकं अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘स्लमडॉग सीए’ हे पुस्तक वाचताच, या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांनी आनंदानं होकार दिला. अल्पावधीतच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या हातोहात संपल्या. 

वेध या कार्यक्रमात अभिजितला बोलतं करताना डॉ. आनंद नाडकर्णी

विख्यात मनासोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना अभिजितची गोष्ट कळताच, त्यांनी त्याला त्यांच्या महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यांत होणाऱ्या ‘वेध’ या कार्यक्रमाद्वारे बोलतं केलं आणि अनेक युवकांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही प्रेरित केलं. अभिजितची वाटचाल आजही शांतपणे सुरू आहे. आपल्या भौतिक गरजा मर्यादित ठेवून आपल्याला पुढलं आयुष्य समाजोपयोगी कामांसाठी व्यतीत करायचं, हे त्याचं ध्येय आहे. अनेक चांगली पुस्तकं वाचणं, अंगात मानवतावाद बाणलेल्या कर्तृत्ववान लोकांना भेटणं, गरजूंना मदत करणं, आपल्या कामातलं आपलं कौशल्य वाढवणं अशा गोष्टी अभिजित करतो आहे. 

लेखिका दीपा देशमुख आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासह अभिजित थोरात

अभिजितच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अॅड. उज्ज्वल निकम यांनी अभिजितचा चांगुलपणा व्यक्त करण्यासाठी काही ओळी उद्धृत केल्या होत्या. तुम्ही किती लहान-मोठे आहात यापेक्षा तुम्ही काय करता आहात, याकडे त्यांनी त्यातून लक्ष वेधलं होतं –

जो लोग खुदके स्वार्थ के लिए, दूसरों की हत्या करते है
उनको मानव नहीं, राक्षस कहा जाता है
क्या ये दहशतगर्दी बिना वजह
क्यों निर्दोष लोगों की हत्या करते है
क्या कहूँ मैं इनसे, ये लोग कैसे है, जो बम बनाते है
इनसे तो वो कीडे अच्छे है, जो रेशम बनाते है

अशा शांत, मनमिळाऊ आणि सुस्वभावी अभिजितला भेटायला प्रत्येकालाच आवडेल.

संपर्क :  अभिजित थोरात
मोबाइल : ९५५२५ ६५९११
ई-मेल : abthorat.ca@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(‘स्लमडॉग सीए’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. पुस्तकाच्या अभिवाचनाची लिंकही सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Damayanti mangesh parulekar About 194 Days ago
तुमची मुलाखत मला फारच आवडली. तुमच्या कडून खुप छान अनुभव मिळाला . तुमची प्रेरणा घेऊन नक्कीच आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न मी करेन. तुम्हाला परत भेटायला नक्की आवडेल मला धन्यवाद सर.
0
0

Select Language
Share Link
 
Search