घराघरात आनंदाची आतषबाजी करणारा दिवाळीचा सण उद्यापासून सुरू होतोय. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज जुन्या हिंदी चित्रपटांतील दिवाळीच्या गाण्यांबद्दल चर्चा करू या आणि १९६१च्या ‘नजराना’ चित्रपटातल्या ‘रंगीन दिवाली है’ या सुंदर गाण्याचा रसास्वादही घेऊ या.
..........
हिंदी चित्रपटातील सणांचा उल्लेख याबद्दल विचार केला असता असे दिसून येते, की १९३१ साली चित्रपट बोलू लागला तेव्हापासून ‘सणांचा राजा’ असे ज्या दिवाळी सणाला म्हटले जाते त्या सणाकडे चित्रपट निर्मात्यांचे थोडे दुर्लक्षच होते. ओघानेच हिंदी चित्रपट गीतात दिवाळीचा उल्लेख खूप कमी प्रमाणात आढळतो. ‘होळी’, ‘रक्षाबंधन’ या संदर्भातील चित्रपटगीतांच्या तुलनेत आनंदी चित्रपट गीते हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत हे दिसून येते.
मुळातच १९३१ साली चित्रपट बोलू लागल्यावर हिंदी चित्रपटगीतांत दिवाळीचा समावेश होण्यासाठी १९४१ साल उजाडले. दलसुखलाल पांचोली या चित्रपट निर्मात्याने १९४१ मध्ये ‘खजांची’ हा चित्रपट बनवला. गुलाम हैदर यांनी या चित्रपटास संगीत दिले होते. त्या संगीतात त्यांनी पंजाबी लोकसंगीताला प्राधान्य दिले. त्या गीतांमधील गाण्याचा ठेका त्या वेळच्या रसिकांना खूप आवडला. ‘खजांची’ची गाणी खूप गाजली. दीपावलीच्या उत्सवाचे गुणगान करणारे सिनेसृष्टीतील पहिले गाणे लोकांपुढे आले ते याच ‘खजांची’ चित्रपटामधून. ‘दिवाली फिर आ गायी सजनी...’ असे त्या गाण्याचे शब्द होते.
या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘कलेला जातीपातीचे बंधन नसते’ हे या गाण्याने दाखवून दिले. ते कसे? तर ‘खजांची’मधील दिवाळीचे हे पहिले चित्रपटगीत ज्यांनी लिहिले होते ते गीतकार होते ‘वलीसाहेब’, हे गीत ज्यांनी संगीतबद्ध केले होते ते होते ‘गुलाम हैदर’ आणि ते गायले होते ‘शमशाद बेगम’ यांनी. हे तिन्ही कलावंत मुस्लिम होते व त्यांनी हिंदूंच्या एका महत्त्वाच्या सणाचे पहिले चित्रपटगीत निर्माण केले. भारताच्या भूमीत सारे कसे गुण्यागोविंदाने नांदतात त्याचे हे उदाहरण आहे.
‘दी वे ऑफ ऑल फ्लॅश’ या नावाच्या इंग्रजी चित्रपटावरून ‘खजांची’ चित्रपटाची कथा बेतण्यात आली होती. हीच कथा घेऊन निर्माते दिग्दर्शक पी. एन. अरोरा यांनी १९५८ साली ‘खजांची’ याच नावाचा एक चित्रपट निर्माण केला होता. या चित्रपटाला मदनमोहन यांचे संगीत होते आणि याही चित्रपटात दिवाळीचे एक गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायले होते. त्या गीताचे शब्द होते ‘आयी दिवाली आयी.. कैसे उजाले लायी...’चित्रा नावाच्या नायिकेच्या तोंडी हे गीत होते.
१९४१ नंतर एकदम १९५८मध्येच दिवाळी चित्रपटगीतात डोकावली का? तर याचे उत्तर ‘नाही.’ १९४३च्या ‘किस्मत’ चित्रपटाला संगीतकार अनिल विश्वास यांनी संगीत दिले होते. या चित्रपटात गायिका अमीरबाई कर्नाटकी यांनी गायलेले, ‘घर घर में दीवाली है मेरे घर मे अंधेरा..’ हे दिवाळीचे गीत होते; पण अर्थातच ते दुःखी भावनेचे होते. १९४३ सालच्या या गीताने दिवाळीच्या आनंदी गीतांबरोबरच आठवणीतील दिवाळी अगर विरहातील दुःखी गीतांची परंपरा सुरू केली असे म्हटल्यास गैर ठरू नये! कारण लगेचच १९४४ साली पडद्यावर झळकलेला ‘रतन’ अनेक उत्तमोत्तम गाण्यांचा चित्रपट होता. त्यामध्ये डी. एन. मधोक यांनी लिहिलेले एक गीत होते, ज्यामध्ये
अशी शब्दरचना होती. नौशाद यांनी हे गीत संगीतबद्ध केले होते आणि जोहराबाई अंबालावाली यांनी ते गायले होते.
माणसाला आनंदी करणारी दिवाळी; पण प्रत्येकाला तो सण आनंदाचा वाटतो असे नाही आणि हीच वास्तवता संगीतकार हुस्नलाल भगतलाल यांनी १९५१मधील ‘स्टेज’ या चित्रपटामधील गीतामधून दाखवली होती. ‘सरशार सैलानी’ यांनी लिहिलेले ‘जगमगाती दिवाली की रात आ गयी...’ हे गीत या चित्रपटात आनंदी मनस्थितीतील होते व दुःखी मनाचेही होते. आशा भोसले व सहकाऱ्यांनी आनंदी गीत गायले होते, तर शोकगीत लतादीदी आणि सहकाऱ्यांनी गायले होते. ‘स्टेज’मध्ये देव आनंद नायक होता व रमोला त्याची नायिका होती.
हिंदी चित्रपटगीतांतील दिवाळीची वाटचाल अशी चालू होती; पण तो पुढचा भाग बघण्याआधी एका सुंदर दिवाळी गीताचा आनंद घेऊ या.
१९६१ सालच्या ‘नजराना’ चित्रपटात गीतकार राजेंद्रकृष्ण यांनी लिहिलेले, संगीतकार रवी यांनी संगीत दिलेले आणि लता मंगेशकर यांनी गायलेले एक मधुर-लयबद्ध व अर्थपूर्ण असे दिवाळीचे गीत आहे, ज्यातून सुंदर, मोहक चेहऱ्याची वैजयंतीमाला सांगत आहे...
दिव्यांची जत्रा अर्थात प्रज्ज्वलित झालेले अनेक दिवे असणारी ही रंगीत दिवाळी आहे. (अर्थातच आनंद, सौख्य, समाधान, उत्साह असे मनाचे विविध रंग या अर्थाने रंगीन हा शब्द वापरला आहे.) दिवाळीचा हा माहौल, हे वातावरण म्हणजे सुगंधी फुलांच्या बगीच्यासारखे आहे आणि त्या बगीच्याचा माळी (अर्थात दिवाळी साजरे करणारे सगळे) सुहास्य करत आहेत.
या दिवाळीच्या दिवसांत सभोवताली जे दृश्य दिसते, त्या संदर्भात गीतकार राजेंद्रकृष्ण लिहितात...
इस रात कोई देखे धरती के नजारों को
शरमाते हैं ये दीपक आकाश के तारों को..
इस रात का क्या कहना,
ये रात निराली है...
दिवाळीच्या वातावरणाने आणि सजावटीने रात्रीच्या अंधारात या पृथ्वीतलावर अशी सुंदर दृश्ये दिसतात, की त्यामध्ये उजळणारे दिवे आकाशातील ताऱ्यांनासुद्धा लाजवतात (इतके ते आकर्षक दिसतात. खरेच) या दिवाळीच्या रात्रीबद्दल काय बोलावे? ही रात्रच वेगळी आहे.
दिवाळीच्या निमित्ताने रात्रीच्या अंधारात जे शोभेच्या दारूचे विविध प्रकार आसमंत उजळवून टाकतात, त्याचे वर्णन करताना म्हटले आहे, की...
खा जाए नजर धोखा, जुगनू है या फुलझडियाँ...
बारात है तारों की या रंग भरी लडियाँ..
होठों पे तराने है, बजती हुई ताली है..
शोभेच्या दारूकामातील ‘फुलझडी’ (फुलझाड) या प्रकारामुळे दिसणारे तेजोगोल पाहताना वाटते, की अरे हे काजवे तर नाहीत ना ? (नजरेला भुलविणारी फुलझडी कशी छान दिसते) (आकाशात उडणारे विविध प्रकारचे शोभेच्या दारूकामाचे प्रकार पाहता प्रश्न पडतो की) ही चांदण्यांची, ताऱ्यांची वरात आहे, की रंग भरलेली (फुलांची) माळ आहे. (या दिवाळीच्या आनंदी वातावरणात सर्वांच्या) ओठावर आनंदगाणी आहेत (व ती) टाळ्यांच्या तालावर म्हटली जात आहेत.
दोनच कडव्यांचे हे मधुर गाणे दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे आहे आणि ते ५६ वर्षांपूर्वीचे असले तरी! ‘सुनहरे गीत’ असेच असते ना?
शुभ दीपावली!!!
- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३
(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)