Next
मालती दांडेकर, सॅम्युअल बेकीट
BOI
Friday, April 13, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

बालगोपाळांसाठी देशोदेशीच्या परीकथा आणि लोककथांचा खजिना मराठीत आणणाऱ्या मालती दांडेकर आणि नोबेल पारितोषिक विजेता नाटककार सॅम्युअल बेकीट यांचा १३ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......  
मालती माधव दांडेकर

१३ एप्रिल १९११ रोजी धुळ्यामध्ये जन्मलेल्या मालती दांडेकर या बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. वयाच्या १७व्या वर्षी लग्न होऊन बुधगावला आल्यावर त्यांनी संसार सांभाळून एकीकडे लेखन सुरू केलं आणि दुसरीकडे इंग्लिश शिकत इंग्लिशवर प्रभुत्व मिळवलं. 

आपल्या आजीकडून लहानपणी ऐकलेल्या गोष्टी त्यांनी अत्यंत सोप्या, रंजक आणि आकर्षक भाषेत लिहून ‘माईंच्या गोष्टी’ म्हणून प्रसिद्ध केल्या. त्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यानंतर लोकसाहित्याचा अभ्यास करून त्यांनी लोककथांवर अनेक पुस्तकं लिहिली. देशोदेशींच्या लोकसाहित्याचा अभ्यास करून त्यांनी ‘लोककथा कल्पकता’ हा ग्रंथ लिहिला. चीन, जपान, व्हिएतनामसारख्या देशांतल्या परीकथा मराठीत आणल्या.

बालसाहित्याच्या उगमाचा वेध घेत, संशोधन करून, बालसाहित्याच्या सर्व अंगांचं विस्तृत विवेचन करणारा ‘बालसाहित्याची रूपरेषा’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तसंच लोकसाहित्याचं विवेचन करणारा ‘लोकसाहित्याची लेणी’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.  

१९७८ साली झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. 

‘दगडातून देव' या त्यांच्या पुस्तकाला राज्य आणि केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. 

चक्रवर्ती, देश-विदेशच्या परीकथा, किती झकास कोडी (सहा भाग), संसाराला मदत, सुखाची जोड, वाङ्मयशारदेचे नुपूर, अलका तू असं लिही, आसामच्या लोककथा, अष्टपैलू प्रमोद, अतिपूर्वेच्या परीकथा ब्रह्मदेश, अतिपूर्वेच्या परीकथा कंबोडिया, अतिपूर्वेच्या परीकथा मलेशिया, अतिपूर्वेच्या परीकथा व्हिएतनाम, छान गोष्टी एक ते सात संच, गावाचे नाव, लोककथा कल्पलता, मावळचा कान्हा, साहित्य सागरातील मणिमोती, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१४ जानेवारी १९८६ रोजी त्यांचं निधन झालं. 

(मालती दांडेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..............

सॅम्युअल बेकीट

१३ एप्रिल १९०६ रोजी डब्लिनमध्ये जन्मलेला सॅम्युअल बेकीट हा फ्रेंच आणि इंग्लिश भाषेत लिहिणारा, प्रयोगशील, विचारवंत आणि पुरोगामी कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं लेखन हे बऱ्याचदा बोचऱ्या विनोदाच्या अंगाने जाई. त्या पद्धतीला ‘थिएटर ऑफ दी अॅब्सर्ड’ असं म्हटलं गेलंय. त्या पद्धतीने त्याने लिहिलेलं डार्क ह्युमर असलेलं ‘वेटिंग फॉर गोदो’ हे नाटक प्रचंड गाजलं आणि जगभर अनेक भाषांमध्ये त्या नाटकाचे अनुवाद झाले आणि अगणित प्रयोग झाले.

प्रामुख्याने ५० आणि ६०च्या दशकात त्याचं लेखन बहरलं. १९६९ साली त्याला साहित्याचं ‘नोबेल पारितोषिक’ मिळालं. 

ह्युमन विशेस, क्राप्स लास्ट टेप, हॅपी डेज, प्ले, कम अँड गो, फूटफॉल्स, ए पीस ऑफ मोनोलॉग, ब्रेथ, नॉट आय, अशी त्याची जवळपास २१ नाटकं प्रसिद्ध आहेत. मर्फी, मोलॉय, हाऊ इट इज अशा त्याच्या एकूण आठ कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 

२२ डिसेंबर १९८९ रोजी पॅरिसमध्ये त्याचा मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link