Next
कुडा लेण्यांपासून ताम्हिणी घाटापर्यंत...
BOI
Saturday, June 29, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

कुडा लेणी‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागामध्ये आपण रायगड जिल्ह्यातील जंजिऱ्याच्या आसपासचा किनारी भाग पाहिला. या भागात पाहू या रायगड किल्ल्याच्या उत्तरेकडील ताम्हिणी घाटापर्यंतचा भाग.
............
मौर्य काळात उत्तर कोकणात बौद्ध धर्माच्या प्रसारासोबत व्यापाराचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला. कारण बौद्ध भिक्खू हे त्या काळातील व्यापारी मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असत आणि ते व्यापाऱ्यांच्या तांड्यासोबत प्रवास करीत असत. इ. स. पूर्व १०० वर्षांच्या काळात या भागावर सातवाहनांचे राज्य होते. त्यानंतर शिलाहार, निजाम, विजापूरचे आदिलशहा, मराठे, मुघल व अखेरीस इंग्रज अशी सत्तांतरे या भागाने पाहिली. रायगडाच्या सर्व बाजूंनी शिवाजी महाराजांनी संरक्षक किल्ल्यांची उभारणी केली होती. फारसे माहीत नसलेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक किल्ले या भागात आहेत.

कुडा लेणीकुडा लेणी : हे ठिकाण राजपुरी खाडीकिनाऱ्याजवळील डोंगरात आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० किलोमीटर, तर माणगावच्या आग्नेयेस २१ किलोमीटरवर कुडा हे गाव आहे. या लेणी परिसरात जाण्यासाठी रोह्यामार्गे गाडीरस्ता असला, तरी जंजिरा-दंडाराजपुरी, दिघीकडून जलमार्गाने येणे हे जास्त आनंददायी आहे. कारण जास्त वेळाचे नौकानयन तर होतेच; पण हिरवा शालू पांघरलेल्या डोंगररांगांतून जाताना खूप मजा येते. जंजिऱ्यात मुक्काम करून हे शक्य आहे. येथील टेकडीत २६ कोरीव लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांची अलीकडील पहिली नोंद इ. स. १८४८ सालची सापडते. 

सातवाहन काळात या लेण्यांचे खोदकाम झाले असून, बौद्ध धम्मातील हीनयान आणि महायान पंथातील ही लेणी आहेत. लेण्यांचा कालावधी निश्चित सांगता येत नसला, तरी ही लेणी प्राचीन लेण्यांमध्ये मोडतात. इसवी सनापूर्वी दुसरे शतक ते इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत याची कामे चालू असावीत. इतिहासकारांच्या मताप्रमाणे कालखंड मागे-पुढे धरला, तरी ही लेणी दोन हजार वर्षांच्या आसपासची नक्की आहेत. साधारण सम्राट अशोकापासून ते सम्राट हर्षवर्धन याच्या राजवटीपर्यंत बौद्ध धर्मास राजाश्रय होता. त्यामुळे याच कालावधीत या लेण्यांची निर्मिती झाली हे नक्की. 

कुडाकालानुरूप महाराष्ट्रात असलेल्या बौद्ध लेण्यांच्या कामामध्ये प्रगती, सुबकपणा व काटेकोरपणा वाढत गेलेला दिसून येतो. येथील एका शिलालेखामध्ये महाभोज मांदव नावाचा उल्लेख आहे. सातवाहन राजवटीत या लेण्याचे काम झाले असावे. ही लेणी दोन टप्प्यांत कोरलेली आहेत. क्र. १ ते १५ ही लेणी खालील स्तरात, तर १६ ते २६ ही लेणी वरील स्तरात आहेत. यात बौद्ध मूर्ती इ. सनाच्या सहाव्या शतकामध्ये स्थापन केल्या गेल्या आहेत. लेण्यांतील २६ गुहांपैकी चार चैत्यगृहे आढळतात. येथील स्तूपांची रचना पितळखोरा, तसेच भाजे लेण्यासारखी दिसून येते. येथे पाच चैत्यगृहे आहेत; शिवाय या मोठ्या विहारात आणि प्रत्येक लेण्यामध्ये पाण्याचे कुंड आहे. लेणी क्रमांक सहामध्ये बुद्ध शिल्पांचा शिल्पपट, स्तूप आणि शिलालेख बघण्यास मिळतो. इथे स्तूपांची रचनादेखील कोरीव आहे. शिवाय इथे शिलालेख अतिशय सुबक कोरलेले आहेत. शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी ही लेणी फार उपयुक्त आहेत. 

लेणी दोन भागांत विभागल्या असून, वरच्या भागात शैलगृह आहेत, तर खालच्या भागात विहार चैत्यगृह आहेत. (अधिक माहिती http://abcprindia.blogspot.com/ येथे मिळू शकेल.) 

मांदाड बंदर : मंदगोर बंदर (मांदाड) येथून निघालेला आणि कुडा-भाजे-बोरघाटमार्गे पैठणपर्यंत गेलेला सातवाहनकालीन रस्ता होता. मांदाडचा उल्लेख रोमन लेखामध्ये आला आहे. त्यात उल्लेखलेले मँडागोरा बंदर म्हणजेच मांदाड होय. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या आहेत. सातवाहन साम्राज्यातील महाभोजांच्या मांदव घराण्याचे हे प्रमुख केंद्र असावे असे मानले जाते. 

तळेगड/तळगड : सातवाहन राजवटीत या गडाची निर्मिती झाली. काही इतिहासकारांनी तळेगडाचा फक्त टेहळणी बुरुज असा उल्लेख केल्याने किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. तळेघोसाळगड अशा जोडनावाने हे दोन्ही किल्ले ओळखले जायचे. निजाम मलिक अहमदने १५८५मध्ये तळेगड पुन्हा वापरात आणला. (रिओपन केला, असा कुलाबा गॅझेटिअरमध्ये उल्लेख आहे.) हा उल्लेख असे दर्शवतो, की हा गड शिवपूर्व काळापासूनचा आहे. भुऱ्या डोंगरावर तटबंदी निर्माण करून या डोंगराची निर्मिती केली आहे. पूर्वीच्या काळात बाण हेच मोठे शस्त्र असल्यामुळे तटबंदीत बाण मारण्यासाठी शेकडो जंग्या दिसून येतात. संकटकाळी शत्रुपक्षाच्या वाटेवर तेल ओतण्यासाठी तटबंदीत तेलासाठी खोबण खोदलेली दिसून येते. खजिना ठेवण्यासाठी लक्ष्मीची कोठी आहे. 

सातवाहन काळात सैन्याबरोबर असणारे बैल, घोडे व इतर प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जो तलाव बांधत, त्याला ‘पुसाटी’ म्हणत. या नावाचा तलाव येथे अजूनही आहे. हा किल्ला ५०० फूट उंच आहे व दक्षिण व उत्तरेच्या बाजूला असलेल्या ४०० फूट उभ्या असलेल्या कातळामुळे नैसर्गिक तटबंदी मिळाली आहे. तळेगडाच्या आसपास असलेल्या गावांचे प्राचीन अस्तित्व तीन वेशींवर प्रत्येक ठिकाणी पाच ते सहा फुटी वेशीवरील मारुती असल्यामुळे लक्षात येते. 

अवचितगडतळेगडावरून जाळ करून घोसाळेगड, कुडा लेणी येथून जंजिरा-मुरूडपर्यंत खुणेमार्फत संदेश देता येत असे. ते संदेश साईच्या डोंगरावरून रायगडापर्यंत पोहोचत असत. पाणी अडवा व पाणी जिरवा या पद्धतीने येथील तटबंदी बांधणीत नियोजन केलेले आढळते. डोंगर व तटबंदीमध्ये खंदक आहेत. तेथे पावसाळ्यात पाणी जिरते आणि तेथून चार खणी कातळाच्या हौदात येऊन थांबते. त्याला अंगभूत दगडी खांब आहेत. सूर्यप्रकाश आत जात नसल्यामुळे ते पाणी बारा महिने तेथील शिबंदीला पुरत असे. 

इ. स. १६४८मध्ये शिवरायांनी तोरणा घेतल्यावर तळे-घोसाळेगडाच्या गडकऱ्यांना आमंत्रण देऊन बोलावले होते. हे सभासद व चिटणीस बखरींतील नोंदीत दिसून येते. त्या वेळी सिद्दीच्या कब्जातील तळे-घोसाळेगडावर आदिलशहाने सोडवळकर व कोडवळकर या मराठे किल्लेदारांची नेमणूक केली होती. ते सिद्दीच्या कारभाराला कंटाळले होते. त्यांनी महाराजांस कळविले, की आपण कोकणात यावे म्हणजे आम्ही तळा व घोसाळा हे किल्ले आपल्या हवाली करतो. ही अनुकूलता पाहून महाराज तळेगडावर आले व ते किल्ले ताब्यात घेतले. शिवरायांचा हा कोकणातील किल्ल्यावर पहिला पदस्पर्श होता. या किल्ल्यांनजीक सुरगड आहे, तोही त्यांनी हस्तगत केला व आसपासच्या प्रांतात आपला अंमल बसविला. 

पढवण धबधबाचंडिका भवानी ही त्यांची कुलदेवता असल्यामुळे तिचे दर्शन या परिसरात असताना मिळाल्याने हा गड त्यांना भावला. महाराजांनी गडावरील भवानी देवीच्या मंदिरासाठी शाकारणीसाठी, एकादशीसाठी, तेलासाठी, गुरवासाठी वतने चालू केली होती. ती अजूनही चालू आहेत. शिवरायांचा तळेगड-घोसाळेगड या जोडदुर्गावर एवढा जीव होता, की मिर्झाराजे जयसिंगबरोबर झालेल्या तहात ते दोन्ही गड त्यांनी मागून घेतले. दुसरा बाजीराव येथे साडेसहा महिने राहिल्याचा संदर्भ आहे. त्या काळात १३ तोफा येथे आणल्या होत्या. त्यातील पाच तोफा गावात आहेत व आठ तोफा निरनिराळ्या पोलीस स्टेशनची प्रवेशद्वारे सुशोभित करीत आहेत. 

पढवण धबधबा : तळगडाच्या उत्तर पूर्व बाजूला हा एक सुंदर धबधबा आहे. हा धबधबा नदीच्या खडकाळ भागात असल्याने हा खूपच सुंदर दिसतो. 

घोसाळगड उर्फ वीरगड : हा किल्ला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आहे. समुद्रसपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दुरून शिवलिंगासारखा दिसतो. हा किल्ला चारही बाजूंनी डोंगराने वेढलेला आहे. शिवाजी महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वी हा किल्ला निजामाच्या आधिपत्याखाली होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला दुरुस्त करून घेतला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मुघलांना न देता आपल्याकडेच ठेवला, यावरून त्या वेळचे महत्त्व लक्षात येते. अफझलखान प्रतापगडावर आला, त्या वेळी सिद्दीने या किल्ल्याला वेढा घातला; पण अफझलखानाला मारल्याचे कळताच तो तेथून पळून गेला.

घोसाळगड उर्फ वीरगड

किल्ल्यावर जाताना कातळात कोरलेल्या पायरीमार्गावर भवानीमातेचे मंदिर असून, त्यापुढे स्वयंभू गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. तोफांच्या माऱ्यामुळे पायऱ्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत. वर पोहोचल्यावर नष्ट झालेल्या प्रवेशद्वाराची जागा आहे. त्याचे अवशेष विखुरलेले आहेत. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे. एक माचीकडील, तर दुसरा बालेकिल्ल्याकडील, असे येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. अरुंद असलेल्या डोंगरराला तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे त्या काळातील शौचकूप पहायला मिळतात. 
बालेकिल्ल्याच्या उंचवट्यावर पाण्याच्या कोरून काढलेल्या टाक्या, घरांचे अवशेष आणि माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याचे अवशेष खुणा आढळतात. गडाच्या माथ्यावरून तळागडाचे दर्शन होते. कुडे-मांदाडच्या खाडीचे विहंगम दृश्य दिसते. 

धवीर मंदिर, रोहा

रोहा :
आधुनिक काळातील संत म्हटले जाणारे पांडुरंगशास्त्री आठवले यांचे हे जन्मगाव. कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावरील हे गाव पुरातन काळापासून महत्त्वाचे ठिकाण होते. कुंडलिका नदीच्या पात्रामधून पूर्वी व्यापारी गलबते येत असत. सध्या रासायनिक उद्योगासाठी येथील औद्योगिक वसाहत प्रसिद्ध आहे. रोहा गावाच्या आसपास अनेक छोटे किल्ले आहेत. हे सर्व किल्ले व्यापारी मार्गावर नजर ठेवण्याचे हेतूने निर्माण झाले व रायगड राजधानी झाल्यावर या किल्ल्यांना संरक्षणात्मक महत्त्व आले. येथे मेगासिटी प्रकल्प उभारण्यात येत आहे. 

अवचितगड

अवचितगड :
रोहा या तालुक्याच्या गावाजवळ कुंडलिका नदीच्या पलीकडे हा किल्ला आहे. हा किल्ला संपूर्णपणे घनदाट जंगलाने वेढलेला आहे. गडाची उंची तळापासून ३०५ मीटर आहे. मुख्य प्रवेश दरवाज्यातून डाव्या हातास ‘शरभ’ हे शिल्प दिसते. त्यामुळे, हा किल्ला शिलाहार काळात साधारण ११व्या शतकात बांधला असावा, असे वाटते. इ. स. १७९६मध्ये कोरलेला शिलालेख येथे आहे. मुंबई-गोवा रस्त्यावर नागोठणे किंवा कोलाडपासून उजवीकडे फुटलेला रस्ता रोहा या तालुक्याच्या गावाला जातो. 

अवचितगड (3)

घनदाट जंगलामुळे येथे जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. इथल्या रानात अस्वले, अनेक प्रकारचे सर्प, रानडुकरे, माकड, बिबट्या, कोल्हे, इत्यादी प्राणी आढळतात. गडावरून पूर्वेस तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती, सुधागड, सरसगड, धनगड, रायगड, सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर दिसतो न्याहाळता येतो. 

अवचितगड (3)

बिरवाडीचा किल्ला :
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६१मध्ये सिद्दीकडून दंडाराजपुरी जिंकून घेतल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला. या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे, की सात बुरुज असलेल्या या किल्ल्याला तटबंदी नाही आहे. गडाचे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार सुबक असून, चांगल्या स्थितीत आहे. आजही हे बऱ्यापैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डावीकडे पाण्याची तीन टाकी आहेत. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे कोणतीही ऐतिहासिक घटना घडल्याची नोंद नाही. या किल्ल्यावरील तोफा पायथ्याशी असलेल्या देवळात ठेवल्या आहेत. येथून भातशेतीची खाचरे आणि जंगल याचे सुरेख विहंगम दृश्य दिसते. 

बिरवाडीचा किल्ला

कोलाड :
मुंबई-गोवा महामार्गावर रोहा तालुक्यात कुंडलिका नदीच्या काठावर हे ठिकाण आहे. येथे रिव्हर राफ्टिंग, रॅपलिंग, जंगल कॅम्प इत्यादी साहसी खेळांचा चित्तथरारक अनुभव घेता येतो. इथल्या निसर्गरम्य वातावरणात विश्रांतीसाठी येऊन राहणेसुद्धा चांगले आहे. येथे मुक्काम करून आसपास भरपूर ठिकाणे बघता येतात. सध्याच्या काळात या गावाला भेट देणे हा सुंदर अनुभव आहे. कोलाडमध्ये राहण्या-जेवणाची सुंदर सोय होते. तुम्हाला कुठली अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करायची नसेल, तर नुसते इथे येऊन राहणेही मजेचे ठरते. मुंबई-गोवा हायवे जवळ असल्याने कोकणातल्या इतर अनेक पर्यटनस्थळांना येथून भेट देता येते. रोहा, तळा-घोसाळा, मुरूड अशी सगळी ठिकाणे येथून जवळ आहेत. पुण्याहून ताम्हिणी-विळे-रोहा-कोलाड या मार्गाने येथे जाता येईल. 

कुंडलिका रिव्हर राफ्टिंग

देवकुंड धबधबाभिरा विद्युत प्रकल्प : कुंडलिका नदीवर एक छोटे धरण बांधले आहे. त्याच्या वरच्या बाजूस टाटा कंपनीने बांधलेले भारतातील तिसरे विद्युतनिर्मितीगृह आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणातून या विद्युतगृहासाठी पाणी आणले आहे. या प्रकल्पास ९३ वर्षे पुरी होत आहेत. हा भाग निसर्गरम्य असून पावसाळ्यात सह्याद्री पर्वतातून कोसळणारे धबधबे खूपच छान दिसतात. 

देवकुंड धबधबा : हा धबधबा भिराजवळ आहे. हा कुंडलिका नदीचा उगम समजला जातो. या ठिकाणी वाटाड्यासह पायी जावे लागते. हे एक दिवस पिकनिकसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. काही जण ट्रेक करत मुळशीमार्गेही येथे येतात. 

गंगावली : सातारच्या शाहूमहाराजांचे हे जन्मस्थान माणगावजवळ आहे. 

मानगड

मानगड :
हा छोटा किल्ला माणगाव तालुक्यातील निजामपूर गावाजवळ आहे. (रायगडाच्या पायथ्याचे छत्री निजामपूर आणि हे निजामपूर वेगळे आहे!) निजामपूरपासून गडापर्यंत अगदी माथ्यापर्यंत दिशादर्शक फलक लावलेले आहेत. दुर्गवीर नावाची संस्था गडाच्या संवर्धनाचे काम करते. किल्ल्यावर फक्त अवशेष दिसून येतात. विंझाईदेवीचे मंदिर, मंदिराजवळच अनेक वीरगळ (वीरांच्या स्मृतिशिळा), छोटी दगडी दीपमाळ, दोन भक्कम बुरुज आणि मध्ये कमान नसलेला गडाचा दरवाजा, पाण्याची टाकी, चोरदरवाजा आदी गोष्टी दिसून येतात. 

मानगड

कुर्डुगड (विश्रामगड) :
कोकणातून पुण्याला जाणाऱ्या ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीलाच हा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ८८२ मीटर उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात शिरण्याअगोदर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर अवशेषरूपी प्रवेशद्वारातून किल्ल्यात जाता येते. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर शिरल्यावर एक उद्ध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो. त्याच्या समोर एक मीटर उंचीची हनुमान मूर्ती आहे. या मूर्तीच्या पुढे एक निसर्गनिर्मित, १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील एवढी घळ आहे. किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत आणि हा भलामोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. सुळक्याला वळसा घालून पुढे गेल्यावर दोन सुळक्यांच्या मधला भाग तटबंदी करून बंद केला आहे. तटबंदी चांगल्या स्थितीत आहे. 

कुर्डुगड (विश्रामगड)

कुर्डुगड (विश्रामगड)

तटबंदीच्या पुढे गेल्यावर एक महाकाय दरड कोसळलेली दिसते. येथून पुढे जाता येत नाही. येथून पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्यामध्ये असलेल्या छोट्या जागेतून सरपटत जावे लागते. एका बाजूला दरी असल्याने पाय घसरण्याची भीती असते. गड फिरण्यास फारसा वेळ लागत नाही. हा गड ताम्हिणी घाटावरील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. कोकणाचे विहंगम दृश्य येथून दिसते. माणगावकडून गाडीमार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव लागते. तिथूनच याची चढण सुरू होते. फारसा प्रसिद्ध नसलेला कुर्डुगड पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजीराजांचे सरदार होते. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत. म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात. 

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट :
हा घाट पुण्याहून कोकणाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. हा वर्षभर केव्हाही भेट देण्यासारखा निसर्गरम्य आहे. प्रत्येक हंगामात याचे सौंदर्य वेगळे दिसते. कोलाडपासून मुळशीपर्यंतच्या भागात हा घाट आहे. 

सह्याद्रीच्या कपारीतून गेलेला हा मार्ग पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतो. हा जंगलातून गेलेला असल्याने वन्य प्राणीही भरपूर आहेत. ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. ताम्हिणी अभयारण्यात शेकरू, पिसोरी, भेकर, सांबर, खवल्या मांजर, उदमांजर, जावडी मांजर, वाघाटी, बिबट्या, रानमांजर, साळिंदर, रानडुक्कर आणि वानर यांसारखे २८ प्रजातींचे सस्तन प्राणी येथे आहेत. १२ प्रजातींसह येथे एकूण १५० प्रकारचे पक्षी आढळतात. आकर्षक अशा ७२ प्रजातीच्या फुलपाखरांचेही येथे दर्शन होते. अजगर, नाग, घोणस, चापडा, हरणटोळ, खापरखवल्या, दिवड, धामण, सापसुरळी, घोरपडी यांसारखे १८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ३३ प्रकारच्या दुर्मीळ वनस्पतीदेखील येथे आढळतात. डोंगरदऱ्यांमुळे ट्रेकर्सही येथे येत असतात. 

कसे जाल कुडा लेणी ते ताम्हिणी घाट?
मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड किंवा इंदापूर येथे उतरून रोह्यामार्गे कुडा लेण्यांपर्यंत जात येते. जवळचे रेल्वे स्टेशन कोलाड. जवळचा विमानतळ मुंबई - १५० किलोमीटर. लवकरच नवी मुंबई विमानतळ पूर्ण झाल्यावर हे अंतर आणखी कमी होईल. कोलाड ते इंदापूरपर्यंत हमरस्त्याला भरपूर हॉटेल्स आहेत. मुरुड येथे मुक्काम करून कुडा लेणी पाहता येतात. अतिपावसाचा जुलै महिना सोडून कधीही जावे. 

(या भागातील काही माहितीसाठी लेणी अभ्यासक आयु. मुकेश जाधव यांचे सहकार्य मिळाले.) 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 109 Days ago
I hope , all these articles will be published in the form a book , will have wide readership and sale . Tourism shall do well to promote the book . May be , it would have to be subsidised.
1
0

Select Language
Share Link
 
Search