Next
‘स्वत:चे आगळेवेगळे मोठेपण दुर्गा भागवतांनी कायम जपले’
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचे मत
BOI
Monday, October 01, 2018 | 03:38 PM
15 0 0
Share this story

अंजली कीर्तने लिखित ‘बहुरूपिणी दुर्गा भागवत – चरित्र आणि चित्र’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना अरविंद पाटकर, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, कुमार केतकर, अंजली कीर्तने व सतीश कीर्तने

पुणे : ‘शोभादर्शकात ज्याप्रमाणे प्रत्येक वेळी नवी नक्षी येते आणि आपण त्यात गुंगून जातो, तसे दुर्गाबाईंचे व्यक्तिमत्व होते. एक आगळेवेगळे मोठेपण ही त्यांची खरी कमाई होती आणि हे मोठेपण त्यांनी कायम जपले’, अशा भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी व्यक्त केल्या. अंजली कीर्तने यांनी लिहिलेल्या आणि मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘बहुरूपिणी दुर्गा भागवत – चरित्र आणि चित्र’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर, मनोविकास प्रकाशनचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर, संचालक आशीष पाटकर या वेळी उपस्थित होते.

डॉ. दाभोळकर म्हणाले, ‘दुर्गा भागवत या ताकदीच्या लेखिका होत्या. त्या समजून घेऊन समोरच्याला समजावून देणे कठीण आहे;मात्र याबरोबरच माझ्यासाठी त्या एक जिवलग मैत्रीणदेखील होत्या. त्यांची जडणघडण, मानसिकता, संवेदनशीलता याचा परिचय या पुस्तकामधून होतो. माणसाने कमावलेले मोठेपण कसे जपावे हे मी दुर्गाबाईंच्या रुपाने पाहिले.’

दुर्गाबाईंची आठवण सांगताना ते पुढे म्हणाले, ‘१९८७ च्या सुमारास नर्मदा प्रकल्पाचे काम सुरू होऊन नर्मदा खोऱ्यात समृद्ध पंजाबच्या उभारणीची घोषणा झाली. देशभरातील अनेक व्यक्ती व संस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला. त्या वेळी मी नर्मदा प्रकल्प समजून घेऊन ‘माते नर्मदे’ हे प्रकल्पाच्या बाजूने मते मांडणारे पुस्तक लिहिले. कार्यकर्त्यांना हे पुस्तक पसंत  पडले नाही;पण दुर्गा भागवतांनी ते पुस्तक वाचून त्यावर परीक्षण लिहिले व आपले मतपरिवर्तन झाले असून, आता आपण प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर केवळ दुर्गा भागवतांनी त्यावर लिहिले म्हणून ते पुस्तक अनेकांनी वाचले आणि आपण प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे कळविले. यात ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, अभिनेते व कार्यकर्ते नीळू फुले यांचा समावेश होता.’

‘खरे तर दुर्गाबाई या कोणत्याही पुरस्काराच्या विरोधात होत्या; मात्र दिल्लीत असताना मी जेव्हा मराठी लेखकांवर ज्ञानपीठ पुरस्कार देताना अन्याय होतोय आणि त्यांना डावलले जाते या संदर्भात लिहिले तेव्हा पुरस्काराला पाठिंबा नाही, पण कोणत्याही प्रांतावर अन्याय होणे चुकीचे, असे सांगत दुर्गाबाईनी मला पाठिंबा दिला. त्याच वर्षी कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या यादीत दोन नावे होती आणि दुसरे नाव स्वत: दुर्गा भागवतांचे होते हे मला कळाले. दुर्गा भागवतांना स्वतःला, मात्र तो पुरस्कार कुसुमाग्रजांनाच मिळायला हवे असे वाटत होते’, अशी आठवण या वेळी डॉ. दाभोळकर यांनी सांगितली.

या वेळी कुमार केतकर यांनी दुर्गा भागवत यांच्याबरोबर असलेला स्नेह, त्यांच्या एशियाटिक लायब्ररीमधल्या आठवणी सांगितल्या. ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याप्रमाणे संशोधन करून पुस्तके लिहिली जातात तशा पद्धतीने दुर्गा भागवतांवरील हे पुस्तक लिहिले गेले आहे. चरित्र लेखनात अशा प्रकारची संशोधनाची शैली फार कमी प्रमाणात पाहायला मिळते व त्या दृष्टीने हे पुस्तक स्वागतार्ह आहे’, असे मत केतकर यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमानंतर ‘दुर्गा भागवत, एक शोधकथा’ हा कीर्तने यांचा लघुपट दाखविण्यात आला. मधुरा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link