Next
आत्मविश्वास ढळू देऊ नका..
BOI
Saturday, February 03 | 06:45 AM
15 0 0
Share this story


वडिलांच्या अनुष्काकडून असलेल्या अपेक्षा काही अवास्तवचं होत्या. म्हणजे तिने आईला होत नाही म्हणून घरातल्या प्रत्येक कामाची जबाबदारी घेतलीच पाहिजे, भावाचा अभ्यास, स्वतःची नोकरी आणि घर हे सगळं सांभाळलं पाहिजे. संध्याकाळी बाबांना त्यांच्या दुकानाच्या कामात मदतही केली पाहिजे. आतापर्यंत ती हे सारं कसंबसं निभावत होती, पण महिन्याभरापूर्वी तिचा आणि वडिलांचा काही कारणाने वाद झाला. ‘मनी मानसी’ सदरात आज पाहू या आत्मविश्वासाच्या महत्त्वाबद्दल...
................................................       
अनुष्काला एका नावाजलेल्या कंपनीत नुकतीच नोकरी मिळाली होती. त्या नोकरीत तिच्यावर कामाची मोठी जबाबदारी देण्यात आली होती. सुरुवातीला तिला काम करायला खूप मजा येत होती. पण गेल्या काही महिन्यांपासून तिला त्या कामाचा प्रचंड ताण जाणवायला लागला होता. कामात सतत चुका होत होत्या. हा ताण इतका असह्य होता, की गेल्या आठवड्यापासून अनुष्का आजारी पडली होती. आठवडा झाला तरी तिची तब्बेत सुधारेना. त्यामुळे तिच्या डॉक्टरांनी तिला समुपदेशनासाठी जाण्याचा सल्ला दिला. अनुष्का येण्यासाठी तयारच नव्हती, पण तिची अगदी जवळची बालमैत्रिण सुकन्या तिला जबरदस्तीनेच भेटायला घेऊन आली. आल्यावर तिने स्वतःची आणि अनुष्काची ओळख करून दिली आणि म्हणाली, ‘अनुष्काला डॉक्टरांनी सांगितलंय की तुझं सध्याचं हे आजारपण तुझ्यावर असलेल्या अती ताणामुळे आलं आहे. जोवर तुझा हा ताण कमी होत नाही तोवर तुला पुर्ण बरं नाही वाटणार. जर तुला ते जमत नसेल तर कोणाशीतरी बोलून मन मोकळ कर किंवा चक्क काही महिन्यांसाठी समुपदेशकाकडे जा. मी हिला खूप समजावलं. पण ही ऐकेच ना! म्हणून आज जबरदस्तीनेच घेऊन आलीये हिला. आता तुम्हीच बोला तिच्याशी’. सुकन्याचं हे सगळं बोलून होईपर्यंत अनुष्का मात्र मान खाली घालून बसली होती. तिने एकदाही मान वर करून पाहिलं नाही. तिला आलेलं दडपण कमी करण्यासाठी तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. सुरुवातीला ती खाली बघूनच बोलत होती. पण नंतर हळूहळू वर बघून बोलायला लागली. तिच्या एकूण देहबोलीवरून, आवाजावरून तिने तिचा आत्मविश्वास गमावला होता हे चटकन लक्षात आले. पण कारण कळणे आणि त्याहीपेक्षा तिने मन मोकळे करणे जास्त महत्त्वाचे होते. तिच्याशी संवाद साधत असताना ती विशेष बोलत नव्हती. त्यामुळे या पहिल्या सत्रात तिच्या ताणाचं कारण समजू शकलं नाही, पण तिला थोडा विश्वास वाटल्यामुळे पुढील सत्रात बोलण्याची तिने तयारी दाखवली. बरोबर येताना सुकन्याला घेऊन येण्याची परवानगीही मागितली.

ठरल्याप्रमाणे दोन-तीन दिवसांनी सुकन्याच अनुष्काला सत्रासाठी घेऊन आली. अनुष्का ही घरातली मोठी मुलगी. तिच्या कुटुंबात ती, तिचा धाकटा भाऊ, आई आणि वडील असे एकूण चार सदस्य. वडिलांचा स्वभाव जरा तापट आणि विक्षिप्त. त्यांच्या अनुष्काकडून असलेल्या अपेक्षा काही अवास्तवचं होत्या. म्हणजे तिने आईला होत नाही म्हणून घरातल्या प्रत्येक कामाची जबाबदारी घेतलीच पाहिजे, भावाचा अभ्यास, स्वतःची नोकरी आणि घर हे सगळं सांभाळलं पाहिजे. संध्याकाळी बाबांना त्यांच्या दुकानाच्या कामात मदतही केली पाहिजे. तिने कुठेही आणि कधीही कमी पडता कामा नये. कोणत्याही कामाला नाही म्हणता कामा नये. आतापर्यंत ती हे सारं कसंबसं निभावत होती, पण महिन्याभरापूर्वी तिचा आणि वडिलांचा काही कारणाने वाद झाला. त्यात त्यांच्या स्वभावानुसार वडील तिला फारच विचित्र पद्धतीने बोलले. तू आम्हाला नको आहेस. तू कोणतेच काम नीट करू शकत नाहीस, तुझा जन्म झाला आणि सारं बिघडलं, तुझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगायला हवं तू कशी आहेस, त्यांचंदेखिल नुकासानंच करणार तू अशा प्रकारे वडील तिला बोलले आणि कैक अयोग्य शब्द आणि वाक्य त्यांनी वापरले. 

या सगळ्यामुळे अनुष्का खूप अस्वस्थ झाली. आपण खरेच खूप वाईट आहोत. निष्क्रिय, निकामी आहोत. असे तिला ठामपणे वाटू लागले. हे असे वाटणे खूप  तीव्र होते. त्यामुळे अनुष्काच्या कामात चुका व्हायला लागल्या आणि त्या चुकांमुळे तिच ते वाटणे आणखी ठाम होत गेले. परिणामी आलेल्या ताणाने तिला शारीरिक आजारपण आले. 

हे सगळे लक्षात आल्यावर सुरुवातीला तिला रडून मोकळे होऊ दिले. सुकन्यानेदेखिल तिला खूप धीर दिला. ती थोडी शांत झाल्यावर तिला वडिलांचे बोलणे, त्यामागील करणे आणि सत्य परिस्थितीतल्या तिच्या क्षमता, ती करत असलेले कष्ट आणि त्यातून तिला आलेले चांगले अनुभव किंवा यश यावर तिच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेत अनुष्का व सुकन्यालाच अधिक सहभागी करून घेतले. सुकन्याने या चर्चेत अनुष्काबद्दलची अनेक उदाहरणं सांगितली. कित्येक अडचणीच्या प्रसंगात तिने जबाबदारी कशी चोख निभावली हे ही सांगितले. या साऱ्या चर्चेचा गाभा हे तिच्या मनातील नकारात्मक विचार कमी करून सकारात्मक विचार वाढवणे हाच होता. तो काही अंशी साध्यही झाला. त्यानंतर पुढचे काही महिने ती समुपदेशनासाठी नियमितपणे येत होती. ज्यात काही उपचारपद्धती वापरून, काही तंत्र वापरून तिच्यातील नकारात्मक भावना व विचार कमी करण्यास आणि सकारात्मक विचार करण्यास तिला शिकवले गेले. त्यानंतर अनुष्का पुन्हा पूर्वीसारखीच जोमाने आणि उत्साहाने कामाला लागली.             
                                                                                                                                                                                                  
(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
मोबाइल : ८८८८३ ०४७५९ 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link