Next
‘शाश्वत उपायांसाठी ‘इनोव्हेशन’ व्हायला हवे’
प्रेस रिलीज
Thursday, March 01, 2018 | 12:51 PM
15 0 0
Share this article:

प्रकल्प स्पर्धेतील विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.

पुणे :
‘नवनिर्मितीच्या जोरावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. समाजातील अनेक समस्यांवर उपाय शोधण्याचे काम संशोधनातून होत असते. त्यामुळे शाश्वत विकास आणि समस्यांवरील शाश्वत उपाय शोधण्यासाठी ‘इनोव्हेशन’ होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपल्यातील कल्पकता, नाविन्यता ही कौशल्य विकसित करायला हवीत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी केले.

भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे उभारण्यात आलेल्या आणि सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या राज्यातील पहिल्या ‘इनोव्हेशन हब’चे उद्घाटन राष्ट्रीय विज्ञान दिनी डॉ. जोशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप, ‘इसरो’चे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे, नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सचे (एनसीएसएम) संचालक समरेंद्र कुमार, दासॉल्ट सिस्टीमच्या संशोधन व विकास विभागाचे मुख्याध्याकारी सुदर्शन मोगासले, भारतीय विद्या भवनाचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञान शोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, ‘इनोव्हेशन हब’चे उपसंचालक संदीप नाटेकर, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

इनोव्हेशन हबचे उद्घाटन करताना सुदर्शन मोगासले, ज्येष्ठराज जोशी, समरेन्द्र कुमार, संदीप नाटेकर व नंदकुमार काकिर्डे.कोलकाता येथील नॅशनल सेंटर फॉर सायन्स म्युझियम आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे ‘इनोव्हेशन हब’ उभारण्यात आले आहे. यासाठी दासॉल्ट सिस्टिमकडून अर्थसहाय्य लाभले आहे. यामध्ये मेकॅनिकल इनोव्हेशन सेंटर, अॅडव्हान्स्ड फॅब्रिकेशन अँड प्रोटोटायपिंग सेंटर, कम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक सेंटर असणार असून, येथे विविध प्रकारची अवजारे, मशिनरी, प्रणाली उपलब्ध असतील. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स कार्यशाळाही आयोजिल्या जाणार आहेत.

डॉ. जोशी म्हणाले, ‘विकासदर हा तुमच्या नवनिर्मितीशी संबंधित बाब आहे. आपण ‘इनोव्हेशन’मध्ये अजूनही मागे आहोत. सामान्यांना अधिक सुकर जीवन जगण्याची संधी द्यायची असेल, तर येणाऱ्या पिढीने संशोधनात भर घालून ‘इनोव्हेशन’वर भर दिला पाहिजे. ग्रामीण भागातील लोकांना अजूनही अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या सोडविण्यासाठी आपण काय करू शकू, याचा विचार केला पाहिजे. आपले ‘इनोव्हेशन’ अधिक शाश्वत होण्यासाठी सतत नवा विचार आणि त्यात भर घालण्याचे कौशल्य आपल्याला आत्मसात करावे लागेल.’

कुमार म्हणाले, ‘देशभरात ६० ‘इनोव्हेशन हब’ उभारण्याचा आमचा मानस आहे. त्यातील २४ पूर्ण झाली असून, महाराष्ट्रात खासगी संस्थेबरोबर होणारे हे पहिलेच केंद्र आहे. विज्ञान प्रसाराबाबत विज्ञान शोधिका करीत असलेले कार्य लक्षात घेऊन सायन्स म्युझियमने हे केंद्र उभारले आहे. येत्या काळात अनेक चांगले प्रकल्प या केंद्रातून निर्मिले जातील, अशी आशा आहे. अनेक विद्यार्थी संशोधक पेटंट मिळवतील.’

मोगासले म्हणाले, ‘दासॉल्ट वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याला नेहमीच प्रोत्साहन देत आहे. येत्या काळात सर्व प्रकारची मदत या ‘इनोव्हेशन हब’साठी केली जाईल. चांगले अभियंते आणि संशोधक या केंद्रामुळे घडतील.’

अनंत भिडे यांनी प्रास्ताविक केले. संदीप नाटेकर यांनी इनोव्हेशन हबबाबत सविस्तर माहिती दिली. भाग्यश्री लताड यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार काकिर्डे यांनी आभार मानले.

नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा झाला गौरव
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित साधून घेण्यात आलेल्या प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनात विजेत्या स्पर्धकांना समरेंद्र कुमार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. वरिष्ठ गटात डीएव्ही पब्लिक स्कूलच्या वरद सरदेशपांडे याने केलेल्या ‘युटिलायझेशन ऑफ वेस्ट स्टीम फॉर प्रेशर कुकर’ या प्रकल्पाला प्रथम, खडकवासल्यातील आर्मी पब्लिक स्कूलच्या प्रेम भोकरे, अक्षय पवार व रॉन पिल्लई यांच्या ‘१० इन १ रोबोट’ प्रकल्पाला द्वितीय, तर सह्याद्री नेशनल स्कूलच्या विग्नेश ब्रह्मे व स्वरूप पाटील यांच्या ‘इनफिनोमीटर’ प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला.

कनिष्ठ गटात सेवासदनाच्या इरा केतकर व रमा डोळे यांच्या ‘व्होकल व्हिज्युलायजर’ला प्रथम, डीएसके स्कूलच्या निनाद पाटीलच्या ‘अर्थक्वेक रेसिस्टन्ट बिल्डिंग’ला द्वितीय, तर बाल शिक्षणाच्या शौनक गोखले व तन्मय वारुडकर या विद्यार्थ्यांच्या ‘सॉईल मॉइश्चर सेन्सर कंट्रोल्ड पंप’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या स्पर्धकांना करंडक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search